'सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत' या कवी मंगेश पाडगावकर यांच्या या कवितेची प्रकर्षाने आठवण होत आहे. कारण कळस गाठला आहे. महागाईने लोकांचं जिणं मुश्किल करून टाकलं आहे. महागाई आटोक्यात येण्याचे दूरदूरपर्यंत तरी चिन्हे दिसत नाहीत. उलट महागाईचा ग्राफ आणखी वाढणार अशीच शक्यता दिसत आहे. त्यामुळे कसं जगावं, असा प्रश्न लोकांपुढे पडला आहे. दोन दिवसांपूर्वी सांख्यिकी विभागाने किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. या वर्षी जानेवारीमध्ये किरकोळ महागाई 6 दशांश 1 टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या सात महिन्यांतील हा उच्चांक आहे. रिझव्र्ह बँकेने ठरवून दिलेल्या दोन ते सहा टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा महागाईचा दर गेला असल्याने ही आणखी चिंतेची बाब आहे. जर महागाई या मर्यादेत राहिली तर ती मध्यवर्ती बँकेसाठी अडचण ठरत नाही, परंतु या कक्षेबाहेर गेल्यावर महागाई मोठे संकट बनते.
मात्र, सध्या तरी चलनवाढीपासून दिलासा मिळण्याची आशा नसल्याचे संकेत रिझर्व्ह बँक आधीच देत आहे. या महिन्यात, धोरण दरात बदल न करून पतधोरण समितीने हेही स्पष्ट केले आहे की, आपण कोणताही धोका पत्करण्याच्या स्थितीत नाही. वाढत्या धोरणात्मक दराचा परिणाम महागाईत आणखी वाढ होण्याच्या रूपाने समोर आला असता. पण हे प्रकरण केवळ किरकोळ महागाईपुरते मर्यादित नाही, तर घाऊक महागाईचा दरही गेल्या दहा महिन्यांपासून दुहेरी आकड्यांमध्ये राहिला आहे.जानेवारीत महागाई वाढण्याचे कारण खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारीमध्ये खाद्यपदार्थांची महागाई 10.33 टक्क्यांवर पोहोचली, तर डिसेंबर-2021 मध्ये ती 9.56 टक्के होती. जानेवारीमध्ये भाज्यांचे भाव पस्तीस टक्क्यांहून अधिक वाढले होते, तर डिसेंबरमध्ये हा आकडा एकतीस टक्क्यांहून अधिक होता. तृणधान्ये, डाळी, तांदूळही महाग झाले. म्हणजेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
देशावर महागाईबरोबरच बेरोजगारीसारखे गंभीर संकट उभे असताना अन्नधान्य असेच महाग होत राहिले, तर सामान्य माणूस जगणार कसा, हा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असल्याचा दावा करत असले तरी वास्तव कोणापासूनही लपलेले नाही. अशा स्थितीत महागाई दिवसेंदिवस क्लेशदायक ठरत आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीपासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत ते ज्या पातळीवर टिकून आहेत, तेही आगीत तेल ओतण्याचाच प्रकार आहे. आणि या किमंती कमी होतील, असे चान्सेसही दिसत नाही. त्यामुळे सामान्य माणसाने काय करायचे हा मोठा प्रश्नच आहे.
प्रदीर्घ काळापासून प्रचलित असलेला महागाईचा कल कोठूनही, विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गासाठी चांगले लक्षण मानता येणार नाही. गेल्या दोन वर्षांत देशातील चोऱ्याऐंशी टक्के कुटुंबाच्या आमदानीत लक्षणीय घट झाली आहे. स्पष्टच सांगायचं तर, लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. ज्यांच्याकडे जे काही उरलेसुरले आहे, तेही भविष्याच्या भीतीने खर्च करणे टाळत आहेत. केवळ खाद्यपदार्थ महाग होत आहेत, असे नाही, तर कपडे, इंधन, वीज, वाहतूक क्षेत्रातील दरवाढही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही.
किरकोळ क्षेत्रातील खाद्येतर वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ ही चिंताजनक आहे कारण त्यांच्या किमती वाढल्या की कमी होणार नाहीत. वस्तूंच्या निर्मितीचा खर्च ग्राहकांकडून कंपन्या उचलतात. आणखी एक संकट आहे आणि ते म्हणजे जगातील महाग कच्चे तेल. सध्या युक्रेनवरील तणावामुळे ते आणखी महाग होत आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोल आणि डिझेलवर मोठा दिलासा देऊन सर्वसामान्यांना महागाईच्या तडाख्यापासून वाचवण्याइतके केंद्र व राज्य सरकार फारसे दयाशील नाही,हे आता आपल्याला कळून चुकले आहे. उलट या येत्या काळात जनतेच्या अडचणी आणखी वाढणार हे उघड आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment