Monday, February 28, 2022

यंदाच्या ईदला सलमानची उणीव कोण भरून काढणार?


अक्षय कुमारने यंदाची होळी-दिवाळी आपल्या नावावर केली.मात्र ईदला सलमानचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने त्याच्या जागी दोन अॅक्शन हिरो आपापले चित्रपट घेऊन येत आहेत.  एकीकडे अजय देवगणचा 'रनवे 34' चित्रपट रिलीज होतोय, तर दुसरीकडे टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2'.  म्हणजेच यंदाच्या ईदला प्रेक्षकांना दोन अॅक्शन हिरोंची टक्कर पाहायला मिळणार आहे.  हे दोन्ही हिरो मिळून सलमानची उणीव भरून काढतील का?  ईदला सलमान खानच्या चित्रपटांची वाट पाहणारे प्रेक्षक या दोन नायकांचे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करतील का?  या सगळ्या  प्रश्नांची उत्तरे आपल्याला 29 एप्रिलला  पाहायला मिळतील.

ईदच्या दिवशी सलमान खान, दिवाळीच्या दिवशी शाहरुख खान आणि ख्रिसमसच्या दिवशी आमिर खान आपापले चित्रपट प्रदर्शित करण्याला प्राधान्य देत असल्याचे मानले जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षात प्रथमच यावर्षी ईदला सलमानचा चित्रपट रिलीज होणार नाही, त्यामुळे ईदला अजय देवगणच्या 'रनवे 34' सोबत टायगर श्रॉफचा 'हिरोपंती 2' रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  ईदला त्याचा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी अजयने सलमानशी संवाद साधल्याचे सांगितले जाते.  या वर्षी ईदला त्याचा एकही चित्रपट रिलीज होणार नसल्याचे सलमानने सांगितले तेव्हा अजय देवगणने 29 एप्रिल रोजी त्याचा 'रनवे 34' रिलीज करण्याची घोषणा केली.  ईदच्या दिवशी त्याची टक्कर टायगर श्रॉफच्या हिरोपंती 2 या चित्रपटाशी होणार आहे, ज्याची निर्मिती सलमान खानचा जिवलग मित्र साजिद नाडियादवाला यांनी केली आहे.

दिवाळी किंवा ईदसारखे सण सिने व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात कारण या सणांना प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनी निर्मात्यांवर पैशांची बरसात केली आहे.  2009 पासून, सलमान खान दरवर्षी ईदला त्याचे चित्रपट प्रदर्शित करत आला आहे, ज्या चित्रपटांनी 200 ते 900 कोटींचा व्यवसाय केला.  हा ट्रेंड 2009 मध्ये 'वॉन्टेड'पासून सुरू झाला.  यानंतर दरवर्षी ईद सलमानच्या नावाने लिहिली गेली.2010 मध्ये 'दबंग', 2011 मध्ये 'बॉडीगार्ड', 2012 मध्ये 'एक था टायगर', 2014 मध्ये 'किक', 2015 मध्ये 'बजरंगी भाईजान', 2016 मध्ये 'सुलतान', 2017 मध्ये 'ट्यूबलाइट', 2018 मध्ये 'रेस' 2019 मध्ये 'इंडिया', 2020 मध्ये कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने बॉलिवूडमध्ये कुणाचाही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 2021 मध्ये सलमानचा 'राधे' ईदला प्रदर्शित झाला. हा चित्रपट एकाच वेळी थिएटर्स आणि ओटीटीवर प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट अपयशी ठरल्यामुळे पहिल्यांदाच सलमान खानला ईदला मोठा फटका बसला.  यंदाच्या ईदला खानकडे चाहत्यांना देण्यासाठी कोणताही चित्रपट नाही.  त्यामुळे अजय देवगण ईदला 'रनवे 34' रिलीज करणार आहे.  अजयची टक्कर टायगर श्रॉफसोबत होणार आहे, जो अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो आणि त्याचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

मात्र, बॉक्स ऑफिसवरची स्पर्धा ही अजयसाठी नवीन गोष्ट नाही.  1991 मध्ये, त्याने दोन चालत्या मोटारसायकलवर पाय ठेवून 'फूल और कांटे' द्वारे पडद्यावर उतरला होता.  आणि तत्कालीन प्रस्थापित नायक अनिल कपूरच्या 'लम्हे'च्या माध्यमातून त्याच्या विरुद्ध उभा होता.  'लम्हे'च्या तुलनेत पहिल्यांदाच पडद्यावर येत असलेला अजयच्या 'फूल और कांटे' च्याबाबतीत म्हटले जात होते की, 'लम्हे' त्याला तुडवून टाकेल.  पण घडले उलटेच.  'फूल और कांटे' ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.  'फूल और कांटे' पाहायला  गर्दी होती, तर 'लम्हे' ची चित्रपटगृहे रिकामी होती. तीन कोटींमध्ये बनलेल्या 'फूल और कांटे'ने चारपट म्हणजे 12 कोटी कमवले आणि यासोबतच बॉलीवूडला अजय देवगणच्या रूपाने एक अॅक्शन हिरो मिळाला.यंदाच्या ईदच्या दिवशी हा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफशी स्पर्धा करणार आहे, ज्याच्या  डान्स आणि अॅक्शनचं वेड तरुणाईला आहे.  पण हे दोघे मिळून सलमानची कमतरता भरून काढू शकतील का, याचे उत्तर 29 एप्रिललाच मिळेल.  -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment