सर्व जनजागृती मोहिमा आणि अनेक अपघातांची उदाहरणे समोर असतानाही तरुणांमध्ये जीवावर उदार होऊन सेल्फी काढण्याची किंवा धोकादायक ठिकाणी किंवा तशा परिस्थितीत फोटो काढण्याची हौस काही कमी होताना दिसत नाही. हे खरे तर चिंताजनक आहे. तरुण पिढी रेल्वे रुळांवरून येणा-या गाड्यांसमोर, उंच डोंगर, पूल इत्यादींच्या धोकादायक उंचीवर जाऊन सेल्फी काढताना, किती किशोरवयीन आणि तरुण-तरुणींचा मृत्यू झाला, याची नेमकी माहीत उपलब्ध नाही. मात्र अशा घटनांच्या बातम्या सर्रास सर्वच वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सवरून येत असतात. याबाबत बरीच चर्चा झाली आहे, होते आहे. शाळां-कॉलेजांमध्ये जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या आहेत, पण आश्चर्याची बाब म्हणजे अशा घटना कमी होताना दिसत नाहीत.
किल्ल्यासोबत सेल्फी काढताना पाय घसरल्याने दरीत कोसळून एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना मुरुड जंजिरा येथे घडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक ताजी दुःखद बातमी समोर आली आहे की, गुरुग्राममध्ये रेल्वे रुळांवर व्हिडिओ बनवणाऱ्या चार तरुणांना अशाच प्रकारे गाडीखाली येऊन आपला जीव गमवावा लागला. त्या तरुणांना या धोक्याची कल्पना नव्हती यावर विश्वास ठेवता येत नाही, पण धोक्यांशी खेळण्याचे आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्याचे त्यांना इतके वेड लागले होते की, ड्रायव्हरने वारंवार सायरन वाजवूनही ते रुळावरून बाजूला झाले नाहीत.त्यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीखाली आले आणि आपला जीव गमावून बसले.
जेव्हापासून प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि इंटरनेट आले आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर तरुणांची सक्रियता वाढली आहे. अनेक तरुण-तरुणी खूप सर्जनशील काम करत असले, सिनेमे वगैरे बनवून पैसे कमावत असले, तरी कित्येकांना तिथे नुसते फोटो टाकून लाईक्स मिळवण्याचे फॅड मोठ्या संख्याने वाढल्याचे दिसत आहे. युट्युबवर त्यांचे चॅनल चालवणे, व्हिडीओ टाकणे आदी मोफत व्यवस्था असल्याने अनेक तरुण स्ट्रीट फूड, डोंगर-नद्यांचा सैरासपाटा, प्रसिद्ध ठिकाणांची माहिती देणारे व्हिडिओ टाकताना दिसतात.
काहीजण स्वयंपाकाच्या पाककृती टाकत आहेत, तर काहीजण आरोग्य, योगासने, आयुर्वेद इत्यादींचे अर्धवट ज्ञानाचा रतीब घालत आहेत. 'हंसी-मजाक'वाले फोटोही स्वस्तात सहज आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहेत. साहजिकच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ, विनोद आणि व्यंगचित्रांचे अक्षरशः पेव फुटले आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या कंटेंटचा बाजार भरला आहे. आजकालचे तरुण त्यातले कंटेंट स्वत:साठी निवडतात आणि मग त्यांच्या प्रभावाखाली ते स्वतःही तेच कंटेंट देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. गुरुग्रामच्या ताज्या दुर्घटनेत रेल्वेखाली ठार झालेल्या चार तरुणांचाही असाच जोश असावा. वेगवान ट्रेनसह काही तरी रोमांचक फोटो -व्हिडीओ मिळविण्याचा प्रयत्न होता.
वास्तविक, आजच्या तरुण पिढीचे साहसही सोशल मीडियामुळे दर्जाहीन होऊ लागले आहे. केवळ फोटो काढणेच नाही, तर गाण्याचा आणि संगीताचा छंदही इतका बेसुमार वाढला आहे की ते सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकताना आणि म्हणताना दिसतात. ते घरी असोत, रस्त्याने चालत असोत किंवा गर्दीच्या ठिकाणी असोत, रस्ता ओलांडताना कानाला इयर प्लग लावून गाणी ऐकताना आणि जोरजोरात नाचताना दिसतात. सगळं विचित्रच चाललं आहे.
गाडी चालवतानाही मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. गाडी सेल्फीस्टंट करताना किंवा फोटो काढताना अनेक तरुणांचा अपघातात बळी गेला आहे. अशा प्रकारे वाहन चालवल्यास भरमसाठ दंडाची तरतूद परिवहन विभागाने केली असली, तरी नियम व अटींचे पालन करतील ते तरुण कसले! नियम मोडण्यातही त्यांना आनंद वाटतो. तरुणांमध्ये वाढणाऱ्या या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कुटुंब आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न झाले, तरच काही तरी फलदायी ठरू शकेल. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment