जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचालित महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोहिनी दरेप्पा चव्हाण (वय 17) हिने जपान येथे सुरू असलेल्या युवा आशियाई वेटलिप्टिंग स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून दिले. याअगोदरच्या दोन वेळा युवा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच मोहिनीने पेनांग (मलेशिया) येथे झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
महिन्याभरात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दोनदा पदके पटकावली आहेत. जतसारख्या दुष्काळी तालुक्यात अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मोहिनीने भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. आशियाई स्पर्धेत मोहिनीने स्नॅच प्रकारात,68, तर जर्क प्रकारात 85 किलो असे एकूण 153 किलो वजन उचलले आहे. या स्पर्धेत 48 किलो वजनी गटात मोहिनीने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
मोहिनी चव्हाण ही उमदी येथील एम.व्ही. हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. ती सध्या पतियाळा(पंजाब) येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात सराव करते आहे. तिथून ती परस्परच जपानला गेली आहे.तिला आंतरराष्त्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक संजय नांदणीकर मार्गदर्शन करत आहेत. जत तालुक्यातल्या मोहिनीने आपल्या कामगिरीच्या जोरावर या स्पर्धेत सर्वांवर खऱया अर्थाने मोहिनी घातली. यापूर्वी थायलंडमधील आशियाई स्पर्धेत चौथी, दोहा येथील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, जानेवारीत पार पडलेल्या जागतिक वेटलिफ्टिंगमध्ये सातवी आलेल्या मोहिनीने या स्पर्धेत कामगिरी उंचावत देशाच्या नावावर पदक नोंदविले.
मोहिनीची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. जत तालुक्यातील उमजी हे तिचे मूळ गाव. तेथील एम. व्ही. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये ती अकरावीच्या वर्गात शिकते आहे. तिच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वीच देहावसान झाले असून, आई नर्सिंगचे काम करते. मोहिनी वेटलिफ्टिंग सोडण्याच्या विचारात असतानाच तिला हे पदक मिळाले आहे.
मोहिनीला आर्थिक मदतीची गरज
वेटलिफ्टिंगमध्ये मोहिनीला चांगले भविष्य असले, तरी आर्थिक परिस्थितीअभावी तिच्या कामगिरीवर मर्यादा येत आहेत. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते आगामी काळात ऑलिंपिकसाठी ती भारताची ओळख ठरू शकते. त्यादृष्टीने तिला सरकारकडून मदत मिळणे आवश्यक आहे. वेटलिफ्टिंग खेळत राहावे अथवा नाही, या सीमारेषेवर असलेल्या मोहिनीला सरकार मदत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मोहिनी चव्हाण हिचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते. वर्षभरापूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर प्राचार्य एस. के. होर्तीकर यांनी तिला मदत केली. मोहिनी हिला एक भाऊ, बहीण असून,तिची आई प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका आहे.
No comments:
Post a Comment