Friday, December 13, 2019

(बालकथा) वाईट सवय

एका शहरात एक श्रीमंत माणूस राहत होता. तो आपल्या मुलाला ज्या ज्या वेळेला त्याच्या वाईट सवयी सोडण्यास सांगतो, तेव्हा त्याचे एकच उत्तर असते," अजून मी खूप लहान आहे. हळूहळू त्या सवयी सोडून देईन." पण तो कधीच सवयी सोडण्याचा प्रयत्न करत नसे.खूप समजावून सांगूनही त्याने सवयी सोडल्या नाहीत. त्याच दिवसांमध्ये एक संत माणूस शहरात एका आश्रमात उतरला होता. त्यांचा खूप नाव लौकिक होता. श्रीमंत माणसाने आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेले आणि आपली समस्या सांगितली. संत महात्म्याने आश्रमातल्या बागेतील एका रोपाकडे बोट दाखवून म्हटले," तू ते रोप उपटू शकतोस का?"

मुलाने ते रोप सहज उपटून टाकले. मग ते पुढे झाले आणि एका थोड्या मोठ्या रोपट्याकडे बोट दाखवून म्हटले," आता हे रोपटे उखडून दाखवतोस का?" यावेळेला त्याला ते रोपटे उपटायला थोडे कष्ट पडले, पण त्याने ते रोपटे उपटले. आणखी थोड्या वेळाने संताने त्याला एका अशोकाच्या झाडाकडे निर्देश करून म्हटले," हे झाड उपटून दाखवतोस का?"
मुलगा त्या झाडाजवळ गेला. ते झाड त्याच्या उंचीपेक्षा वर गेले होते. त्याने त्याला जोरजोराने हलवण्याचा प्रयत्न केला. पण ते झाड अजिबात हलले नाही. झाड हलवून उपटण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते झाड जराही हलले नाही. मुलगा म्हणाला,"याला उखडणं अशक्य आहे.ङ्घ संत म्हणाले,ङ्घ ठीक असेच वाईट सवयींबाबत असते.ज्यावेळेला ते नवीन असतं, त्यावेळेला ते सोडणं सोपं जातं. पण जसजसे ते जुने होत जाते, तसतसे ते सोडणं अशक्य होऊन जातं."
तात्पर्य: जीवनाला ब्रेक लागतो तो वाईट सवयींमुळे. यश मिळवण्यासाठी जितके शक्य होईल तितके वाईट सवयींपासून दूर राहा.- मच्छिंद्र ऐनापुरे,जत (सांगली) 7038121012

No comments:

Post a Comment