Thursday, December 5, 2019

आजची मुले रोगाच्या कचाट्यात


आधुनिक जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलत चाललेल्या सवयींमुळे आपला देश कुपोषण, लठ्ठपणा आणि बिगर संसर्गरोगांनी ग्रस्त होत चालला आहे. कंप्रिहेसिव नॅशनल न्यूट्रीशन सर्व्हे ( सीएनएनएस) नुसार देशातील बालके आणि किशोरवयीन मुलांच्या अभ्यासादरम्यान ही माहिती समोर आली आहे. हा सर्व्हे गेल्या काही दशकातील आपल्या समाजात होत असलेल्या तीव्र आर्थिक आणि सामाजिक बदलाच्या दिशेने बोट दाखवत आहे. सर्व्हेमध्ये बालकांच्या खाण्यापिण्याविषयी आणि होणार्या रोगांविषयी अभ्यास करण्यात आला आहे. पण खाणपिणं किंवा रोग बर्याच प्रमाणात सामाजिकतेशी सबंधित असतात. यातून आर्थिक परिस्थितीदेखील समोर येते. हा अहवाल भीतीदायक आहे कारण गेल्या काही वर्षांत बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन आणि किडनी संसर्गाचे रोग वाढले आहेत.

आपल्या देशात आरोग्यासंबंधीच्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. जागतिक आरोग्य संघटना, मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया, नॅशनल हेल्थ पॉलिसी आणि सरकारी आरोग्य मानकांनुसार सामान्य लोकांना आणि ग्रामीणांना अजूनही प्राथमिक आरोग्य सुविधा मिळताना दिसत नाहीत. मग विशेष सुविधा तर लांबचाच पल्ला आहे. समाजात खाण्यापिण्याच्या वेगाने होत असलेल्या बदलांमुळे असे काही आजार समोर येत आहेत, की जे आजार काही विशिष्ट वयानंतर  माणसांना होत होते. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र बालकोष (युनिसेफ) आणि भारतीय लोकसंख्या परिषद यांच्या मदतीने साल 2016 आणि 2018 च्या दरम्यान बालके आणि किशोरवयीन मुलांचा खाण्यापिण्यासंबंधीचा कंप्रिहेंसिव नॅशनल न्यूट्रीशन (सीएनएनएस) सर्व्हे केला. यांमध्ये देशातील तीस राज्यांमधील एक लाख बारा हजार मुलांचा अभ्यास करण्यात आला आहे. या मुलांमध्ये वाजवीपेक्षा अधिक वजन आणि बिगर संसर्ग रोगांच्या लक्षणांचाही अभ्यास करण्यात आला आहे. यात कुपोषण आणि अतिपोषण यांच्या व्यतिरिक्त विटामीन आणि मिनरलचाही समावेश करण्यात आला होता.
या सर्व्हेक्षण अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये बिगर संसर्ग रोगांचे प्रमाण वाढत आहे. ही मोठी चिंताजनक बाब आहे. मुलांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडस ते हृदयरोग, झटका आणि अन्य बिगर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढत चालला आहे. या सर्व्हेदरम्यान पाच ते नऊ वर्षे वयाच्या जवळपास दहा टक्के मुलांना प्री- डायबिटीकची लक्षणे आढळून आली आहेत. अशा मुलांना भविष्यात निश्चितच मधुमेह होण्याचा धोका आहे. इतकच नव्हे तर याच वयाच्या एक टक्के मुलांना अगोदर मधुमेह झाला आहे.
व्यापक प्रमाणात करण्यात आलेला हा सर्व्हे मुलांमध्ये होत असलेल्या लठ्ठपणा धोक्याच्या दिशेने इशारा करत आहे. सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आलेल्या पाच ते नऊ वर्षे वयाच्या मुलांपैकी जवळपास पाच टक्के बालके आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणा आढळून आला आहे. याच्या उलट पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या प्रत्येकी तीन मुलांपैकी एक मुलगा म्हणजेच 35 टक्के मुले अविकसित अंगकाठी आणि 33 टक्के मुलांचे वजन कमी प्रमाणात आढळून आले आहे. सहापैकी एका मुलाचे वजन त्यांच्या कदकाठीनुसार कमी आहे. म्हणजे सतरा टक्के मुलांचे वजन कदकाठीनुसार कमी होते. याच वर्गातील 31 टक्के मुले एनिमिक म्हणजेच शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असण्याच्या रोगाने ग्रस्त आहेत.  तसं पाहायला गेलं तर या समस्या सामान्य वाटतात,पण पुढे जाऊन या समस्या मोठं विक्राळ रूप घेतात.
अहवालानुसार पाच ते नऊ वर्षांच्या मुलांमध्ये एक तृतीयांश म्हणजेच जवळपास 34 आणि किशोरवयीन 16 टक्के मुलांमध्ये ट्रायग्लिसराइडसचा स्तर उच्च प्रमाणात आढळून आला आहे. हा आजार थेट हृदयाशी संबंधित आहे. ट्रायग्लिसराइडसचे वाढते प्रमाण भविष्यात हृदयासंबंधीच्या गंभीर स्वरुपाच्या समस्यांना निमंत्रण देणारा आहे. जवळपास सात टक्के मुलांना आणि किशोरांना किडनीचा गंभीर रोग होण्याचा धोका आहे. पाच टक्के किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे.फास्ट फूड आणि जंक फूडचे प्रमाण खाण्यात वाढले आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, अधिक काबोर्हायड्रेट आणि साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन वाढले असून यांचा परिणाम थेट शरीरावर होत आहे. अहवालानुसार पाच ते नऊ वयाच्या प्रत्येक तीन मुलांपैकी एक मूल म्हणजे 31.4 टक्के आणि 10 ते 19 वयाची 36 टक्के किशोरवयीन मुलं आठवड्यातून एकदा तळलेले पदार्थ खातात. पाच ते नऊ वयातील जवळपास 7.6 टक्के आणि दहा ते 19 वयाच्या किशोरांमधील दहापैकी एक मुलगा आठवड्यातून एकदा गॅस निर्माण करणारे थंड पेय पितो. त्यातच मुले आणि किशोरवयीन मुलांपैकी अधिकतर एका आठवड्यात कमीत कमी एकदाच हिरव्या पानांच्या भाज्या किंवा डाळ खातात. डॉक्टरांचा सल्ला असा आहे कि, वीस वर्षांपर्यंत मुलांना अधिक पौष्टीक भोजन दिले पाहिजे. यामुळे त्यांची हाडे, मेंदू, रक्त आणि शरीराचे दुसरे भाग योग्य प्रकारे विकसित होतात. मात्र आश्चर्यकारक पद्धतीने एक गोष्ट समोर आली आहे की,मुलांमध्ये किंवा किशोरांमध्ये डेअरी उत्पादनांबाबत फारशी रुची नाही. त्यामुळे या पदार्थांचा खपही कमी आहे.दोन तृतीयांश मुले आणि किशोर (जवळपास 65 टक्के) आठवड्यातून एकदा दूध किंवा दह्याचे सेवन करतात. त्याचबरोबरच फळे, अंडी, मासे, चिकन किंवा मटणदेखील आठवड्यातून एकदाच खाल्ले जाते.ज्या घरात आई किंवा पालक अधिक शिकले असतील त्या घरात किंवा कुटुंबात मात्र दूध, दही, फळे, अंडी, मासे, चिकन-मटण यांच्या सेवनाचे प्रमाण चांगले आहे. कमी शिकलेल्या घरात या अन्नपदार्थांचे खाण्यातील प्रमाण कमी आहे.
देशातील पाच ते नऊ दरम्यानच्या पाच टक्के मुलांचे वजन अधिक आहे. म्हणजेच यांचा बीएमआय (बॉडॅए मॉस इंडेक्स) सामान्यांपेक्षा अधिक आहे. अधिक वजनांची मुले नागालँड आणि गोव्यात आहेत. सगळ्यात कमी वजनाची मुले झारखंड बिहारमध्ये आहेत. अर्थात मुलांचे वजन कमी किंवा जास्त घराच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. खेड्यातील मुलांपेक्षा शहरी भागातील मुलांचे वजन अधिक आहे. आशिया क्षेत्रातील भौगोलिक आणि प्राकृतिक रचनेमुळे इथल्या लोकांच्या पोटाभोवती चरबीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रोगांचे प्रमाणही अधिक आहे. लठ्ठपणा ही एक मोठी समस्या असून शासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. बिगरसंक्रमित आजारांचा परिणाम थेट देशाच्या आर्थिक विकासावर होत आहे. मुलांच्या आजारांक़डे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर उद्या देशाला फार मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने आताच या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत  7038121012   



No comments:

Post a Comment