देशातील सर्वसामान्य जनता दोन-चार हजार रुपयांसाठी बँकांच्या दारात ताटकळत उभी असताना कर्नाटकाच्या माजी मंत्री गाली जनार्दन रेड्डी यांची मुलीचा विवाह मात्र परवा बेंगळूर येथील पॅलेस ग्राऊंडवर मोठ्या शाही थाटात पार पडला.हैद्राबाद येथील उद्योजक राजीव रेड्डी यांच्याबरोबर ब्राम्हणीचा विवाह झाला. या शाही विवाहाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असली तरी यामुळे सर्वसामान्यांचा आ वासला आहे. इतका मोठा शाही विवाह सध्याच्या ताईट वातावरणात होतोच कसा, असा सवाल जिकडेतिकडे उपस्थित केला जात आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. आणि या विवाहाची पारदर्शिकता सर्वांपुढे येण्याची आवश्यकता आहे. या विवाहामुळे देशातले वातावरण संशयास्पद आणि गढूळ होऊ लागले आहे.
या विवाहाची राज्यसभेनेही दखल घेतली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 1000 व 500 च्या नोटांवर बंदी घातली आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे सुरुवातीला स्वागत झाले. आता आपल्याच खात्यातील दोन हजार रु. काढण्यासाठी सामान्य माणसाला चार-चार तासाहून अधिक काळ बँकांसमोर रांगेत उभे रहावे लागत आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे कठोर पाऊल उचलले गेले असले तरी याचा मोठा फटका सामान्यांनाच बसला आहे. सेलिब्रिटी,पुढारी,उद्योजक,व्यापारी यांच्यावर कुठलाच परिणाम जाणवला नाही. ही मंडळी कुठेच रांगेत उभारल्याचे दिसले नाही. त्यातच नोटाबंदी करून दहा दिवस उलटून गेले तरी परिस्थिती बदलायचे नाव घेत नाही. अशा परिस्थितीत इतका मोठा शाही विवाह होतोच कसा, असा सवाल उपस्थित होणे, साहजिकच आहे. सुट्या,लहान नोटांची चणचण या विवाहात भासलीच नाही का, का अशा नोटांची तजवीज अगोदरच करण्यात आली होती, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या विवाहामुळे लोकांच्या मनात असंख्य प्रश्नांचा मोहोळ उठला आहे, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळायला हवीत. आणि हा त्यांचा हक्क आहे. जनार्दन रेड्डी यांच्या कन्येच्या विवाहासाठी 500 कोटी खर्च झाले आहेत. ही बातमी साऱयांनाच अस्वस्थ करणारी ठरली आहे. नाही तर समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
लग्न हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असलातरी लग्नासाठी किती पैशाचा चुराडा करावा याचा विचार सध्याच्या नोटांच्या आणीबाणीच्या परिस्थितीत होऊ लागला आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता हा विवाह पुढे टाळण्याची आवश्यकता होती. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी हा श्रीमंती थाट मात्र सामान्य लोकांना अस्वस्थ करून सोडत आहे. लोकांमध्ये संताप खदखदत आहे. त्यामुळे या विवाहाची चौकशी हो ऊन सत्य बाहेर येण्याची गरज आहे.
आपल्या श्रीमंतीचा थाट दाखविण्यासाठी जनार्दन रेड्डी यांनी पॅलेस मैदानावर 200 कोटी खर्चून जणू देवलोकच उभारला होता, अशी चर्चा होत आहे. या शाही मंडपात विजयनगर साम्राज्य, बळ्ळारी शहराचा काही भाग, ऐतिहासिक हंपी आणि तिरुमला मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती म्हणे. या शाही विवाहाची देशातीलच नव्हे तर विदेशातील माध्यमांनीही दखल घेतली. जनार्दन रेड्डी हे भाजपचे नेते आहेत. बी.एस. येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्रीपदावर असताना बेकायदा खाण घोटाळयासंबंधी त्यांना अटक झाली होती. बळ्ळारी ही त्यांची राजधानी असल्याचे बोलले जाते. इथे त्यांनी कित्येक वर्षे राज्य केले आहे. बळ्ळारी आणि शेजारच्या आंध्र प्रदेशात खाण व्यवसायातून मिळालेली माया आणि त्यानंतर त्याच्या जोरावर मिळवलेली सत्ता इथे मोठा चर्चेचा विषय आहे.
शाही विवाहांवर कायद्याचा चाप लावण्यासाठी कर्नाटकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. देवराज अरस आणि एस. एम. कृष्णा यांच्या राजवटीत खाजगी विधेयक आणण्याचे प्रयत्न झाले. यासाठी सिद्धरामय्या सरकारचेही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. लग्न समारंभाच्या निमित्ताने होणारी अन्नाची नासाडी आणि पैशाचा चुराडा रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी जुनीच आहे. काही माणसांना संपत्तीचे प्रदर्शन घडविण्याचा रोग असतो. जनार्दन रेड्डींनाही तो रोग आधीपासूनच आहे.कर्नाटक-आंध्र प्रदेशमधील नैसर्गिक संपत्तीची लूट करून गडगंज माया गोळा करणाऱया जनार्दन रेड्डी यांची चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही. विविध न्यायालयात त्यांच्यावर खटले सुरू आहेत. तपास यंत्रणांनी त्यांची बँक खाती गोठवलेली असताना लग्नासाठी 500 कोटीचा खर्च ते कसे करू शकले असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या शाही विवाहाला मोठमोठी असामी उपस्थित होती. लग्न कसे आणि कुठे करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असलातरी दुष्काळात असा घाट हवा होता का? राजकारण आणि समाजकारणात असणाऱयांनी तर किमान याचा विचार करायला नको का असा प्रश्न सर्व सामान्यांसमोर पडला आहे. कर्नाटकात दुष्काळाचे भीषण सावट आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा विपरीत परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोटा बंदीच्या निर्णयामुळे आपल्याच खात्यातील दोन हजार रु. काढण्यासाठी बँकांसमोर तास न् तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. सुरुवातीला देशहिताचा विचार करून या निर्णयाचे स्वागत करणारेच आता त्रासामुळे सरकारला खडे बोल सुनावत आहेत. लोकांमधून आता संताप व्यक्त हो ऊ लागला आहे. काळया पैशाच्या मुद्यावर देशभरात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या या माजी मंत्र्याने कन्येच्या विवाहासाठी केलेला खर्च आता लोकांच्या डोळ्यांसमोर येऊ लागला आहे. हा विवाह सोहळा अलीकडेच झालेल्या म्हैसूर राजघराण्याच्या युवराजाच्या विवाह सोहळयापेक्षाही दिमाखदार होता, असे सांगतले जात आहे. त्यामुळे या विवाहाची चौकशी व्हायलाच हवी, आणि नोटाबंदीमुळे भरडला जात असलेल्या लोकांना या विवाहाचा पारदर्शीपणा दिसायला हवा. नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल. या विवाहाचा शाही थाटमाट सरकारला,भाजपला आणि देशाला धोकादायक ठरू नये, याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
No comments:
Post a Comment