Saturday, November 26, 2016

मुलींचा सन्मान करणार्‍या पिपलांत्रीचा आदर्श घ्या


     देशातल्या कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाया  करून भागणार नाही तर लोकांच्या मानसिकेतही बदल घडविण्याची आवश्यकता आहे.  देशातली न्यायालयेदेखील वारंवार हेच सांगत आहेत. समाजाला मुलींचे महत्त्व कळायला हवे. यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. एका बाजूला लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होत असताना दुसर्‍या बाजूला मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे विदारक चित्र थांबायला हवे. असं घडलं तर देशातल्या मुली सुरक्षित राहतील, अन्यथा समाजात अराजकता माजेल. दिल्लीसह देशातल्या विविध भागात होत असलेले अत्याचार आपल्याला  धोक्याची घंटा असल्याचेच सूचित करत आहे. कायद्याने सगळेच प्रश्‍न सुटतात असे नव्हे तर लोकांमधली जागृती म्हत्त्वाची ठरते. आपल्या देशातल्या काही भागात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी जरूर प्रयत्न होत आहेत, आणि त्यांचा चांगला रिझल्ट आपल्या हाती येत आहे. असेच एक उदाहरण आहे ते राजस्थानमधल्या पिपलांत्री या छोट्याशा गावातले. हे  गाव फक्त मुली वाचवण्याचा प्रयत्न करत नाही तर त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे कार्यही करत आहे. विशेष म्हणजे हे सारे सामुदायिक सहयोगातून होत आहे.
     राजसमंद जिल्ह्यातल्या पिपलांत्री या गावातले  माजी सरपंच श्यामसुंदर पालीवाल यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर या महत्त्वपूर्ण कार्याला सुरूवात झाली. सरपंचांनी आपल्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडे लावायला सुरूवात केली. यामुळे लोकांमध्ये स्फुलिंग चढले. गावाने बदलाच्या स्वरुपात पाहात अंगीकार केला. पिपलांत्री गावात एकाद्या घरात मुलगी जन्माला आली तर गावातले लोक तिच्या जन्माचे स्वागत एकशे अकरा झाडे लावून करतात. फक्त झाड लावून ही मंडळी गप बसत नाही तर त्याच्या संरक्षण आणि संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारतात. या अनोख्या उपायांचे जोरदार स्वागत होत असून साहजिकच गाव हिरवाईने नटून गेले आहे. गावाने चक्क हिरवा शालू पांघरला आहे, असे चित्र गावात गेलेल्या पाहुण्या-नातेवाईकांना किंवा भेट द्यायला गेलेल्या लोकांना वाटल्याशिवाय राहत नाही. या गावात दोन मोठे बदल घडले आहेत. पहिला बदल हा मुलींच्याबाबतीत सामाजिक दृष्टीकोन ठेवून आलेला आहे. दुसरा बदल म्हणजे मोठ्या प्रमाणात फळवृक्षांची लागवड झाल्याने गाव पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध झाले आहे.इतकेच नव्हे तर गावातल्या लोकांना या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला आहे.
     गावातल्या एखाद्या घरात मुलगी जन्माला आली तर तिच्या आई-वडिलांना एक शपथपत्र लिहून द्यावे लागते. यात काही अटी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर मुलगी  कायद्यानं सज्ञान झाल्याशिवाय तिचा विवाह करायचा नाही. तिची मधेच शाळा सोडायची नाही आणि तिच्या जन्माच्या वेळी लावलेल्या झाडांचे संगोपन करायचे इत्यादी इत्यादी. या सकारात्मक कार्याबरोबरच आणखी एक महत्त्वाचे काम केले जाते, तेम्हणजे मुलीच्या वडिलांकडून दहा हजार रुपये घेतले जातात. त्यात गावाने गोळा केलेल्या वर्गणीतून 21 हजार रुपये मिसळले जातात. ही सर्व रक्क्म मुलीच्या नावाने ती वीस वर्षांची होई तोपर्यंत बँकेत ठेव स्वरुपात ठेवली जाते. हुंडा हा समाजाला लागलेला कलंक आहे. स्त्री भ्रूण हत्येमागे हेही एक कारण आहे. त्यामुळे तिच्या भविष्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने ही रक्कम ती जन्मताच तिच्या नावावर ठेवली जाते. वीस वर्षात ही रक्कम दुप्पट-तिप्पट होते.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपल्या देशात कडक कायदे आहेत. गर्भलिंग तपासणी प्रतिबंध कायदा आहे. इतकेच नव्हे तर स्त्री भ्रूण हत्या करणार्‍याला आणि करायला लावणार्‍याला म्हणजे दोघांनाही कायद्यानम शिक्षेची तरतूद  आहे. पण तरीही  समाजातली ही स्त्री भ्रूण हत्या करण्याची मानसिकता थांबलेली नाही. उलट ती वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या तीन दशकात जवळपास सव्वा कोटी स्त्री भ्रूण हत्या झालेल्या आहेत. याचा परिणाम आपल्या समोर असून मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमालीची घटलेली आहे. आजच्या घडीला एक हजार मुलांमागे सरासरी नऊशे चौदा इतकी मुलींची संख्या राहिलेली आहे. पुढच्या काळासाठी हे काही चांगले संकेत नव्हे, हे सांगायला काही भविष्यवेत्त्यांची गरज नाही. 
     एकिकडे मुलींच्याबाबतीत अशी पशूवत वागणूक चालली असताना आणि मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंताजनक अवस्थेत पोहचली असताना राजस्थानातल्या पिपलांत्रीसारख्या छोट्याशा गावात मुलीचा केवळ सन्मान केला जात नाही तर तिच्याबरोबरच पर्यावरण वाढीचीही जबाबदारी सामुदायिकरित्या उचलली जात आहे. गावाने समाजाला खूप मोठा संदेश दिला आहे. पर्यावरण राहिले नाही तर सजीवसृष्टी धोक्यात आहे. आणि समाजात मुली नसतील तर समाजच उरणार नाही. मुलगी राहिली आणि शिकली तरच समाज पुढे जाणार आहे. हा परस्परांशी सांगड घालणारा संदेश गाव देत आहे. एक छोट्ंस गाव हे करू शकतं तर त्यांच्यापेक्षा किती तरी अधिक शिकलेल्या, आधुनिक आणि विकसित समजल्या जाणार्‍या शहरांनी करायला काय हरकत आहे? सर्व काही शक्य आहे, पण एका मजबूत अशा इच्छाशक्तीची गरज आहे. 

No comments:

Post a Comment