सध्या बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागली असतानाच या दोघांमधील संघर्षही वाढत आहे. 11 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला रवी तेजा यांचा तेलुगू-हिंदीमध्ये डब झालेला 'खिलाडी' चित्रपट हा व्यावसायिक हितसंबंधांवरील ताज्या वादाचा विषय झाला आहे. 'खिलाडी' हा अक्षय कुमारचा हिट हिंदी चित्रपट असून या मालिकेअंतर्गत आतापर्यंत सात चित्रपट बनले आहेत.
रवी तेजा आणि अक्षयकुमार या दोन 'खिलाडीं'चा संघर्ष पेटला आहे. प्रकरण कोर्टात गेले . मुंबईचा 'खिलाडी' अक्षय कुमार आहे आणि त्याला हैदराबादचा 'खिलाडी' रवी तेजाने आव्हान देत आहे. रवी तेजाचा तेलुगु आणि हिंदीमध्ये डब करण्यात आलेला 'खिलाडी' चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, मुंबईतील 'खिलाडी'चे निर्माते रतन जैन यांना हैदराबादमध्ये कोणीतरी आपल्या चित्रपटाच्या नावावर तेलुगूमध्ये 'खिलाडी' बनवत असल्याची साधी कुणकुणही लागली नाही. तेलुगू 'खिलाडी'चा ट्रेलर 8 फेब्रुवारीला रिलीज झाल्यावर मग त्यांची धावपळ सुरू झाली. आणि लागलीच त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली.
अक्षयकुमारच्या खिलाडी' चे टायटल त्यांच्या नावावर नोंदणीकृत असून त्यांच्या परवानगीशिवाय अन्य कोणताही निर्माता या शीर्षकाचा चित्रपट बनवू शकत नाही, असे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. पण 11 फेब्रुवारी रोजी रवी तेजाचा तेलुगू डब केलेला 'खिलाडी' हिंदीमध्ये रिलीज होणार होता आणि त्याच्या निर्मात्याने जैनकडून शीर्षक वापरण्याची परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे त्याचे रिलीज त्वरित थांबवावे. असे आव्हान देण्यात आले. विशेष म्हणजे कोर्टात 11 फेब्रुवारीलाच सुनावणी झाली, ज्यामध्ये या परिस्थितीत चित्रपटाचे प्रदर्शन थांबवता येणार नाही, असे म्हटले होते. व्हीनस कंपनीचे रतन जैन यांनी 1992 मध्ये 'खिलाडी' बनवला, जो अक्षय कुमारचा पहिला हिट चित्रपट होता. 'खिलाडी' नंतर 'खिलाडी' हे शीर्षक वापरून जैन यांनी 'तू खिलाडी में अनारी' बनवला. यानंतर हॉरर चित्रपट बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या केशू रामसे यांनी 'खिलाडी' नावाची मालिका पुढे नेली.
त्यांनी अक्षय कुमारसोबत पाच 'खिलाडी'नावाने चित्रपट बनवले. 'सबसे बडा खिलाडी', 'खिलाड़ियों का खिलाड़ी', 'मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी', 'इंटरनेशनल खिलाड़ी' आणि 'खिलाड़ी 420' हे ते पाच चित्रपट. अक्षय कुमारची अभिनेत्री पत्नी ट्विंकल खन्ना हीदेखील या चार निर्मात्यांपैकी एक होती. याशिवाय 'खतरों के खिलाडी' हा टीव्ही शो देखील 'खिलाडी' या शीर्षकाचा वापर करून तयार करण्यात आला होता, ज्याचे पहिले दोन सीझन अक्षय कुमारने होस्ट केले होते.त्यामुळे कुणीतरी तेलगू निर्मात्याने 'खिलाडी' मालिकेवर परवानगीशिवाय चित्रपट बनवावा हे मुंबईतील निर्मात्यांना रुचले नाही. यापुढे अक्षयऐवजी रवी तेजाच्या 'खिलाडी'ला टॅग केले जाईल,याची भीती वाटल्याने धावपळ सुरू झाली. त्यामुळे जे व्हायला हवे होते तेच घडले. प्रकरण न्यायालयात गेले. मथळ्यातील हा 'गोंधळ' आता नित्याचा झाला आहे. भाषेचा विषय असल्याने उत्पादक संघटना काही करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी तेलुगू 'खिलाडी' वेगळा, हिंदी 'खिलाडी' वेगळा. मात्र रवी तेजाचा 'खिलाडी' त्याच नावाने हिंदीत आल्याने हिंदी निर्मात्यांची अडचण झाली आहे.
दोन्ही चित्रपटांची नावे वेगवेगळ्या संस्थांमध्ये नोंदणीकृत झाली आहेत. पण त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. प्रेक्षकांमध्ये 'खिलाडी' अक्षय नावाने ओळखला जातो, आता रवी तेजा याच्या नावाने 'खिलाडी' ओळखला जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तेजा हा तेलुगुमधील स्टार कलाकार आहे. त्याच्या 'विक्रमारकुडू'वर अक्षयकुमारने हिंदीमध्ये 'राउडी राठोड', 'किक'वर सलमानचा 'किक', ' 'मर्यादा रमन्ना',वर अजय देवगनाचा 'सन ऑफ सरदार' आणि 'शंबो शिवा शंबो'वर जॅकी भगनानीचा 'रंगरेज' आला होता. जर रवी तेजाने 'खिलाडी' नावावर आणखी चित्रपट बनवल्यावर मात्र अक्षयकुमारची अडचण होणार आहे.तसेही सध्या दक्षिण कलाकारांची हिंदीमध्ये चलती चालली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment