Friday, February 18, 2022

रस्ते अपघात महारोगापेक्षाही भयंकर


ज्या देशात जगातील एकूण  वाहनसंख्येपैकी केवळ एक टक्काच वाहने आहेत,  त्या भारतात जगातील एकूण अपघातांपैकी  रस्त्यांवर होणारे अपघात अकरा टक्के आहेत.  जागतिक बँकेचा हा अहवाल केवळ गंभीर नव्हे,  तर भारतीयांची झोप उडवणारा आहे. देशात  वर्षाकाठी होणाऱ्या साडेचार लाख अपघातांमध्ये  दीड लाख नागरिकांना जीव गमवावा लागतो.  केवळ रस्ते गुळगुळीत आहेत म्हणून अपघात कमी होतात' 'रस्त्यांची आखणी चुकीची म्हणून अपघातांचे प्रमाण वाढते', गंभीर बाब आहे, याकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात वाढतात', अशा अनेक कारणांनी अपघातांच्या या प्रचंड संख्येचे समर्थन केले जाते. विकसित देशांत वाहन परवाना  मिळणे ही सर्वात कठीण गोष्ट समजली जाते.वाहन  चालवण्याचा परवाना ही आपल्या देशातील सर्वात  सहज मिळणारी गोष्ट आहे.  जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले  की मिनिटाला एकाचा मृत्यू होतो  वाहतूक मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालात मात्र हेच  नुकसान सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे आहे.  भारतातील अपघातांच्या आणि नुकसानीचे आकडे  कमी दाखवले जातात, असे जागतिक बँकेचे स्पष्ट केले आहे. 

 करोनापेक्षा रस्ते अपघातांचे गांभीर्य अधिक आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक नितीन गडकरी यांचे विधान म्हणून अधिक महत्त्वाचे आहे. रस्ते आखणी करणारे निम्मे अभियंता बोगस असल्याचे त्यांचे म्हणणे या अपघातांच्या प्रचंड आकडेवारीचे समर्थन करणारे आहे. रस्ते बांधणी हे शास्त्र आहे आणि जगात त्याबाबत सातत्याने अभ्यास होत असतो. भारतात मात्र हा विषय कायमच कमी महत्त्वाचा मानला गेला, त्यामुळे अपघात नियंत्रण हे या देशापुढील मोठे आव्हान आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मद्रास उच्च न्यायालयाच्या वाहन न्यायाधिकरणाने 15 फेब्रुवारी 2021रोजी दिलेल्या एका निकालामध्ये अपघातास मोठी वाहनेच कारणीभूत असतात, ही मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अवघड वळणे हे वाहन चालकांसाठी अडचणीचे असते, म्हणून केंद्र सरकारने 12 हजार कोटी रुपये खर्च करून अपघातप्रवण स्थळे दुरुस्त केल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. रस्ते बांधणीतील त्रुटी दूर करून वाहन चालवणे अधिक सुकर व्हावे, यासाठी गेल्या सात दशकांत काळजीपूर्वक प्रयत्न झाले नाहीत, असा याचा अर्थ. राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळू शकत नाही, चुकीच्या पद्धतीने वाहने शिक्षेच्या रकमेत वाढ करण्याने केवळ पोलिसांचे भले होते. अपघात ठरवून होत नसतात, परंतु ठरवून टाळता येतात, हे सूत्र लक्षात ठेवून शालेय पातळीवरच त्याबद्दलचे शिक्षण देणे अधिक आवश्यक आहे. वर्षातून एक महिना रस्ते सुरक्षा पाळून हा प्रश्न निश्चितच सुटणारा नाही. 

जगभरात वर्षाला साडेबारा लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात.जखमींचा आकडा त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. या जगाने दोन महायुद्धे पाहिली.सुनामी,भुकंपासारखे मोठे प्रलय पाहिले,पण अपघातातील बळींची संख्या ही या प्रलयांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षा ही काळाची गरज आहे. रस्ता अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर आपल्या लक्षात येईल की, या अपघातातील बळींमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. 15 ते 28 या वयोगटातील बळींची संख्या आपली चिंता वाढवणारी आहे. दरवर्षीच्या एकूण रस्ते अपघातापैकी 15 ते 44 या वयांतल्या व्यक्ती मरण पावण्याचे प्रमाण 72 टक्के आहे. करायला-सावरायला आलेली ही पिढी अशी रस्ते अपघातांची बळी ठरत असल्याने कुटुंब,समाज आणि देशाचे मोठे नुकसान करणारे आहे. स्वत:ची कर्तबगारी दाखवण्याचे,भरभराट करण्याचे,देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे हे वय असते. ही एक प्रकारे राष्ट्रीय हानीच म्हणायला हवी.हे टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्य महामार्ग पोलिस दलाकडून रस्ता अभियान राबवण्यात येते.मात्र यात फारसा दम नसतो. कुठे तरी औपचारिक कार्यक्रम उरकले जातात. ग्रामीण भागात तर याचा मागमूसच नसतो. त्यामुळे या रस्ता अपघाताबाबत सर्व स्तरातून जागृतीचा उठाव झाला पाहिजे.लोकप्रतिनिधी,सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालय, अन्य शासकीय-खासगी कंपन्यांमधून याबाबत मोठ्या प्रमाणात जागृती व्हायला हवी आहे.

रस्त्यावर वाहन चालवताना सगळे व्यवधान समोर असले पाहिजे. आणि मुळात म्हणजे नशापान करून वाहन चालवू नये, यावर अधिक भर दिला पाहिजे. वेगावर नियंत्रण मिळवले की,संभाव्य अपघातातून  बर्‍याच गोष्टींना नियंत्रणात आणता येते.तरुण पिढी भन्नाट वेगाची दिवानी आहे.त्यांना त्यांच्या भावी कर्तबगारीची,भरभराटीची जाणीव व्हायला हवी आहे,त्यांना ती करून देण्यासाठी पोलिसांसह, शिक्षक-प्राध्यापक,वक्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी ती शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांत बिंबवली तर ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहते. तिसाव्या किंवा चाळीसाव्या वर्षात नवीन काही शिकण्याची ऊर्मी त्यामानाने कमी झालेली असते.त्यामुळेच रस्ते सुरक्षा नियमांची माहिती देण्यापासून त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर आणून प्रॅक्टिकल घेतले जायला हवे.

अपघातात अगदी लहानसहान चुकांमुळे होत असतात. पण त्यामुळे एखाद्याला प्राणाला मुकावे लागते.नेमक्या याच चुका टाळण्यासाठी जागृतीला महत्त्व आहे. हेल्मेट न घालणे,रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर,नशापान करून गाडी चालवणे,सिग्नल तोडणे,अतिवेग,नजरेसमोर अपघातात झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे,पोलिसांना मदत न करणे अशा अनेक बाबी वाहनचालक किंवा लोकांकडून घडतात. जागृती करतानाच पोलिसांनीही कायद्याची कसून अंमलबजावणी करायला हवी. त्याशिवाय वाट चुकलेला माणूस सरळ मार्गावर येणार नाही. चिरीमिरी किंवा वरिष्ठांच्या,पुढार्‍यांच्या दवाबाला बळी न पडता त्यांनी आपले कर्तव्य त्यांनी चोख बजावायला पाहिजे. कर्तव्यदक्ष कर्मचार्‍यांची सुरक्षितता वरिष्ठांनी जपली पाहिजे. 

आणखी एक महत्त्वाचे म्हणजे पोलिसांकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. वाहतूक मदत केंद्रांचा अभाव आहे.शासनाने याकडे लक्ष देऊन या भरती प्रक्रिया राबवली पाहिजे. सुसज्ज प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मदत केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे. वाहने उपलब्ध करून देतानाच पोलिसांपुढे आलेल्या अडचणींचा निपटारा केला पाहिजे. वाहनधारकांनीही आपली स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. लवकर घरी जाण्याची घाई करण्यापेक्षा आपण सुरक्षित घरी जातोय की नाही, हे बघितले पाहिजे. आपली घरी कोणीतरी वाट पाहात आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली

No comments:

Post a Comment