हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या चॅकी चान यांना बालपणीच मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल केलं होतं.त्यांचे वडील चार्ल्स फ्रान्सीसी दूतावासात स्वयंपाक्याचे काम करत. त्यांच्या आई लिलीदेखील त्याच दूतावासात सफाई कामगार म्हणून कामाला होत्या.बालपण त्यांच्यासाठी सुखाचं नव्हतं.शाळेला जायला लागून नुकतंच वर्ष झालं होतं. वडिलांनी मुलाला अभ्यासात रस नाही, असे वाटल्याने त्यांना प्राथमिक शाळेतून काढून ड्रामा अॅकॅडमीत घातलं. चान सात वर्षाचे असतील, वडिलांना ऑस्ट्रेलियाच्या दूतावासात निकरी मिळाली. मुलाच्या ट्रेनिंगला कसली बाधा येऊ नये म्हणून त्याला तिथेच होस्टेलला घातले आणि दोघे आई-वडील परदेशात निघून गेले.
चान मार्शल आर्टसोबतच गायन आणि अभिनयाचेही धडे गिरवत होते. कष्ट करावे लागत होते. चान सांगतात, मी पहाटे पाचला उठायचो. रात्री उशिरापर्यंत एकामागून एक क्लास सुरूच असायचे.चुकलो की, मार खायला लागायचा.रोजच्या खर्चा-पाण्यासाठी छोट्या-मोठ्या कार्यक्रमात स्टंट करावे लागायचे. आई-वडील परदेशात, त्यामुळे गोष्टी शेअर करायला जवळ कोणी नव्हतं. माझ्याजवळ पैसे नसायचे. मग एका एका पाऊंडसाठी खतरनाक स्ट्ंट करायला लागायचे.
कळत्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडीलांविषयी अशी काही माहिती मिळाली की, ती ऐकून ते दंगच झाले. त्यांचे वडील जासूस असल्याचे कळले. पहिल्या लग्नापासून त्यांच्या वडिलांना दोन मुलं होती. त्यांच्या आईलाही दोन मुली होत्या.दोघेही आपापल्या मुलांना चीनमध्ये सोडून 1949 साली हाँगकाँगला आले. चान म्हणतात,माझे वडील कूक आहेत, एवढंच मला माहित होतं. मात्र ते जासूस आहेत, कळल्यावर मला फार मोठा धक्का बसला.
मार्शल आर्ट शिकल्याने त्यांनी अॅक्शनमध्ये प्राविण्य मिळवले. त्यामुळे त्यांना शाळेत असल्यापासूनच चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका मिळत गेल्या. 1971 मध्ये त्यांना पदवी मिळाली. तेव्हा ते अवघे 17 वर्षांचे होते. या दरम्यानच्या काळात त्यांनी खतरनाक स्ट्ंट दृश्यांमधले बारकावे शिकून घेतले. त्यांना काही मार्शल आर्ट चित्रपटांमध्ये काम मिळाले, मात्र ते प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे ते आपल्या कामात खूश नव्हते. शेवटी त्यांनी हाँगकाँगला रामराम ठोकला आणि आई-वडिलांकडे ऑस्ट्रेलियाला निघून गेले.तिथे त्यांनी काही काळ कंस्ट्रक्शन क्षेत्रात काम केले.पण त्यातही त्यांचे मन रमले नाही. या दरम्यान 1976 मध्ये त्यांची नवख्या प्रतिभांना हेरून प्रोत्साहित करणार्या प्रमोटर विली चान यांच्याशी ओळख झाली. विली चान यांनीच त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना अॅक्शन चित्रपटात एका चांगल्या मार्शल आर्टिस्टची गरज होती.त्यांच्या बोलावण्याने ते पुन्हा हाँगकाँगला परतले.त्यांनी शायोलिन चेंबर ऑफ डेथ आणि फिस्ट ऑफ डेथ या चित्रपटांमध्ये काम केले.या चित्रपटांना म्हणावं असं मिळालं नसलं तरी त्यांच्या कामाचं कौतुक झालं.प्रेक्षक त्यांना ओळखू लागले. याच दरम्यान त्यांनी काही चित्रपटांमध्ये गाणीही गायिली. ती सुपरहिट ठरली.
चान यांच्या लक्षात आलं की, मोठं यश मिळवायचं असेल तर फक्त मार्शल आर्ट असून चालणार नाही. मग त्यांनी आपला मोर्चा कॉमेडीकडे वळवला.1978 साली त्यांनी ड्रंकन मास्टर नावाचा चित्रपट केला.यात त्यांनी एका महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारली होती. त्यात त्यांनी अॅक्शनबरोबरच आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांना दणदणून हसवलं.त्यांच्या कामाचं कौतुक तर झालंच. पण चित्रपटही हिट ठरला.संपूर्ण आशिया आणि अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले.चान एका रात्रीत स्टार बनले. आता त्यांना हॉलीवूड चित्रपटांच्याही ऑफर येऊ लागल्या.1980 मध्ये द बिग ब्रॉल आणि 1985 मध्ये द प्रोटेक्टर या चित्रपटांमध्ये त्यांना महत्त्वपूर्ण अशा भूमिका साकारायला मिळाल्या. अमेरिकेतल्या प्रेक्षकांनीही त्यांना डोक्यावर घेतलं. 1985 मध्ये पोलिस स्टोरी या चित्रपटातल्या एका स्टंट सीन दरम्यान त्यांच्या पाठीच्या कणाच्या हाडाला गंभीर दुखापत झाली.बातमी पसरली की, आता जॅकी चानची कारकीर्द संपली. ते कधीच स्टंट सीन करू शकणार नाहीत.पण पाच वर्षांनतर त्यांनी मनाचा थरकाप उडवणार्या अशा काही स्टंट सीनने चित्रसृष्टीत जोरदार पुनरागमन केले,की बोलायची सोयच उरली नाही. ऑपरेशन कंडोर चित्रपटात त्यांनी नदीकाठावर मोटरसायकलच्या हवेतल्या उड्डाणाचा असा खतरनाक स्टंट सीन केला की, उपस्थितांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली.
आता त्यांची ख्याती फक्त चीन आणि हाँगकाँगपुरतीच सिमित राहिली नव्हती.ते सार्या आशिया खंडातल्या प्रेक्षकांचे चहेते बनले.1982 साली त्यांनी तैवानची अभिनेत्री लिन फेंग हिच्याशी विवाह केला. पण हा विवाह त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवला.1998 मध्ये मात्र त्यांनी हे गुपित आपल्या आत्मचरित्राद्वारे उघड केले. आय एम जॅकी चान हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.त्यांना एक मुलगा आहे.त्याचं नाव आहे जेंसी. 1998 साली रश आवर आणि 2000 मध्ये शंघाई नून चित्रपटांनी अमेरिकेत धूम माजवून टाकली. अमेरिकेतल्या लोकप्रियतेची त्यांची इच्छाही पूर्ण झाली. तिथल्या प्रेक्षकांनी त्यांना आपलंस करून टाकलं.पण पुढे वाढत्या वयामुळं अॅक्शन चित्रपटांत काम करताना आवघड होतं गेलं.याविषयी चान म्हणतात, तरुण होतो, त्यावेळी जखमा लवकर बर्या होत होत्या, मात्र वय वाढत जातं, तसं जखम बरी व्हायला वेळ लागते.नंतर मग ते चित्रपट प्रोडक्शन क्षेत्रात उतरले.युनिसेफ अॅम्बेसडर म्हणून त्यांनी अनेक शाळा उघडल्या. ते म्हणतात, शिक्षण महत्त्वाचं आहे. खरच! मलादेखील शाळा शिकून डॉक्टर,इंजिनिअर किंवा वकील बनायला हवं होतं. काही गोष्टी राहून गेल्या याची त्यांना खंत जरूर आहे.
नुकतेच त्यांना अभिनय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल ऑस्कर अॅवार्डने सन्मानित करण्यात आले. याबद्दल चान म्हणतात, मी चित्रसृष्टीला माझी 56 वर्षे दिली आहेत. जवळपास दोनशेएक चित्रपट केले आहेत.काही फाईट सीनमध्ये आपली हाडं मोडून घेतली आहेत. मात्र ऑस्कर मिळाल्यानंतर आता माझी खात्री झाली आहे की, खरेच मी एक चांगला अभिनेता आहे.
No comments:
Post a Comment