Friday, February 4, 2022

दक्षिण कलाकारांची बॉलीवूडवर स्वारी


सध्या जावेद अलीनं गायलेलं 'तेरी झलक अशरफी श्रीवल्ली नैना मडक बर्फी...'  हे गाणं धुमाकूळ घालत आहे. लहान-थोर सगळ्यांच्या ओठांवर हे गाणं आहे. एक पाय ओढत ओढत नेत पायातली हवाई  चप्पल सोडणं ....पुन्हा पायात अडकवणं… विशेष ढंगानं वाढलेल्या दाढीखाली चॅलेंजिंग रीतीने हात फिरवणं… या 'पुष्पा'च्या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.  श्रीवल्लीचा मूळ तेलुगू गायक सिड श्रीराम काहीसा मागे राहिला आणि हिंदी 'श्रीवल्ली…'  प्रचंड ट्रेंड झाला. त्यावर 'रील' बनले जाऊ लागले. 'मैं झुकेगा नही साला...' या डायलॉगवर मीम्स बनवले जाऊ लागले.  या 'पुष्पा'चे यश पाहून बॉलिवूड अवाक झाले आहे. अल्लू अर्जुनने त्याचा चित्रपट हिंदीमध्ये डब करताना योग्य टायमिंग साधलं आहे. आता त्याच्या पाठोपाठ अनेक दक्षिण कलाकार हिंदीमध्ये आपले चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांचे काही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. 

हिंदीत डब केलेला 'पुष्पा' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे आणि हे अशा वेळी घडत आहे ज्यावेला भारतीय चित्रपटाचा प्रमुख उद्योग जवळजवळ ठप्प झाला आहे.  आदित्य चोप्रा, करण जोहर, टी-सीरीज, साजिद नाडियादवाला यांसारखे प्रस्थापित निर्माते त्यांचे तयार चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत. गेल्या महिनाभरापासून एकही नवीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. चित्रपटांचे चित्रीकरणही ठप्प झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत देशातील प्रादेशिक चित्रपट आधुनिक तंत्रज्ञान, भव्यदिव्यपणा आणि हटके सहाय्याने देशात आणि जगात दार ठोठावताना दिसत आहेत. 

डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा-द राइज' या हिंदी डब सिनेमाने 100 कोटींचा व्यवसाय करून मोठी कमाई केली आहे. ओटीटीवर रिलीज होऊनही बॉक्स ऑफिसवरील आपली घोडदौड कायम ठेवली आहे. 'पुष्पा' या दाक्षिणात्य हिंदी डब सिनेमाने कमाईच्या दृष्टीने सर्व चित्रपटाच्या उद्योगाला चकित केले आहे. अलीकडच्या दक्षिणेतील काही चित्रपटांवर एक नजर टाकली तर अनेक हिंदीत डब झालेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आहे.

एस.एस. राजमौली दिग्दर्शित'बाहुबली- द बिजिनिंग' या चित्रपटाने महाकाव्य चित्रपटांचा ट्रेंड नव्याने सुरू केला. या चित्रपटाने दुसऱ्या भागासाठी उत्कंठा निर्माण केली ती वेगळीच! 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटाने केवळ त्याची गुंतवणूकच वसूल केली नाही तर मोठे फॅन फॉलोइंगही मिळवले. 118 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. 'बाहुबली2 : द कंक्यूजजन' हा 2017 मध्ये रिलीज झाला होता. मूळ गाजलेल्या बाहुबली मालिकेचा हा दुसरा भाग होता. एस.एस. राजमौली दिग्दर्शित हा चित्रपट आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. देशभरात 510 कोटी आणि जगभरात 2 हजार कोटी कमाई करणारा हा चित्रपट इतिहास करून गेला.

'रोबोट'चा दुसरा भाग असलेला रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची भूमिका असलेला '2.0' हा चित्रपट 190 कोटी मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2018 च्या या चित्रपटाने सिद्ध केले की, फॅन फॉलोइंगमुळेही बॉक्स ऑफिस हिट करू शकतो. प्रभास अभिनित 'साहो' चित्रपटाने 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. या स्टाईलाईज्ड ऍक्शनपॅकड चित्रपटाने वेगाने सोशल मीडियावर क्रेझ बनवली. याने 142 कोटींचा व्यवसाय केला.

