Tuesday, February 8, 2022

युद्धाच्या साशंकतेने जग हादरले


युक्रेनवरचे संकट अधिक गडद होत चाललं आहे.  रशिया युक्रेनवर केव्हाही हल्ला करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.  रशियन सैन्याने हल्ल्यासाठी ज्या प्रकारे बॅरिकेड लावले आहेत त्यामुळे ही भीती आणखीनच बळावली आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनीही गुप्तचर माहितीचा हवाला देत रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो असा इशारा दिला आहे.  त्यासाठी त्यांनी सत्तर टक्के शस्त्रे आणि उपकरणे युक्रेनच्या सीमेवर जमा केली आहेत. युक्रेनबाबत रशिया आणि नाटो सैन्याने ज्या प्रकारे तयारी चालवली आहे, त्यावरून सुलिव्हनच्या भीतीलाही पुष्टी मिळत आहे.

अमेरिकेनेही युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी आपले सैन्य पाठवले आहे, यावरून परिस्थितीचे गांभीर्य दिसून येते.  युक्रेनच्या संकटाबाबत गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि अमेरिका यांच्यात ज्या धमक्या आणि चेतावणीची भाषणे ऐकू येत आहे ते गंभीर धोक्याकडे निर्देश करत आहे.  मात्र, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन युद्ध टाळण्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल झाले आहेत.  युद्ध सुरू झाले तर त्याचे काय काय भयानक परिणाम होतील, हे फ्रान्स, जर्मनीसारख्या युरोपीय देशांना चांगलेच ठाऊक आहे.  पण रशिया आणि अमेरिकेचा हट्टीपणा या संकटात भर घालत आहे. रशियाने युक्रेनबाबत आक्रमकपणा दाखवल्याने नाटो आणि अमेरिकाही मैदानात उतरले आहेत.वास्तविक असे यापूर्वी कधी दिसले नव्हते.  मात्र सध्याची परिस्थिती जगासाठी धोक्याचे नवे मैदान बनले आहे.  वास्तव असे आहे की, सीमेवर लष्करी उपस्थिती वाढवून रशिया युक्रेनवर रशियामध्ये सामील होण्यासाठी दबाव टाकत आहे.  या लष्करी रणनीतीअंतर्गत त्यांनी बेलारूसच्या सीमेजवळ एस-400 क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.येथे मोठ्या संख्येने रशियन सैनिक तैनात आहेत.  साहजिकच ही अत्यंत धोकादायक स्थिती बनली आहे.  त्यामुळे बहुतांश देश गर्भगळीत झाले आहेत.  युद्ध कोणत्याही परिस्थितीत टळले पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.  आता जेव्हा सर्व संबंधित पक्ष बसून चर्चा करतील आणि लष्करी कारवाया थांबवतील तेव्हाच परिस्थिती सामान्य होऊ शकेल.  अन्यथा युद्ध झाले तर लाखो लोक विस्थापनाचे बळी ठरतील.  त्यामुळे गंभीर संकट ओढवेल.

खरे तर हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेने या वादात पडावे असे युक्रेनला वाटत नाही.  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनीही या मुद्द्यावरून अमेरिकेला सुनावले आहे.  रशियाच्या हल्ल्याचा धाक दाखवून अमेरिका युक्रेनच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.  यावरून युक्रेनला अमेरिकेची मदत किंवा सहानुभूती नको आहे, हे स्पष्ट होते.  मदतीच्या नावाखाली अमेरिका अफगाणिस्तानात आणि जगात इतरत्र राबवलेली रणनीती तशीच इथेही अवलंबवणार आहे, हे त्याला समजले आहे.  मात्र, रशियाही युक्रेनवर हल्ला करणार नसल्याचे सांगत आहे. जोपर्यंत युक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्याचा प्रश्न आहे, तो निर्णय घेण्याचा अधिकार युक्रेनला आहे.  रशिया युक्रेनला नाटोमध्ये जाऊ देऊ इच्छित नाही तर अमेरिका आणि नाटो देशांना त्याला युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहे.  यात प्रत्येकाचे स्वतः चे हित आहे.  मात्र अशा हितसंबंधांची किंमत निष्पाप नागरिकांनाच मोजावी लागते, हे विसरता कामा नये.  लढाईत निष्पाप लोक मारले जातात आणि लाखो निर्वासित होतात.  त्यामुळे महासत्तांनी स्वत:च्या फायद्यासाठी युद्धासारखा भयंकर खेळू नये, असे सर्वांनाच वाटते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment