Friday, August 4, 2017

सफरचंदावर मेण,व्हॅसलिनचा थर

     सफरचंदाला चकाकी येण्यासाठी मेणाचा आणि व्हॅसलिनचा थर लावले जात असल्याचा प्रकार कुठे ना कुठे घडत असल्याचे आपल्या वाचनात आणि पाहण्यात येत असतात. खरेच असा प्रकार माणसाच्या आरोग्याच्याडृष्टीने धक्कादायक म्हणावा लागेल. सध्या नफेखोरीसाठी भेसळ हा प्रकार वाढीस लागला आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकाराबाबत कायदेही मोठे कडक करण्यात आले आहेत. असे असतानाही भेसळीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. भेसळ कशात नाही, हेच सांगणे अवघड आहे.दुधापासून चहा पावडरपर्यंत सगळ्यात आपल्याला भेसळ पाहायला मिळते.फळे पिकवण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर हाही प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अलिकडच्या काळात फळांना चकाकी यावी, ती ताजीतवानी दिसावीत, यासाठी बरेच काही लोकांच्या शरीराला घातक ठरणार्या गोष्टींचा वापर करण्यात येतो. वास्तविक अशा घातक़ घटनांना आवर घालण्याची गरज आहे. मात्र आपल्याकडच्या भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या सरकारी यंत्रणांमुळे असे प्रकार बिनबोभाट सुरू आहेत.या यंत्रणेवर कुणाचा धाक राहिला नाही की नैतिकतेला स्थान राहिले नाही. फक्त पैसा एके पैसा,एवढेच पाहिले जात आहे. त्यांना लोकांच्या आरोग्याचा काहीएक संबंध नाही.

     रोज एक सफरचंद खा आणि रोगाला पळवून लावा, असे म्हटले जाते.त्यामुळे लोक कितीही महागडे असले तरी खायचे सोडत नाही. अगदी गरिबातला गरीबदेखील आपला नातेवाईक किंवा मित्र आजारी पडला तर हटकून सफरचंद विकत घेतात आणि आजारी माणसाला देतात. आपला मित्र, नातेवाईक लवकरात लवकर बरा व्हावा, असा प्रामाणिक हेतू त्यामागे असतो. सध्या सफरचंदाचा हंगाम नाही. त्यामुळे परदेशातून आयात केलेली फळे इथल्या बाजारात विकताना दिसतात. की फळे तोडून बरेच दिवस झालेले असतात. ती ताजी आणि टवटवीत दिसावीत,यासाठी व्हॅसलिन आणि मेणाचा वापर फळाच्या पृष्ठभागावर केलेला असतो..फळाला चकाकी आल्याने ती ताजी वाटतात आणि गिर्हाईक त्याकडे आकृष्ट होतात.मेण आणि व्हॅसलिन यांच्या सेवनाने तात्काळ काही परिणाम शरीरावर होत नाही, मात्र स्लो पॉयझिंग होऊन पुढच्या काळात कसल्या ना कसल्या व्याधी होतात.
     व्यापार-व्यवसाय करणारे नफेखोरीसाठी अशा गोष्टींचा अवलंब करतात, त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून ग्राहकाला मोठी सावध भूमिका घ्यावी लागते.ग्राहकालाच अगदी खबरदारी घ्यावी लागणार आहे.भेसळीसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी बरेच कडक कायदे आहेत.या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास लोकांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे. प्रशासनाने याकडे मोठ्या गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 

No comments:

Post a Comment