Sunday, February 27, 2022

चित्रपट आणि वाद


बॉलिवूड आणि वाद यांचा अगदी जवळचा संबंध आहे. बॉलिवूडमध्ये नेहमी नवनवीन कहाण्यांची, सिनेमांची निर्मिती होत असते. नवे चेहरे समोर येत असतात, काही ना काही खास घडत असते. त्याबद्दल जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे बॉलिवूडच्या प्रत्येक घटनेकडे प्रेक्षकांचे बारीक लक्ष असते. बॉलिवूडच्या बातम्या रोजच प्रसार माध्यमांमध्ये छापून येतात. पण हल्लीच्या बातम्या या केवळ बातम्या नसून, बॉलिवूडमध्ये होणारे वाद आहेत. जणू काही बॉलिवूड आणि वाद विवाद यांचे जवळचे नाते निर्माण झाले आहे. रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूडमध्ये वाद निर्माण होताना दिसून येतात आणि याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये छापून येताना दिसतात.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातून कामाठीपुरा हा उल्लेख वगळण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका करण्यात आल्या आहेत. चित्रपटातील कामाठीपुरा या उल्लेखाने संपूर्ण परिसराची विशेषत: येथील महिलांची बदनामी होत आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. हुसैन झैदीलिखित पुस्तकावर ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा आधारित आहेत. चित्रपटात कामाठीपुरा परिसर वाईट दृष्टीने दाखवण्यात आला आहे. परिणामी, येथे राहणाऱ्या रहिवाशांची बदनामी होऊ शकते. त्यामुळे कामाठीपुरा या उल्लेखासह चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आल्यास रहिवाशांचे, विशेषत: महिलांचे नुकसान आणि अनादर होईल, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. कामाठीपुराऐवजी मायापुरी किंवा मायानगरी असा उल्लेख करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. सध्या या परिसरात केवळ पाच टक्के देहिवक्रीचा व्यवसाय होत आहे. असे असतानाही चित्रपटात मात्र संपूर्ण परिसर या व्यवसाशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आल्याबद्दल याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. तर या संपूर्ण परिसराला देह व्यापाराचे केंद्र म्हणून दाखवण्यात आल्याने स्थानिक सामाजिक सेवा संस्था आणि रहिवाशांकडून अनेक आक्षेप घेणाऱ्या तक्रारी असल्याचे सांगण्यात येते. पण सध्या तरी  ‘गंगुबाई काठियावाडी’ रिलीज झाला आहे आणि गेल्या दोन दिवसांत 23 कोटींचा बिझनेस केला आहे.

यापूर्वी बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याचा आगामी 'तान्हाजी : दी अनसंग वॉरियर' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघाने या चित्रपटाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले होते. राजपूत संघाने आरोप केला होता की, चित्रपटात महान योद्धा तानाजी मालुसरे यांच्या वंशाबद्दलची खरी माहिती, त्यांच्या घराण्याबद्दलची खरी माहिती दाखवलेली नाही. असा आक्षेप होता. मात्र या चित्रपटाला पुढे डोक्यावर घेतले.100 क्लबमध्ये चित्रपट सामील झाला.  'तान्हाजी' या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचे दाखविणारे दृश्य आहे. या दृश्यावर तान्हाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला होता. आतापर्यंतच्या तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा कोठेही उल्लेख नाही.असे ते म्हणाले होते. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा'  या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटातील काही दृश्यांवर टीका झाली. राष्ट्रीय महिला आयोगानेही या दृष्यांवर तीव्र आक्षेप घेतला. तसेच त्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार झाली,पण पुढे काय झालं कळलं नाही. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यातील भडक दृश्यांची चर्चा झाली होती. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आले होते. त्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे मांजरेकर यांनी हे दृश्य वगळण्याचे जाहीर केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला 'Why I Killed Gandhi' या चित्रपटाच्या 'लाइमलाइट' या OTT प्लॅटफॉर्मवरील प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. ओटीटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला या मुद्द्यावर संबंधित हायकोर्टात जाण्याची सूचना केली आहे. 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली होती. या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यावरून अमोल कोल्हे यांच्यावर पक्षातून जोरदार टीका झाली. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येही यावरून वाद झाला. अमोल कोल्हे यांनी 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. 2017 मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी 'पृथ्वीराज' हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडला होता. राजस्थानमधील अजमेरमध्ये या चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आली होती. या चित्रपटाबाबत गुर्जर आणि राजपूत समाज आमनेसामने आले होते. चित्रपटात पृथ्वीराज चौहान हे राजपूत समाजातील असल्याचे सांगण्यात आले आहे. तर गुर्जर त्यांना त्यांच्या समाजाबद्दल सांगत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराज हा ऐतिहासिक  चित्रपट भारताचे वीरपुत्र पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराजची मुख्य भूमिका साकारत आहे, तर विश्व सुंदरी मानुषी छिल्लर त्याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मानुषी छिल्लर या चित्रपटात संयोगिताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, सोनू सूद आणि मानव विज हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आपल्या आगामी ‘पानिपत’  या चित्रपटामधून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा इतिहास मांडणार आहेत. मराठेशाहीची पाळेमुळे हलवणारी पानिपतची लढाई लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र आता या चित्रपटाबाबत एक नवीन वाद उफाळून आला आहे. प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील  यांनी या चित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीतून चोरली गेली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनीं कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत पाटील यांनी तब्बल सात कोटींचा दावा ठोकला आहे, अशी बातमी आली आहे. विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर, निर्माते रोहित शेलाटकर आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट यांच्यावर केस दाखल केली आहे. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माते रोहित शेलाटकर यांचे प्रतिनिधी संजय पाटील यांनी विश्वास पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या कादंबरीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली होती. लेखक म्हणून विश्वास पाटील यांचे नावदेखील देण्यात येईल, तसेच हा चित्रपट कादंबरीवर आधारित असल्याचे लिहिले जाईल असे ठरले होते. मात्र पाटील यांनी ट्रेलर पाहिल्यावर त्यांना त्यात तसे काहीच नसल्याचे आढळले. 

चित्रपटाच्या नावावरून वाद झाल्याने त्याची नावे बदलण्याची नामुष्की निर्मात्यांवर आली. समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे, इतिहासातील बदल केल्यामुळे तर उत्पादनाचे नाव वापरल्यामुळे, अशा विविध कारणांमुळे वाद निर्माण झाले आणि चित्रपटांची मूळ नावे बदलण्यात आली. 'लक्ष्मी' या अक्षय कुमार निर्मित आणि अभिनित हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपट कंचाना या मूळ चित्रपटापासून बनवलेला होता. या चित्रपटाचे पहिले नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते, पण नावावरून वाद निर्माण झाल्यामुळे याचे नाव फक्त लक्ष्मी असे ठेवण्यात आले. 'बिल्लू' या इरफान खान अभिनित या चित्रपटाचे पहिले नाव बिल्लु बार्बर असे होते. पण या नावात न्हावी समाजातील लोकांचा उल्लेख होत असल्यामुळे याचे नाव फक्त बिल्लू ठेवण्यात आले.'जजमेंटल है क्या?' या चित्रपटामध्ये कंगना रानौत आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाचे पहिले नाव मेंटल हैं क्या? असे होते. पण प्रदर्शनाच्या वेळी हा चित्रपट वादात अडकला त्यामुळे याचे नाव जजमेंटल है क्या? असे ठेवण्यात आले.' पद्मावत' हा सगळ्यात जास्त वादात सोडलेला चित्रपट म्हणता येईल. मूळ इतिहासात बदल केल्यामुळे आणि राजपूत समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जाण्याच्या आरोपात हा चित्रपट अडकला होता. त्यामुळे या चित्रपटाचे नाव पद्मावत ठेवण्यात आले. याचे पहिले नाव पद्मावती असे होते.'लवयात्री' हा सिनेमा नवरात्रीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदू समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यामुळे या सिनेमाचे नाव लव्हरात्री ऐवजी लवयात्री ठेवण्यात आले. हा चित्रपट सलमान खानने निर्मित केला होता.

'आर राजकुमार' शाहिद कपूरच्या या सिनेमाचे पाहिले नाव रॅम्बो राजकुमार असे होते. पण यावर हॉलिवूड निर्मात्यांनी आक्षेप घेतला त्यामुळे याचे नाव आर राजकुमार ठेवण्यात आले. 'गोलियो की रासलीला रामलीला' रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण अभिनित आणि संजय लीला भन्साळी निर्मित या चित्रपटावर रामायणाचा अपमान केल्याचा आरोप होता त्यामुळे या चित्रपटाला ‘गोलीयो की रासलीला’ हे नाव जोडले गेले.

'हसीना पारकर' अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीवर आधारित असलेला हा चित्रपट होता. श्रद्धा कपूर यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आली होती. या चित्रपटाचे पहिले नाव हसीना होते. नंतर ते बदलण्यात आले.' मद्रास कॅफे' जॉन अब्राहमचा हा चित्रपट श्रीलंकेतील तमिळ मुद्द्यांवर आधारीत होता. याचे पहिले नाव जाफना होते. पण दक्षिण भारतात विरोध झाल्यामुळे नाव बदलण्यात आले.'रुही' राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्या या चित्रपटाचे पहिले नाव रुह आफजा होते. पण हे एका उत्पादनाचे नाव असल्यामुळे नाव बदलून रूही ठेवण्यात आले.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment