दूरचित्रवाणीची खिल्ली उडविण्यासाठी त्याच्या संचाला इडियट बॉक्स म्हटलं जातंय, हे खरंय. पण ती खिल्ली कामधाम सोडून टीव्हीपुढे बसून राहणार्या रिकामटेकड्या लोकांची असते. दूरचित्रवाणी संच आता इडियट बॉक्स राहिला नाही; तर आपली मतं बनविण्याचं आणि त्यावरून निर्णय घेण्याचं प्रभावी माध्यम झालंय. वस्तूत: हे निरीक्षण नोंदविण्यासाठी कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही. आपणच आपल्या दैनंदिन व्यवहाराचे अवलोकन केले असता टीव्ही पाहून आपण कितीतरी मतं बनविली आणि निर्णय घेतल्याचे ध्यानात येते.
टीव्हीने सर्वांसाठीच आपली उपयुक्तता सिध्द केली आहे. भारतातील रिकामा माणूस दिवसभर स्वत:ची करमणूक करू शकतो. महिला वर्गांसाठी ’सास बहू’वाल्या मालिकांचा तर भडिमार आहेच. मुलं कार्टून शो पाहून घरात गडबड गोंधळ न करता शांतता ठेवू शकतात. ज्ञानलालसा असलेल्या व्यक्तींना टीव्हीतून ज्ञानही मिळतं. शिवाय त्यातून माहितीचा तर खजिनाच बाहेर पडत असतो. भारतात हल्ली राजकीय मतंही टीव्ही पाहून व्यक्त होतात. एखादं प्रॉडक्ट जाहिरातीच्या प्रभावाखाली येऊन खरेदी केलं जातं. माणसाच्या जीवनाला टीव्हीने व्यापून टाकले आहे.
दूरचित्रवाणीचा शोध 19 व्या शतकाच्या अखेरीस लागला असला तरी भारतात टीव्हीचे प्रसारण सुरू व्हायला1959 साल उजाडले. दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेले प्रसारण 1965 पासून दररोज आणि नियमित होऊ लागले. 1972 मध्ये मुंबई आणि अमृतसरपर्यंत या प्रसारणाची कक्षा रुंदावली. 1975 पर्यंत तर देशातील केवळ सात शहरांतच टीव्ही दिसत होता. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने देशभर आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण सुरू झाले.. खासगी वाहिन्या आल्या, केबल टीव्ही सुरू झाले अन् मानवी जीवनावरील टीव्हीचा प्रभाव वाढतच गेला.
संयुक्त राष्ट्रसंघाने हा प्रभाव ओळखून17 डिसेंबर 1996 साली एक ठराव पारित करून 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून जाहीर केला. दूरचित्रवाणीवरून प्रसारित होणार्या कार्यक्रमांमधून जागतिक शांतता, सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक विकासावर दृष्टिक्षेप टाकणारे असतात. त्यामुळे सध्या टीव्हीचे महत्त्व वाढलेले आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केले. समकालीन जगात संपर्क आणि जागतिकीकरणाचे दूरचित्रवाणी हे एक प्रतीक असल्याचेही’युनो’ने नमूद केले आहे. पूर्वीच्या काळी'दूरदर्शन' ही एकमेव वाहिनी दर्शकांसाठी उपलब्ध होती आणि तीही दिवसातून ठराविक काळासाठीच हे ऐकले तर नवल वाटले. परंतु हे खरे आहे. संध्याकाळी दूरदर्शनचे कार्यक्रम सुरू होण्याअगोदर दूरदर्शन संचावर असलेल्या मुंग्या पाहणे नशिबी असे. कार्यक्रमाची वेळ होताच ती प्रसिद्ध धून चालू होऊन धुरकट वर्तुळातून दूरदर्शनचे बोधचिन्ह आकारास येत असे आणि नंतर कार्यक्रम सुरू होत असत. सुरूवातीला चढ्या किंमतींमुळे मोजक्याच लोकांकडे दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहायला धावपळ करावी लागे. सामान्य लोक टीव्हीच्या शोरूमपुढे घोळक्याने उभारून दूरचित्रवाणी संच पाहण्याचा आनंद घेत असत. पंतप्रधान इंदिरा गांधींची31 ऑक्टोबर 1984 रोजी हत्या झाली. शहरवासीयांना मोठा धक्का बसला. दूरचित्रवाणीचे प्रसारण नुकतेच सुरू झाल्यामुळे इंदिराजींची अंतिमयात्रा पाहून त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी चौक, गल्लीबोळात टीव्हीचा संच लावून इंदिराजींचा अंतिम प्रवास पाहण्याची सोय करण्यात आली होती.
1991 पासून खासगी दूरचित्रवाहिन्यांना प्रारंभ झाला. स्टार टीव्हीने पाया रचला. आज एक हजाराहून अधिक टीव्ही वाहिन्या आहेत. 1990 चे आखाती युद्ध जगभरात दिसले. 1984 साली केबल टीव्हीचा प्रसार झाला. संगीत, चित्रपट, वृत्त, निसर्ग, अँक्शन, धार्मिक, मुलांसाठी, विनोदी, फॅशन, खाद्यपदार्थ, पर्यटन अशा कित्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वाहिन्या आहेत. केबलचालकांच्या अडथळ्याविना आपल्याला हव्या त्या वाहिन्या पाहण्यासाठी डीटीएच सेवा सुरू झाली. आता मोठया शहरातील प्रत्येक घरात टीव्हीसाठी ’सेट टॉप बॉक्स’ बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या आपल्या मोबाईलवरदेखील लाइव टीव्ही पाहण्याची सोय झाली आहे.कुठे प्रवासात,बाहेरगावी असलात तरी आपल्याला आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहता येतो.नव्या तंत्रज्ञान युगात टीव्ही आपल्या आणखी जवळ आला आहे. आपला झाला आहे.तो आता इडियट बॉक्स राहिला नाही तर आपला जिवलग मित्र झाला आहे.
No comments:
Post a Comment