Sunday, February 27, 2022

जागतिक पर्यटनात सिंधुदुर्ग जिल्हा


 देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बहुमान मिळालेल्या सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्गाचा समावेश केला आहे. महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यात समावेश आहे. आपल्या महाराष्ट्रीयांसाठी अभिमानाची बाब म्हटली पाहिजे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने जाहीर केलेल्या यादीत जगप्रसिद्ध लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय 9 पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे.

स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती मॅगझिनने संकेतस्थळवर दिली आहे. स्कुबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाच्या दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नाकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे.या यादीमध्ये श्रीलंका, भूतान, कतार, जपान, युएई, इजिप्त, ओक्लाहोमा, सेऊल, गोबन, उझबेकिस्तान यासारख्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. आता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळासह सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आल्याचे दिसून येते.

सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग बीच आदीम्हणजे फक्त सिंधुदुर्ग किल्ला, समुद्र, बीचेस आणि मासे असा अनेकांचा समज असतो, पण मालवणची भटकंती म्हणजे केवळ एवढंच नसून एक सुंदर खाद्यसंस्कृती आहे,याची प्रचिती येते. सामान्य पर्यटकासाठी कोकण रेल्वे हा सर्वात सोईस्कर पर्याय आहे. कोकण रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरून रिक्षा, जीप, एसटी कोकणात प्रवास करता येतो.कोकण रेल्वेच्या ‘मांडवी’ आणि ‘कोकणकन्या’ या दोन गाडय़ा त्यातल्या केटिरंग सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध आहेत. भारतातल्या काही मोजक्याच गाडय़ांमध्ये असे विविध आणि दर्जेदार खाण्याचे पदार्थ मिळतात. त्यामुळे आपली कोकणातल्या खाद्य-भ्रमंतीची सुरुवात कोकण रेल्वेपासूनच होते. मालवणातून तारकर्ली बीचला जाता येते. इथे राहण्याचीही सोय आहे. पर्यटकांना मालवण, सिंधुदुर्ग, तारकर्ली, देवबाग परिसर तसेच मालवण- कुडाळ- वेंगुर्ला- सावंतवाडी- आंबोली घाट ही ठिकाण पाहायची असल्यास चार ते पाच दिवसांचा वेळ काढावा लागतो.

 सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘कुरटे’ बेटावर शुद्ध खडक, मोक्याची जागा व गोडय़ा पाण्याची सोय या गोष्टी पाहून शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्याची आज्ञा केली. 25 नोव्हेंबर 1664 रोजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्ताचा चिरा बसवला. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम 29 मार्च 1667 रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी शिवाजी महाराज स्वत: हजर होते. गेली 352 वर्षे ऊन-वारा-पाऊस आणि लाटांचे तडाखे झेलत उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला  भर समुद्रातील बेटावर बांधलेला आहे. किल्ल्याचा गोमुखी दरवाजा, महाराजांच्या हाताचा आणि पावलाचा ठसा, शिवराजेश्वर मंदिर, राणीची वेळा, भवानी मंदिर या महत्त्वाच्या गोष्टी पाहता येतात.

सिंधुदुर्ग किल्ला पाहून झाल्यावर ‘सुवर्ण गणेश’ मंदिर पाहता येते. मालवण धक्क्यापासून चालत 15 ते 20 मिनिटांत मंदिरात पोहोचता येतं. या साध्याशा मंदिरातील स्वच्छता, प्रसन्न वातावरण आणि गणपतीची सोन्याची सुंदर मूर्ती आपल्या मनातील भक्तिभाव जागृत करते. सुवर्ण गणेश मंदिरापासून पाच मिनिटांवर ‘रॉक गार्डन’ आहे. लहान मुलांसाठी इथे टॉय ट्रेन आणि इतर खेळण्याचं साहित्य आहे.  देवबागला जाऊन डॉल्फिन सफारी आणि स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग वॉटर स्पोर्ट्सची धमाल अनुभवता येते.  मालवण किनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करून व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करून महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहूर्ताचा चिरा बसवला होता. आजही कोळी लोक याची पूजा करतात. मालवणपासून 35 किमीवरचं प्राचीन कुणकेश्वर मंदिर आहे. कुणकेश्वर हे समुद्रकिनाऱ्याला लागून असलेलं निवांत आणि सुंदर गाव आहे. या गावात इसवी सनाच्या अकराव्या शतकात यादवांनी कुणकेश्वरचं प्राचीन शिवमंदिर बांधलं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी व संभाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

कुडाळ, सावंतवाडी,आंबोली ही स्थळे पाहण्यासारखी आहेत. सावंतवाडी लाकडाची खेळणी यासाठी प्रसिद्ध आहे. तेथील मोती तलाव, राजवाडा ही ठिकाणं  पाहता येतात. कुडाळला शासकीय कार्यालये आहेत. चिपी विमानतळ झाल्याने सिंधुदुर्गचे महत्त्व आणखी वाढले आहे.परुळे  पुरातन गावात प्रथम आदिनारायण मंदिर आणि पुढे गेल्यावर वेतोबा मंदिर संकुल लागते. या दोन्ही मंदिरातील मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. वेतोबा मंदिर परिसरात अनेक वीरगळ पडलेल्या आहेत. वेतोबा मंदिराच्या समोरचा रस्ता वालावल गावात जातो. या गावातील प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्या मागचा जलाशय प्रसिद्ध आहे. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे. तसंच सह्यद्रीतील जैवविविधतेनं श्रीमंत असलेलं जंगल येथे आहे. आंबोलीतील महादेव पॉइंट, कावळेसाद पॉइंट, नागरतास धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम इत्यादी फिरण्याच्या जागा आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक रचनेत जगात सुंदर आहे. या जिल्ह्याची भुरळ देश-विदेशी पर्यटकांना अनेक वर्षांपासून पडलेली आहे. त्यामुळे गोवा राज्या पाठोपाठ विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देताना दिसतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटक यायचे थांबले होते. परिणामी येथील पर्यटन विकासाला ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु जागतिक यादीत जिल्ह्याचा समावेश झाल्याने रोडावलेली पर्यटक संख्या पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. जगातील गर्भ श्रीमंत पर्यटकांपासून सर्वसाधारण पर्यटक सुद्धा जिल्ह्यात मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment