Monday, February 28, 2022

टाचेच्या वाढत्या हाडामुळे होणारी समस्या


आजकाल ज्या काही समस्यांमुळे लोक अधिक चिंतेत असतात, त्यापैकी एक म्हणजे टाचांच्या हाडांची वाढ.  त्यामुळे आपलं चालणं-फिरणं त्रासदायक होऊन बसतं  साहजिकच या समस्येकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे.  या समस्येने त्रस्त असलेल्या अनेकांना त्यांच्या टाचांचे हाड का वाढत आहे हे माहीत नसते.  त्यांना ही समस्या कशी सोडवायची हे देखील माहित नसते. म्हणून, आपण पहिल्यांदा ही समस्या योग्यरित्या समजून घेतली पाहिजे. त्यामुळे त्याच्या उपचारात मदत होईल.  आपल्या पायात 26 हाडे असतात.  टाचांचे हाड (कॅल्केनिअस) यापैकी सर्वात मोठे आहे.  टाचांच्या कोणत्याही प्रकारची समस्या चालताना त्रासापासून सुरू होते.  हे स्पष्ट आहे की टाचांच्या हाडांची वाढ ही एक सामान्य नसून एक गंभीर समस्या आहे.

त्रासाचं कारण

 जेव्हा बोटे आणि टाच यांच्या दरम्यानच्या भागात कॅल्शियम जमा होऊ लागते तेव्हा टाचांचे हाड वाढते.  जर तुमच्या टाचेचे हाड मोठे झाले असेल, तर सकाळी उठल्यावर तुम्हाला टाचांसह पाय दुखू लागतात.  जसजसे टाचांचे हाड वाढते तसतसे तुम्हाला टाचांच्या पुढच्या भागात सूज दिसून येईल.  तसेच तुम्हाला जळजळ वाटेल.  एवढेच नाही तर टाचांच्या खालच्या भागात हाडासारखा फुगवटाही दिसू शकतो.

डॉक्टर सांगतात की टाचांच्या हाडाच्या वाढीचे कारण आहे - प्लांटर फॅसिआ.  टाच आणि पायाची बोटे यांच्यामधला भाग मजबूत करण्यासाठी ज्या 'फॅटी टिश्यूज' असतात त्यांना 'प्लॅंटर फॅशिया' असे म्हणतात.  जेव्हा फॅटी टिश्यूवर खूप दाब किंवा दुखापत होते, तेव्हा ते टाचांचे हाड वाढण्यास कारणीभूत ठरते. होतं असं की जेव्हा 'प्लांटर फॅसिआ' वर दबाव वाढत जातो तेव्हा कॅल्शियमचे साठे त्या प्रभावित भागाला बरे करण्यासाठी वाढू  लागतात.  जेव्हा कॅल्शियम जास्त प्रमाणात जमा होते तेव्हा टाचांमध्ये हाडांच्या आकाराचा फुगवटा तयार होऊ लागतो.  कधीकधी अयोग्य किंवा असामान्य हालचालीमुळे टाचांचे हाड वाढते.

संधिरोग असू शकते

 कोणत्याही प्रकारच्या टाचदुखीला हलके घेऊ नका.  यामुळे सांधेदुखीचा (आर्थराइटिस) त्रासही होऊ शकतो.  जर तुम्हाला टाचांमध्ये वेदना होत असेल तर पायाशी संबंधित अशी कोणतीही क्रिया टाळा ज्यामध्ये पायांवर जास्त दाब जाणवत असेल.  टाचांमध्ये दुखत असेल किंवा सूज येत असेल तर जास्त वेळ शूज घालू नका.  चप्पल खरेदी करताना, तुमच्या घोट्याचा आकार लक्षात ठेवा.  लोक सहसा स्वस्त किंवा सुधारित शूज खरेदी करतात, जे जास्त काळ टिकत नाहीत किंवा पायांना आवश्यक आराम देत नाहीत.  याउलट यामुळे पाय दुखणे, गुडघे दुखणे किंवा टाचांचे हाड वाढण्याची शक्यता यांसारख्या समस्या वाढतात.

शूज-स्टॉकिंग

 आजकाल बरेच लोक फॅशन म्हणून शूजबरोबर मोजे घालणे आवश्यक मानत नाहीत जे पूर्णपणे चुकीचे आहे.  शूजच्या आत मोजे घातल्याने टाचांवरचा दाब कमी होतो.  त्याचप्रमाणे, लोक अनेकदा घरात अनवाणी चालणे पसंत करतात.  जेव्हा तुम्ही अनवाणी चालता तेव्हा तुमच्या प्लांटर फॅसिआवर जास्त दबाव येतो, म्हणून शक्य तितक्या कमी वेळेला अनवाणी चालत जा.

सल्ला आणि खबरदारी

 फ्लेक्ससीड ऑइलमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, ज्याला 'अल्फा-लिनोलेनिक अॅसिड' असेही म्हणतात.  फ्लेक्ससीड ऑइलमुळे टाचांच्या सूजासोबत वेदनाही कमी होतात.  ते वापरण्यासाठी, प्रथम तेल हलके गरम करा.  त्यानंतर त्यात सुती कापड टाका.  आता ज्या ठिकाणी दुखत असेल त्या भागावर गरम झालेले कापड थोडे प्लास्टिकने गुंडाळा.  त्या प्लास्टिकवर काही वेळ हीटिंग पॅड ठेवा.  यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

बर्फ टाचांची सूज आणि वेदना कमी करेल.  म्हणून, जेथे वेदना होत असेल तेथे बर्फ पॅक किंवा बर्फाने दाब द्या. सामान्य घरगुती उपचारांमुळे टाचांच्या हाडांच्या वाढीमुळे होणारा त्रास कमी होत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका.

 (हा लेख फक्त सामान्य माहिती आणि जागरुकतेसाठी आहे. उपचारासाठी किंवा आरोग्याशी संबंधित सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.)-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment