भाडं त्याच्या घरापर्यंत पोहचवून रतनने टॅक्सी आपल्या घराच्या दिशेने वळवली आणि टॅक्सीला वेग दिला. रात्रीचा एक वाजला होता. दिवसभराच्या कामानं तो पार शिणून गेला होता. कधी एकदा घरी जावं आणि अंथरुणात अंग टाकावं, असं त्याला झालं होतं. चोहोबाजूला नीरव शांतता होती. कुठे चिटपाखरूही दिसत नव्हते. पुलावर पोहचताच त्याला काचक्कन ब्रेक मारावा लागला. गाडीच्या प्रकाशात रतनला एक माणूस दिसला, जो एकदम त्याच्या गाडीच्या आडवा आला होता. त्यानं जर ब्रेक लावला नसता, तर माणूस टॅक्सीखाली आला असता.
रतन टॅक्सी थांबवून पटकन बाहेर आला. त्याला धरलं. आणि रस्त्याच्या बाजूला नेऊ लागला. अचानक त्याचं लक्ष त्या माणसाच्या चेहर्याकडे गेलं. चेहरा पाहून तो चकीतच झाला. कारण तो तर गोपाळ. त्याचा बालमित्र.बरीच वर्षे दोघांची गाठ-भेट नव्हती. रतन मेहनत करून पोट भरत होता, तर गोपाळ वामार्गाला लागला होता. वाट चुकला होता. चोरांच्या, गुन्हेगारांच्या टोळीत सामिल झाला होता. त्यामुळे रतनने त्याच्याशी बोलणे टाकले होते. भेटणेदेखील टाळले होते. पण त्याला मनापासून वाटत होतं की, त्याचा बालमित्र सुधारावा, सन्मार्गाला लागावा. त्यानं इतर चारजणांप्रमाणे चांगलं जीवन जगावं.
पुलावरून त्याला असा असावधपणे, काहीसा भेंडकाळत एकट्यानं चालताना पाहून रतनला त्याची दया आली. त्याचे मन पिघळले. तो गोपाळला सावरत म्हणाला, ‘ मित्रा, असल्या स्मशान रात्री असा एकटा कुठे निघाला आहेस?’
रतनला पाहून गोपाळ चमकला. म्हणाला, ‘ अरे व्वा,तू तर फार दिवसांतून भेटलास. पण साल्या, ते सन्मार्गाचे लेक्चर तेवढं देऊ नकोस.’
गोपाळच्या तोंडाचा वेगळाच दर्प येत होता. रतन म्हणाला, ‘ अरे बाबा, तसा माझा काही इरादा नाही. मी घरी चाललो होतो ... चल, मी घरी सोडतो तुला.’
गोपाळ तयार झाला. रतनने त्याला मागच्या सीटवर बसवले. आता त्याने टॅक्सीची दिशा बदलली. काही अंतरावर गोपाळने गाडी थांबवली आणि उतरून काळोखात गडप झाला.
रस्त्यात टॅक्सी चालवताना रतन आपल्या मित्राचाच विचार करत होता. एवढ्या रात्री रस्त्यात चिटपाखरूही नसताना तो काय करत होता, याचा त्याला उलगडा होत नव्हता. अन अचानक त्याची गाडी थांबली. त्याने स्टार्ट करण्याचा बराच प्रयत्न केला, पण तिने चालू व्हायचे काही नाव घेतले नाही.
बहुतेक आजची रात्र आपल्याला इथेच रस्त्यात काढावी लागते की काय, असे त्याला वाटले. तसाच काही तरी बडबडत तो बाहेर आला. मॅकेनिकचा कानोसा घेण्यासाठी त्याने इकडे-तिकडे पाहिले.आपण कुठे थांबलो आहे, याचा त्याला अंदाज आला. पुलाजवळ एक वर्कशॉप होतं, ते त्याला ठाऊक होतं. मिस्त्री तिथेच पतर्याच्या टपरी वजा खोक्यात झोपला होता. त्याला उठवून आपल्यासोबत न्यायला त्याला बरीच खटपट करावी लागली आणि उशीरही झाला!
रतन मिस्त्रीसोबत गाडीजवळ पोहचला, आणि त्याला धक्काच बसला. दोन पोलिस शिपाई टॉर्चच्या उजेडात टॅक्सीत काही तरी शोधत होते.
रतन आल्यावर त्यातला एकटा गाडीच्या बॅनेटवर काठी मारून दरडावत म्हणाला, ‘ ही रक्ताची काय भानगड आहे?’
रतनच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. काहीसा थरथरत ओरडला, ‘रक्त, कसलं रक्त?’
‘ये शहाणपट्टी शिकवू नको. बर्या बोलानं बोल, ही रक्ताची काय भानगडाय. कोठून आलं हे रक्त?’
रतनचं तर डोकंच चक्रम झालं. टॅक्सीच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग कोठून आले? हेच त्याला कळेना. तो विचार करू लागला.- रक्ताच्या या डागाचा गोपाळशी तर काही संबंध नाही? कारण शेवटच्यावेळी तोच मागच्या सीटवर बसला होता. म्हणजे गाडीत बसताना गोपाळ जखमी होता. त्याच्या जखमेतून रक्त वाहत असले पाहिजे. परंतु, रस्त्यावर तर तो एकटाच दिसला. आपण जखमी असल्याचेही तो काही बोलला नाही. तेवढ्यात पोलिस शिपायाने त्याच्या खांद्याला धरून जोरानं हलवलं, ‘ अरे ये,कुठल्या तंद्रीत गडप झालास? चल, आमच्याबरोबर ठाण्याला!’
‘ मला तर जाऊ द्या साहेब,’ मिस्त्री गयावया करत म्हणाला. शिपाई त्याला निरखून पाहत म्हणाला, ‘ नाही, तुलाही पोलिस ठाण्यात यावं लागेल.तुला असा मोकळा सोडणार नाही.’
रतन आणि मिस्त्रीला शिपायांसोबत पोलिस ठाण्यात जावे लागले. पुढील तपासासाठी टॅक्सीही पोलिस ठाण्यात आणण्याची व्यवस्था केली गेली.
वाटेत रतन विचारात गढून गेला होता. त्याची अवस्था मोठी विचित्र झाली होती. काय करावे, समजेनासे झाले होते. शेवटी तो पोलिसांना काय सांगणार होता? एकदा त्याचं मन म्हणत होतं, जे काही घडलं ते खरं खरं सांगावं. यामुळे गोपाळ संशयाच्या भोवर्यात सापडला असता. सापडला तर सापडला, आपण तर सुटू. गाडीच्या मागच्या सीटवर बसताना त्याने आपण जखमी आहोत, असे का बरं सांगितलं नाही? नक्कीच तो कुठल्या तरी भानगडीत अडकला असला पाहिजे, नाही तर रस्त्यात असा एकटा चालला नसता.मग त्याला जुनी मैत्री आठवली. त्याला अशाप्रकारे अडकवणे योग्य नाही, असे त्याला वाटू लागले. शेवटी त्याने निश्चय केला, गोपाळचा पोलिसांसमोर अजिबात विषय काढायचा नाही.
ठाण्यात जाबजवाबादरम्यान रतनने खोटीच कहानी रचून सांगितली. ‘शेवटचे भाडे सोड्ून आपण घरी निघालो होतो तेवढ्यात दोघांनी हाताच्या इशार्याने गाडी थांबवली. आणि ते दोघे पिस्तूल दाखवून गाडीत घुसले. आणि जिथे गाडी बंद पडली होती,तिथंपर्यंत घेऊन आले होते. मी त्या गुंडांना म्हटलं की, गाडी आता गाडी सुरू होणं अशक्य आहे, तेव्हा ते उतरून जंगलाच्या दिशेने निघून गेले.’
‘पुढे काय झालं?’ इन्स्पेक्टर म्हणाला
‘झालं, मी मिस्त्रीला बोलवायला गेलो, परत आलो तेव्हा हे दोन साहेब तिथे होते.’
‘मग रक्त कसे लागले सीटला?’
‘ साहेब, मला काहीच माहित नाही. बहुतेक दोघा गुंडांपैकी कोणी तरी एकटा जखमी असावा.हा डाग त्याच्याच रक्ताचा असला पाहिजे.’
रतनने तर सांगितलं, पण पोलिसांना तो खोटं सांगतो आहे, असं वाटत होतं. तो आणि मिस्त्री कुठल्या तरी गुन्ह्यात सामिल असले पाहिजेत, असा पोलिसांचा संशय होता. रतन आणि मॅकेनिकला अटक करण्यात आली. रतनने बायकोला फोन केला, कारण ती नवरा घरी न आल्याने काळजीत होती.
दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात रतन आणि मॅकेनिकचा फोटो छापून आला. रात्रीच्या घटनेचा सगळा तपशील बातमीत दिला होता. इकडे पोलिस त्याला वारंवार विचारत होते, पण तो दोन गुंडांच्या कहानीवरच ठाम होता.
दुपारी बारा वाजता पोलिस ठाण्यात एक फोन आला. बोलणार्याने आपले नाव आणि पत्ता सांगितला आणि म्हटले, ङ्ग या रात्रीच्या केसची वस्तुस्थिती जाणून घ्यायची असेल तर मी सांगितलेल्या पत्त्यावर या. ङ्घ
फोन गोपाळने केला होता. पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहचले. तो अंथरुणावर पडला होता. हाताला पट्टी बांधली होती. तो म्हणाला, ‘ पेपरमधली बातमी वाचली. त्यात जे काही छापलं आहे, ते सगळं खोट आहे.’
‘मग खरं काय आहे?’ इन्स्पेक्टर म्हणाला
यावर गोपाळने रात्री जे काही घडलं,ते सगळं सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, ‘मी आणि रतन लहानपणापासूनचे मित्र आहोत. त्याला ठाऊक आहे, मी गुन्हेगारी क्षेत्रात आहे ते! काल रात्री मी आमच्या साथीदारांसोबत एका बंगल्यात चोरी करायला शिरलो होतो. पण तिथे आमच्या हाती काही लागलं नाही. परताना मी जखमी झालो. तेवढ्यात रतनने मला रस्त्यात पाहिले आणि टॅक्सी थांबवली. आम्ही दोघे खूप वर्षांतून भेटलो होतो. त्याने मला गाडीत बसवले. त्यावेळी माझ्या जखमेतून वाहणारे रक्त त्याच्या गाडीच्या सीटला लागले. मी त्याला काहीही सांगितलं नव्हतं. पण आज पेपरमध्ये वाचलं, तेव्हा लक्षात आलं की, त्याने पोलिसांना खरा प्रकार सांगितलाच नाही. मला वाचवण्यासाठी तो स्वत: गोत्यात यायला तयार झाला. मग अशावेळेला मी कसा गप्प बसू शकतो?’ बोलताना गोपाळला दम लागला.
‘पण याची काय गॅरंटी की तू खरे बोलतो आहेस ते?’ इन्स्पेक्टर म्हणाला. तेव्हा गोपाळ हसून म्हणाला, ‘ इतक्या दिवसांपासून खोट्याचं खरं करत आलो आहे, आणि आज खरं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते तुम्हाला खोटं वाटतं आहे. कमाल आहे!’
गोपाळ पोलिसांबरोबर ठाण्यात आला. रतनला भेटला. म्हणाला, ‘ मित्रा, माझ्यासाठी तू तुझे स्वत: चे आयुष्य गोत्यात घालायला निघाला आहेस? पोलिसांना खरे काय , ते सारे मी सांगितले आहे. माझा अपराध आपल्या शिरावर का घेतो आहेस?’...
रतन गोपाळचे फक्त ऐकत राहिला.नंतर गोपाळने बरीच विनंती केल्यावर रतनने खरा प्रकार पोलिसांसमोर कथन केला. आपल्या खोट्या कहानीबद्दल माफी मागितली. गोपाळला अटक करण्यात आली. व रतन आणि मिस्त्री यांची सुटका झाली.
जाताना रतन म्हणाला, ‘पण मित्रा, हे सत्य तुला महागात पडेल. पोलिस तुला सोडणार नाहीत.’
‘मित्रा, मला वाचवण्यासाठी तू अडचणीत यावास, हे मला कसे रुचेल बरं? आणि असे मी कदापि घडू देणार नाही. तू मैत्रीचे कर्तव्य पार पाडलेस, पण मग ते मी कसा विसरू? अरे, माझ्या खर्या बोलण्यानं कदाचित माझं पुढचं आयुष्य तरी तुझ्या इच्छेप्रमाणं बदलून जाईल.’ असे म्हणत गोपाळ हसला. आणि पटकन रतनच्या डोळ्यांत पाणी आलं.
No comments:
Post a Comment