Saturday, November 26, 2016

बँकांनी ग्राहकांना कॅशलेस व्यवहाराचे प्रशिक्षण द्यावे


कॅशलेस व्यवहाराची आज गरज आहे. कॅशलेस व्यवहार ग्राहकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. बँकेच्या विविध पर्यायांद्वारे सर्वसामान्य नागरिक कोणतीही रोख रक्कम न देता जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या व्यवहारांची स्वतंत्र नोंद ठेवण्याची गरज भासणार नाही. शिवाय, त्यातून कर चुकवेगिरीला पूर्णपणे आळा बसेल. विशेषत: ग्रामीण भागात याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.यासाठी  बँकांनी आपल्या ग्राहकांना  प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. वीजबिल भरणा, खरेदी, मोबाईल, डिश रीचार्ज करण्यासाठी रोख पैशांची आवश्यकता नाही. मोबाईलद्वारे हे व्यवहार करण्यासाठी अँप असणे आवश्यक आहे. अ‍ॅपद्वारे आर्थिक व्यवहार घरबसल्या करता येतात. इन्स्टंट मनी ट्रान्सफरद्वारे मोबाईल नंबर आणि पिनकोडचा वापर करून इतरांना पैसे पाठविता येणार आहेत. या व्यवहारात पैसे स्वीकारणार्‍या व्यक्तीला विशिष्ट पिन क्रमांक पाठविला जात आहे. त्यामुळे कोणत्याही एटीएम मशिनमधून कार्डशिवाय पैसे काढणे शक्य झाले आहे. यासाठी ’आयएमटी’चा पर्याय ग्राहकांना निवडावा लागेल. याशिवाय, ग्राहकांना मोबाईल अँपद्वारे जागेवर बसून बँकेच्या रांगेत नंबर लावणे शक्य आहे. त्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. बँकेच्या वतीने कॅशलेश व्यवहारासाठी ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यामध्ये ग्राहक नेटबँकिंगद्वारे प्रतिदिन 1 लाख रुपयांचा व्यवहार करू शकतात. तसेच, अँपद्वारे मोबाईल प्री-पेड, पोस्पेड रिचार्ज, डीटीएच रिचार्ज करू शकतात. तसेच, 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार करणे शक्य आहे. मात्र या गोष्टी करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.यात इतरांची मदत घेताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहाराचे प्रशिक्षण द्यावे व त्यांना अर्थसाक्षर करावे.

No comments:

Post a Comment