Wednesday, December 18, 2019

(बालकथा) मैत्रीचा अर्थ


सोनू आणि मोनू आज फारच आनंदात होत्या. आज त्यांना त्यांची वर्गमैत्रीण शुभांगीच्या वाढदिवस पार्टीला जायचं होतं. शुभांगी त्यांच्या वर्गातील सर्वात श्रीमंत मुलगी होती. तिचा वाढदिवस फाइव स्टार हॉटेलमध्ये साजरा केला जात असे. या निमित्ताने तिच्या वर्गातील सर्वच मुले एक दिवस फाइव स्टारच्या मेजवानीची मजा लुटायचे.
संध्याकाळचे चार वाजले होते,पण अजून शुभांगीच्या गाडीचा ड्रायव्हर त्या दोघींना घ्यायला आला नव्हता. सोनू मोनूला म्हणाली, “ ताई, शुभांगी तर म्हणाली होती की, तीन वाजता ड्रायव्हरकाका आपल्याला न्यायला येतील म्हणून...पण आता चार वाजले. असं तर नसेल, शुभांगी तिच्या ड्रायव्हरला आपलं नावच सांगायला विसरली...आपण आता पार्टीला जातोय की नाही कुणासठाऊक? ”
सोनूचे बोलणे ऐकून मोनू म्हणाली, “ तू फार काही काळजी करू नकोस, वाट पाहण्याचे फळ गोडच असते. ”

मोनू म्हणते न म्हणते तोच दारावर टकटक झाली. दरवाजा उघडला तर दारात ड्रायव्हरकाका उभे आणि त्यांच्या हातात मोठी मोठी दोन पाकिटं. त्यांनी सोनूच्या हातात दोन्ही पाकिटं देत म्हटले, “  तुम्ही हे ड्रेस घाला आणि या बाहेर. खास शुभांगीने तुमच्यासाठी दिलाय. ”
सोनूने पाकिटं त्यांच्या हातून घेतली खरी, बडबडतच आत आली आणि पाकिटं पलंगावर आपटली. वर म्हणाली, “  बघ ताई, महाराणी शुभांगीने आपल्यासाठी कपडेसुद्धा पाठवले आहेत. जसे की, आमच्याकडे कपडेच नाहीत. नाही तरी तिला आपल्याला गरीब असल्याचे दाखवायचे असेल. ”
स्वभावाने शांत असलेली मोनू म्हणाली, ““  अगं, तू इतका रागराग का करतेस?शुभांगीने जर इतक्या प्रेमाने ड्रेस गिफ्ट दिला असेल तर तो मुकाट्याने घाल ना! आज तिच्या वाढदिवसादिवशी आपण तिच्यावर नाराज व्हायचं नसतं. ”
मोनूने शुभांगीने पाठवलेला ड्रेस घातला. तो पाहून मन नसतानाही सोनूनेदेखील आपला ड्रेस बदलला. तेवढ्यात त्यांची आई बाजारातून आली. दोघांचा एकच ड्रेस पाहून ती म्हणाली, “ अरे, हे काय...? ”
सोनू फणकार्याने म्हणाली, “ अगं, आम्ही महाराणीच्या पार्टीला चाललोय, मग महाराणीने दिलेलाच ड्रेस घालणार ना? ”
यावर आई काही म्हणणार तोच ती मोनूचा हात धरून गेटपर्यंत पोहचलीसुद्धा! दोघीही गाडीत बसून ड्रायव्हरसोबत वाढदिवसाच्या पार्टीसाठी निघाल्या. जशा त्या हॉटेलातल्या पार्टी हॉलमध्ये पोहचल्या,तशा त्यांना वर्गातले बाकीचे विद्यार्थीदेखील त्यांच्यासारखाच ड्रेस घातलेले दिसले. सगळेच एकमेकांकडे आश्चर्याने पाहात होते. सगळ्यांना प्रश्न पडला, शुभांगीने सगळ्यांना एकाच ड्रेसमध्ये का बोलावलं आहे?
सगळी मुलं आपापसात बोलत होती, तेवढ्यात शुभांगीदेखील त्यांच्यासारखाच ड्रेस घालून आली. सगळ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शुभांगी त्या सर्वांचे आभार मानत म्हणाली, “ माझ्या सर्व मित्रांनो, मी सर्वांसाठी एकच प्रकारचा ड्रेस यासाठी निवडला की, जसे आपण शाळेत एकसारखे दिसतो, तसेच या फाइव स्टार हॉटेलमध्ये एकसारखे दिसले पाहिजे. इथेही आपल्यात समानता दिसली पाहिजे. ”
तिचे ते बोलणे ऐकून सगळ्यांनीच जोरजोराने टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात शुभांगीचे मोठे उद्योजक असलेले वडील तिथे आले. ते म्हणाले, “  शुभांगीची इच्छा होती की, तिच्या वाढदिवसाला तिच्या वर्गातील सर्व मुलांनी तिच्यासारखीच धमाल करावी. यासाठीच आजची ही पार्टी खास तुमच्यासाठी. ”
मग काय! मज्जाच मज्जा! मुलांनी पार्टीत धमाल केली. गाण्यांवर डान्स केला.आंताक्षरी खेळली.फुल्ल एन्जॉय केला. आता रात्रीचे आठ वाजत आले होते. त्यामुळे सगळी मुले घरी जायला निघाले. सोनू-मोनू या दोघीही शुभांगीला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन घरी जाण्यासाठी बाहेर पडल्या.
घरी गेल्यावर सोनू जाम खूश दिसत होती. ती मोनूला म्हणाली, “ ताई, तू बरोबर म्हणालीस, शुभांगीने खरोखरच आज छान काम केलं. आपल्या वर्गातील काही मुलं तिच्या पार्टीला कोणते कपडे घालावेत, या काळजीत होते. पण शुभांगीच्या एका आयडियाने सगळेच बदलून गेले. आपल्या सगळ्यातले भेदभाव क्षणात नष्ट झाले. सगळ्यांनी पार्टी मस्त एन्जॉय केली. ” ”
त्यांचे बोलणे ऐकून आजी म्हणाली, “ बाळांनो,यालाच म्हणतात खरी मैत्री. मैत्रीमध्ये तुम्हाला आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अशा गोष्टीही समजून घ्यायला हव्यात, ज्या तुमच्यापुढे व्यक्त करता येत नाहीत. खरा मित्र नेहमी आपल्या मित्रांच्या भावना समजून घेतो. आणि त्यांना वाईट वाटणार नाही, या गोष्टींची खास काळजी घेतो. ”
आजीचे बोलणे ऐकून सोनू म्हणाली, ““  खरंय आजी! आता मीदेखील माझ्या मित्र-मैत्रिणींच्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देईन. त्यांना मदत करीन. शेवटी आम्ही आठ तास एकत्र असतो. आम्ही त्यांना चुकीचे समजायला नको. कित्येकदा आम्ही लहान लहान गोष्टींवरून दुसर्याला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करतो. विनाकारण डोकं चालवून चांगल्या कामालाही दोष देतो. आपल्या जीवनात मित्रांची मोठी गरज आहे. आपल्याला नेहमी आपल्या मित्रांना आनंद देता आला पाहिजे. हाच खर्या मित्राचा अर्थ आहे. ”-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012





No comments:

Post a Comment