Sunday, December 15, 2019

( बालकथा) समजूतदार सारिका


रविवारचा दिवस होता. सारिका आनंदात होती,कारण ती बाबांबरोबर आज संध्याकाळी चार वाजता रंकाळा बघायला जाणार होती. ती शाळेचा गृहपाठ लवकर पूर्ण करण्याच्या नादात होती. तिसर्या वर्गात शिकणार्या सारिकाने खरोखरच चार वाजेपर्यंत आपला गृहपाठ पूर्ण केला. तेवढ्यात तिच्या बाबांनी तिला हाक मारली, “ सारिका बाळा, तयार हो लवकर. ”
सारिकाच्या आईने बाबांना येताना भाजीपाला आणायला सांगितला. बाबा सारिकाला म्हणाले, “ सारिका जा बरं, जरा स्कूटर पूसून घे.”
ती लगेच आवरून स्कूटर पुसायला निघून गेली. तिने भाजीपाला घ्यायला एक पिशवीही घेतली आणि स्कूटरच्या डिकीत ठेवून दिली. मग आपले हात धूवून बाबांना म्हणाली, “ चला बाबा. ”

दोघेही तीन किलोमीटरवर असलेल्या रंकाळा तलावावर पोहचले. तिथे लोकांची भरपूर गर्दी होती. लहान मुलंही खेळत-बागडत होती. तिथे भेळ- पाणीपुरी, गरमागरम भजी, वडापाव तसेच गारेगार आईस्क्रीमच्या पुष्कळ गाड्या होत्या. बाबांनी एका बाजूला स्कूटर लावली. मग ते सारिकाला हाताला धरून तिथे फेरफटका मारू लागले. गार वारा अंगाला झोंबत होता. सारिकाला मस्त वाटत होतं. मग बाबांनी दोघांना भेळ आणि पाणीपुरी आणली. दोघांनी मजेत ती खाल्ली. सारिकाला खूप आनंद झाला. सारिकाचे पोट भरले. राहिलेली भेळ तिने बाबांनी दिली.
रंकाळ्यावर फिरून झाल्यावर सारिका आणि बाबा शहरातल्या भाजीमंडईच्या दिशेने निघाले.वाटेत जाताना सारिका बाबांना सांगत होती की, काल तिच्या सरांनी प्लास्टिक कचर्यांविषयी सांगितले होते. आपली प्लास्टिकच्या कचर्यांपासून लवकरात लवकर सुटका व्हायला हवी. हा प्लास्टिक कचरा पर्यावरण, आपली शेती, तलाव-सरोवरे, जनावरे यांच्या सुरक्षित जीवनासाठी हानिकारक आहे, असे सर सांगत होते.
बाबा सारिकाचे बोलणे ऐकून म्हणाले, “ बाळा, तुमच्या सरांनी प्लास्टिकमुळे होणार्या नुकसानीबाबत खूप चांगली माहिती सांगितली आहे. मला आनंद आहे, ते तू चांगल्याप्रकारे समजून घेतलंस. ”
भाजीमंडई आल्यावर सारिकानेही आपल्या बाबासोबत डिकीतील कापडाची पिशवी घेऊन चालू लागली. बाबांनी एका मोठ्या दुकानातून तीन-चार भाज्या घेतल्या. त्या भाज्या भाजीवाला नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घालू लागला. हे पाहून सारिकाने आपल्याजवळची पिशवी भाजीवाल्यापुढे धरली आणि म्हणाली, “ काका, या भाज्या या पिशवीत घाला. ”
सारिकाचा समजूतदारपणा पाहून बाबा चकीत होऊन तिच्याकडे पाहू लागले. भाजीवाल्यालाही सारिकाचा समजूतदारपणा पाहून आनंद झाला. म्हणाला, “ मुली, तू पिशवी आणून खूप चांगलं काम केलंस. ”
काका, तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत भाजीपाला द्यायचं बंद करा. थोड्याच दिवसांत सगळे घरातून कापडांच्या पिशव्या स्वत: घेऊन येतील.तुम्ही सगळे भाजीवाले हा निर्णय घेतलात तर आपले पर्यावरण सुधारेल आणि प्लास्टिकपासून होणारे नुकसानही टळेल. ”
सारिकाच्या समजूतदारपणाबद्दल बाबांनी तिला शाबसकी दिली आणि यापुढे कापडाच्या पिशवीमध्येच भाजीपाला घेण्याचे तिला वचन दिले.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012


No comments:

Post a Comment