परदेशात पिकवले
जाणारे ड्रॅगन फळ अलिकडच्या काही वर्षात भारतात आले.याचे औषधी गुणधर्म, कमी पाण्यावर पिकणारे
आणि औषध,खतांचा फारसा खर्च नाही,यामुळे
ड्रॅगन फळाची शेती देशात
विशेषत: दुष्काळी भागात वाढू लागली आहे.सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातही अनेक शेतकर्यांनी ड्रॅगनची शेती करून आपली उन्नती साधली आहे. उटगी
येथील धानाप्पा आमसिद्धा लिगाडे यांनीही अल्पशिक्षित असतानाही ड्रॅगन शेतीत चांगले
उत्पन्न मिळवले आहे. सध्या हंगाम सुरू असून पहिल्या टप्प्यात
त्यांनी फक्त अर्ध्या एकरात तब्बल चार लाखाचे उत्पन्न घेतले आहे. सध्याला त्यांनी पुण्याच्या बाजारात फळे पाठवली आहेत.हंगाम संपेपर्यंत चांगले उत्पन्न हाती लागणार आहे.
दुष्काळी भागात
डाळिंब बागांचे क्षेत्र अलिकडच्या काही वर्षात वाढले आहे. कमी पाण्यावर येणार्या पिकावर तेल्यासारखे रोग पडल्याने संपूर्ण बागाच उद्धवस्त होत आहेत.
शिवाय क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढल्याने डाळिंबाला दर कमी येऊ लागला
आहे. त्यामुळे शेतकरी आता ड्रॅगन फळशेतीकडे वळला आहे.उमेश यांनीही गेल्यावर्षी ड्रॅगनची लागवड केली. प्राथमिक
शिक्षक असलेल्या बंधुं उमेश लिगाडे यांच्या मदतीने त्यांनी कर्जत,रायगड या भागात फिरून ड्रॅगनशेतीची माहिती घेतली.मार्गदर्शन
घेतले आणि तेथूनच एक हजार रोपे आणून त्यांची लागवड केली. दहा
बाय सात आणि बारा बाय सात अशा अंतरावर सिमेंटचे पोल उभा केले. सिमेंटच्या पोलला गोल रिंग बसवून एका पोलला चार रोपे लावली. हे वेल निवडुंगवर्गीय असल्याने ते त्या सिमेंट पोल आणि रिंगवर वाढते.
याला कमी पाणी लागते.त्यामुळे लिगाडे यांनी ठिबकची
व्यवस्था केली. वर्षातून दोनवेळा शेणखताची मात्रा पुरेशी ठरते.त्यामुळे औषधे,रासायनिक खते यांचा खर्च वाचला आहे.
धानाप्पा लिगाडे
यांनी एका एकरात निम्म्या जागेवर लाल रंगाचा गाभा असणारी ड्रॅगन फळांची
रोपे लावली आहेत तर निम्म्या जागेवर पांढर्या गाभ्याची फळे लावली
आहेत.या फळात सर्व प्रकारचे जीवनसत्त्व असतात. खायला काहीसे बेचव असणारी ही फळे बहुउपयोगी असल्याने त्यांना शहरांमध्ये मोठ्या
प्रमाणात मागणी आहे. उत्पादन कमी असल्याने आणि मागणी अधिक असल्याने
भावही चांगला मिळत आहे. सध्या फळांचा हंगाम सुरू आहे.
सध्या किरकोळ विक्रीत नगाला 80 ते 130 रुपये भाव मिळत आहे.वरच्या बाजूला गर्द रंगाचे असलेले
हे फळ मधुमेहाचा त्रास कमी करणारे आणि पांढर्या पेशी वाढवणारे
आहे. रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाणही याच्या सेवनाने वाढत असल्याचे
सांगण्यात येते. साहजिकच याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
एकरात एका हंगामात
चार लाखाचे उत्पन्न सहज मिळते. विजापूर,बेंगळुरू,मुंबई अशा बाजारपेठा
उपलब्ध आहेत.श्री.लिगाडे यांना एक एकर ड्रॅगन
रोपांच्या लागवडीसाठी ठिबक, 250 सिमेंट पोल,त्यावर रिंग असा सुमारे एक लाख खर्च आला आहे.शिवाय त्यांनी
याची रोपवाटिकाही केली आहे. त्यांनी परिसरातील अनेकांना रोपे
दिली आहेत. यातून त्यांना गत हंगामात दीड लाखाचे उत्पन्न मिळाले
आहे.यातले यश पाहून त्यांनी आणखी पाच एकरावर ड्रॅगनची लागवड करायला
घेतली आहे.सातशे पोल त्यांनी उभे केले असून रोप लागवडीचे काम
हाती घेतले आहे.
No comments:
Post a Comment