 आता 'पुष्पा' म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटांचे पुन्हा एक वादळ आले,असे म्हटल्यास वावगे ठरू नये. संगीताचा आधार नसलेल्या पाच भाषांमध्ये रिलीज झालेला 'बाहुबली' ने सर्वाधिक व्यवसाय केला,पण त्याची गाणी लोकांच्या ओठांपर्यंत पोहोचली नव्हती.  ही उणीव 'पुष्पा'ने दूर केली. वर्षानुवर्षे तारे-तारकांच्या चेहऱ्यांच्या आणि रिमेक चित्रपटांच्या जोरावर चालणाऱ्या ठोकळेबाज बॉलीवूडची तंद्री यामुळे भंग पावली आहे.

'श्रीवल्ली...' च्या वादळाने बॉलीवूडसाठी एक आव्हान उभे ठाकले आहे. बॉलिवूडला आता तरुण रक्ताची नितांत गरज आहे, असे दिसते आहे. कारण या बॉलिवूडचे प्रमुख स्टार पन्नाशी ओलांडलेले आहेत आणि विशिष्ट प्रकारच्या भूमिकांचा साचेबंदपणा आला आहे. आजपर्यंत बॉलीवूड स्टार सिस्टीमवर चालत आला आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीत देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर हे स्टार त्रिकूट आज शाहरुख, सलमान आणि आमिर खान बनले आहेत. आता हे स्टार्स स्वतःच स्वतःचे चित्रपट बनवत आहेत.  अक्षय कुमार, अजय देवगण, ऋत्विक रोशन, अनिल कपूर, सनी देओल असे सर्व आघाडीचे कलाकार स्वतः निर्माते आहेत.  तमिळ, तेलुगू, मराठी, पंजाबी, ओडिया, भोजपुरी यांसारख्या भाषांच्या सिनेमांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही, पण बॉलिवूडमध्ये त्यांना मर्यादित संधी आहेत.

'पुष्पा' ने 1991 मध्ये आलेल्या मनिरत्नम यांच्या 'रोजा' किंवा त्याआधीच्या  1984 मध्ये आलेल्या कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांच्या 'एक दुजे के लिए' मधील 'हम बने तुम बने एक दुजे के लिए', 'सोलह बरस की बाली उमर को सलाम...' किंवा 1991 मध्ये आलेल्या मणिरत्नमच्या 'रोजा'सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकाळी त्यांची गाणी देशभर गाजत होती.पण त्यांनतर बॉलिवूडमध्ये ना कमल हसनला काम मिळाले ना अरविंदला स्वामीला!

रमेश सिप्पीच्या 'सागर' व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या आणि प्रस्थापित निर्मात्याने कमल हसनला काम दिले नाही.  कमलला स्वतः 'आंटी 420', 'हे राम', 'अभय', 'मुंबई एक्सप्रेस', 'विश्वरूप' सारखे हिंदी चित्रपट बनवावे लागले.  कमल हसनने 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देखा प्यार तुम्हारा' या बॉलिवूड निर्मात्यासाठी काम केले होते.  तेव्हापासून आजपर्यंत 37 वर्षांत बॉलिवूडच्या एकाही निर्मात्याने कमलला काम दिलेले नाही.  लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रजनीकांतला गेल्या 22 वर्षांपासून बॉलिवूडच्या एकाही निर्मात्याला साईन केलेले नाही.  त्याचा शेवटचा चित्रपट 'बुलंदी' 2000 मध्ये रिलीज झाला होता.

दाक्षिणात्य अनेक स्टार्सनी बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही.  'रोजा' आणि 'बॉम्बे' हिट करणाऱ्या अरविंद स्वामींसारखे चिरंजीवी, मामूट्टी, नागार्जुन, माधवन, सिद्धार्थ लोकप्रियता असूनही दुर्लक्षित राहिले.  आज प्रभास आणि अल्लू अर्जुन हिट आहेत.  अलुची लोकप्रियता शाहरुख, आमिर सलमानपेक्षा कमी नाही. अल्लूच्या दुसऱ्या 'पुष्पा'ची प्रेक्षकांना आतुरता लागून राहिली आहे. काही का असेना 'श्रीवल्ली'च्या डंक्याने बॉलिवूडची झोप उडवली आहे. बॉलिवूडला वेगळा विचार करण्याची निर्माण झाली आहे.  येत्या काही दिवसांत, ज्युनियर एनटीआर, रामचरण, विजय सेतुपती, विजय देवरकोंडा, कार्ती यांसारखे दक्षिण भारतीय कलाकार हिंदी चित्रपटांमधून अखिल भारतीय स्तरावर लोकप्रियता मिळवण्यासाठी  सज्ज झाले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment