पर्यावरणाचा धोका वेळीच लक्षात घेऊन सावधगिरी बाळगली तर संभाव्य नुकसान टाळता येते आणि जीवन समृद्धपणे जगता येते.हाच धोका एका गावाने वेळीच ओळखला आणि त्यांनी आपले जीवन सुखमय करून टाकले. हे गाव आहे, सिक्क्कीमपासून 125 किलोमीटर अंतरावरचं लाचेन. ते उत्तरीय सिक्कीम भागात मोडतं. या गावात एकही पाण्याची पॅकबंद बाटली गावात येणार नाही, त्याचबरोबर प्लॅस्टिक किंवा थर्माकोलची डिस्पोजल भांडीदेखील दिसणार नाही, असं गावानं ठरवून टाकलं. तशी व्यवस्थाही करून टाकली.
कधी काळी गावात वर्षभर थंडी असायची. जोसेफ डल्टन हुकर या ब्रिटिश भटक्या माणसाने 1855 मध्ये द हिमालय जर्नल मध्ये या गावाला जगातलं सर्वात सुंदर गाव म्हणून घोषित करून टाकलं होतं.याच गावानं आता आपल्या निश्चयानं नव्यानं कात टाकली आहे. तिबेटवर चीनचा अधिकार नव्हता, त्यावेळी म्हणजे 1950 च्या दरम्यान लाचेन सिक्कीम आणि तिबेटच्या दरम्यान व्यापाराचं केंद्र म्हणून काम करत होतं. नंतर हे ठिकाण दीर्घकाळापर्यंत सामान्यांसाठी, पर्यटकांसाठी बंद होतं. सीमेवरील परिस्थिती निवळल्यावर पर्यटक पुन्हा या गावाकडे आकर्षित होऊ लागले. राज्य सरकारने या गावाला हेरिटेज व्हिलेज म्हणून जाहीर केले. वाढते पर्यटक आणि त्यांच्यामुळे आलेली सुबत्ता व त्यातून निर्माण झालेली पैशाची गुर्मी यामुळे इथल्या लोकांना कळलंच नाही की,उन्हाळा इथे येऊन कधीचा स्थिरावला आहे. बाराही महिने आल्हादायक हिवाळ्यात न्हाऊन निघणार्या या गावाला उन्हाचे चटके बसायला लागले होते.डासांची पैदास वाढत होती.पाऊसमान कमी झाला होता आणि त्याच्या पडण्याला काळवेळही राहिला नव्हता.गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवतं होतं.पाण्याअभावी गावाचा संरक्षक असलेला गुरुडोंगमार सरोवरदेखील धोक्यात आला होता.परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती.आपली चूक लोकांच्या लक्षात आली.गाव आणि आपलं अस्तित्व संकटात सापडलं आहे, याची जाणीव त्यांना झाली. आणि वैश्विक जलवायू परिवर्तनाचा हा परिणाम आहे, हेही त्यांना कळून चुकलं.
यानंतर मात्र गाव सावध झालं. पहिल्यांदा गावानं पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांवर निर्बंध घातले.येणार्या पर्यटकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वत: गावाने उचलली.डिस्पोजल प्लेटांवरही बंदी घातली.बायो-डिग्रेडॅबल कचरा वेगळा करणे आणि त्याची व्यवस्था लावणे ही कामेदेखील स्वत: गाववाले करू लागले.प्लॅस्टिकची कुठलीही वस्तू गावात येणार नाही,याची दक्षता गाववाले घेऊ लागले.बाटलीबंद पाणी आणणे आणि विकणे हा इथे गुन्हा ठरवला गेला.पर्यटकांना गावाच्या सीमेवरच याची कल्पना दिली जाऊ लागली.
आता हा सगळा बदल कायद्यापेक्षा स्वयंशिस्तीने आणि आपले अस्तित्व टिकवण्याच्या जिद्दीतून झाला आहे. अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्येदेखील बाटलीबंद पाण्याला बंदी आहे.बाटलीबंद पाण्याला बंदी घालणारे लाचेन हे जगातले दुसरे ठिकाण आहे.पर्वतीय पर्यटन ठिकाण असलेल्या लाचेन गावानं इतरांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय आपल्या देशासह सार्या जगात वाढला,फुलला आहे. जलजंतूंच्या आजारामुळे घाबरलेला समाज स्वच्छ पाण्यासाठी स्वत:ची फसवणूक करून घेत आहे.पॅकबंद बाटलीतून स्वच्छ पाणी मिळेल, अशी खात्री देता येत नाही. इतका याचा गोरखधंदा माजला आहे. शिवाय पॅकबंद बाटलीच्या वाढत्या धंद्यामुळे पर्यावरणालाच धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत उत्तरीय सिक्किममधल्या लाचेन गावाचा निग्रह हा एक आशेचा किरण ठरला आहे.
No comments:
Post a Comment