Friday, December 13, 2019

(बालकथा) उचला जबाबदारी


एक जमीनदार होता. त्याची खूप शेती होती. शेतात पीक जोमदार होतं. तो रोज सकाळी  उठून शेतावर जायचा.  मजुरांसोबत शेतीच्या विकासावर चर्चा करायचा. काही अडचण आल्यास,ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा. संपूर्ण गावात सर्वाधिक उत्पन्न तो घ्यायचा.  वय वाढत गेलं तसा तो आजारी पडू लागला. त्याच्या मृत्यूनंतर शेतीवाडीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मुलावर येऊन पडली. खूप संपत्ती असल्याने  त्याला शेतीचे फार काही वाटत नव्हते. त्याला रोज सकाळी शेतावर जायची गरज वाटत नव्हती. यासाठी मजूर लोक ठेवले होते. पण यावेळी त्याला शेतीत घाटा आला. निम्म्यापेक्षा अधिक पीक जनावरांनी खाल्ले होते. काहींना कीड लागली होती.

जमीनदारचा मुलगा काळजीत पडला. सगळं व्यवस्थित असताना नुकसान का झालं, असा त्याला प्रश्न पडला. सगळं काही ठीक होतं. वडील होते तेव्हा आणि आता सगळं काही समान होतं. मग कुठे काय कमी पडलं? त्याने आपली चिंता आपल्या मित्रापुढे मांडली. मित्राने विचारले की तू रोज उठून शेतावर जातोस का?
यावर जमीनदारचा मुलगा म्हणाला,' मला काय गरज आहे? मजुरांना बी-बियाणे, खत इत्यादी खरेदी करायला पैसे दिले जातात.'
यावर मित्र म्हणाला,' तू उद्यापासून रोज सकाळी शेतावर जायला सुरुवात कर.'
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जमीनदारचा मुलगा शेतावर गेला. तिथे कुणीच नव्हते. शेतावर काम करणारे मजूर अजून आलेले नव्हते. जनावरे खूपच दुबळी झाली होती. त्याला सगळ्या गोष्टींचा कल्पना आली. आता त्याने रोज सकाळी शेतावर जायला आणि लक्ष द्यायला सुरुवात केली. आता शेतावर काम करणारे मजूर व्यवस्थित काम करू लागले. पुढचे पीक जोमात आले. फायदा खूप झाला. आता तो आपल्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवत नाही. प्रत्येक कामात स्वतः जातीने लक्ष घालतो. 
तात्पर्य- स्वतःची कामे स्वतः करा.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली) 7038121012

No comments:

Post a Comment