Wednesday, February 9, 2022

पाकिस्तानचे नेहमीचे तुणतुणे


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकत्याच झालेल्या बीजिंग दौऱ्यात पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.  इम्रान खान बीजिंगमध्ये सुरू असलेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते.  पण या प्रसंगीही त्यांनी काश्मीर प्रश्नाचे भांडवल करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सोडला नाही.  त्यांचा काश्मीरचा मुद्दा हा भारताविरुद्धच्या मोहिमेचा भाग आहे यात शंका नाहीच.  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट असो, संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्याची संधी असो किंवा मुस्लिम देशांची महासभा असो किंवा इतर कोणतीही जागतिक परिषद असो, पाकिस्तान संधी मिळेल तेव्हा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करून भारताविरुद्ध अपप्रचार  करत आला आहे. सगळ्या देशांनी पाकिस्तानला झिडकारले असले तरी त्याने आपले तुणतुणे वाजवण्याचे सोडले नाही.

मात्र यातून पाकिस्तानला आजपर्यंत कोणतेही उल्लेखनीय यश किंवा कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळालेला नाही.  तुर्कस्तान, मलेशिया असे मोजकेच देश त्याच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात आणि तेही केवळ हे  देश स्वतः इस्लामी देशांच्या संघटनेचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत म्हणून. त्यामुळे जगभर फिरून पाकिस्तानने काश्मीरवरून भारताविरुद्ध मोहीम सुरू ठेवली तरी ते यातून त्याला काहीच साध्य करता येणार नाही. मात्र यातून आपले मनसुबे तेवढे दाखवून देण्याचे काम करत आहे.

इम्रान खान यांनी बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. त्यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांनी काश्मीरचा मुद्दा पुढे आणला.  काश्मीरबाबत कोणत्याही देशाने एकतर्फी पाऊल उचलू नये, असे चीनचे म्हणणे आहे.  त्याचवेळी त्यांनी दोन्ही देशांना शांततेच्या मार्गाने वाद सोडवण्याचा सल्ला दिला.  पण चीननेही यात थोडी हुशारी केलीच.  भारतासोबत सुरू असलेला संघर्ष लक्षात ठेवून त्यांनी काश्मीर प्रश्नावर  उघडपणे भारताला विरोध करत असल्याचा आणि पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचा संदेश जाईल, असे कोणतेही विधान  केले नाही.

मात्र चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी जारी केलेले संयुक्त निवेदन भारतासाठी चिंताजनक आहे.  या निवेदनात दोन्ही नेत्यांनी चीन-पाकिस्तान कॉरिडॉरच्या कामाला गती देण्यावर भर दिला आहे.  यामध्ये चीनचे कट-कारस्थान दडलेले आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.  हे लक्षात घेण्यासारखे आहे की संयुक्त निवेदनात नमूद केलेला चीन-पाकिस्तान कॉरिडॉर केवळ त्या भागातून जातो ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.  अशा स्थितीत, संयुक्त निवेदनाचा स्पष्ट अर्थ असा निघतो की, चीन पाकिस्तानच्या ताब्यातील भूभागातील अशा कारवायांना एकप्रकारे समर्थन आणि मदतच करत आहे. पाकिस्तानव्याप्त भागातून  चीन-पाकिस्तान कॉरिडॉर जाणं भारताच्या दृष्टिकोनातून बेकायदेशीर आहे. आणि हे भारताला कोणत्याही परिस्थितीत कधीच मान्य होणार नाही.

याच निमित्ताने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही चीनला भेट दिली होती हे लक्षात घेण्यासारखे आहे.  काश्मीरच्या मुद्द्यावर रशियानेही काही बोलावे, असा चीनचा प्रयत्न होता.  इम्रान खान याच महिन्यात रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत हेही महत्त्वाचे आहे.  बर्‍याच कालावधीनंतर पाहिल्यांदाच पाकिस्तानच्या एखाद्या पंतप्रधानाचा हा रशिया दौरा होत असेल.  काश्मीर प्रश्नावर पुतिन पाकिस्तानला पाठिंबा देऊ शकतात, असे त्यांना वाटते.  तसेच काश्मीरवर रशियाने पाकिस्तानला साथ द्यावी, अशी चीनचीही इच्छा आहे.  मात्र काश्मीरबाबत आपल्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे रशियाने नेहमीच सांगितले आहे.  काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधील परस्पर प्रश्न असून तो दोन्ही देशांनी सोडवला पाहिजे.  जगातील बहुतेक देश हेच सांगत आहेत.  अशा परिस्थितीत पाकिस्तानने हे समजून घ्यायला हवे की, कुठेही गेलात तरी काश्मीरबद्दल रडगाणे गाऊन काहीही उपयोग होणार नाही. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment