पंतप्रधान नरेंद्र मोदी संकल्प सोडण्यावर
अधिक भर देताना दिसत आहेत. परवाही त्यांनी लाल किल्ल्यावरून न्यू
इंडिया चा संकल्प सोडला आहे. त्यांच्या नव्या संकल्पानुसार 2022 पर्यंत सुरक्षित समृध्द,
शक्तिशाली, समान संधी देणारा, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगामध्ये दबदबा निर्माण करणारा
नवा भारत निर्माण करायचा आहे. तसा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे. मात्र नरेंद्र
मोदी यांनी यापूर्वी लाल किल्ल्यावरुन दिलेली काही आश्वासने
अद्याप पूर्ण झालेली नाहीत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
परदेशात जाऊन विरोधकांवर तोंडसुख घेणारे मोदी आपण कसे भारताचे कैवारी
आहोत,हेच पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यासाठी ते कसलीही कसर बाकी ठेवत नाहीत. पण प्रत्यक्षात
त्यांनी ज्या काही घोषणा केल्या किंवा संकल्प सोडले ते अजूनही पूर्ण झालेले नाहीत.
नोटबंदी आणून त्यांनी सर्वसामान्यांना वेठीस धरले. काळा पैसा बाहेर काढू आणि तो गोरगरीबांना वाटून सोडू असे जाहीर केल्याने लोकांनी
मरणयातना सोसून त्यांना साथ दिली. रात्रंदिवस बँकांबाहेर उपासीतापासी
उभे राहून चार-दोन नोटा मिळवल्या,पण कुरकुर
केली नाही.पण यातून काळा पैसा बाहेर आलाच नाही. नोटाबंदीमुळे जुन्या नोटांचा आणि नव्या नोटांचा खर्च मात्र जनतेच्या माथी मारला.
परदेशातली धनदांडग्यांची, राजकीय नेत्यांची गुंतवणूक बाहेर
काडू आणि भारतात आणू, अशीही वल्गना त्यांनी केली,पण अजूनही स्वीस बँकेतला पैसा भारतात आला नाही.त्याचबरोबर खासदारांसाठीची आदर्श ग्राम योजना
जिथल्या तिथे आहे.खासदार तर राहू द्या, आमदारांनी दत्तक घेतलेली गावेदेखील तशीच समस्येच्या गर्देत सापडली आहेत. जनधन खात्यांचा गरिबांना किती फायदा
झाला हा संशोधनाचा विषय आहे. नोटाबंदीच्या काळात झालेला या खात्यांचा
गैरवारप हाही प्रश्न मागे पडला आहे. तीन
वर्षात ‘स्किल इंडिया’ कार्यक्रमाला मिळालेले
अल्प यश, तरुणांसमोरील रोजगारीचा प्रश्न अशा असंख्य मुद्द्यांवर मोदी सरकारला मोठे यश मिळालेच नाही. तरीही पंतप्रधान नवनवे संकल्प सोडताना दिसत आहेत. आता
लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. लोकांना चुचकारण्यासाठी त्यांनी
नवे संकल्प सोडले आहेत, मात्र लोकांनी त्यांचे मागचे संकल्प विसरले
नाहीत. त्यामुळे घोषणाबाज पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख व्हायला
लागली आहे.
भारत देशाला
सतावणार्या चीन किंवा पाकिस्तानचा उल्लेख
त्यांनी आपल्या लाल किल्ल्यवरच्या भाषणात टाळला आहे. सीमेपलीकडील
शत्रू पाकिस्तान किंवा भूतानच्या सीमेवर भारताला आव्हान देत असलेल्या चीनसह कुठल्याही
शेजारी देशाचा उल्लेख करायचे जाणीवपूर्वक टाळण्यामागचे इंगित काय आहे, असा प्रश्नही सामान्यांना पडणे स्वाभाविक आहे.
प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाचे रक्षण आणि सुरक्षेचा मुद्दा स्वाभाविकपणे
डोकावतो. आपल्या भाषणात त्यांनी देशाच्या आणि अंतर्गत सुरक्षेला
आमचे प्राधान्य आहे. सायबर असो वा अवकाश, सर्वप्रकारच्या सुरक्षेसाठी भारत सामर्थ्यवान आहे आणि आमच्या देशाविरुध्द काहीही
करू पाहाणार्यांचा पराभव करण्याची आमची ताकद आहे, अशा अप्रत्यक्ष आणि मोजक्या शब्दात त्यांनी बाह्य धोक्यांचा परामर्श घेतला.
केंद्र तसेच उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर नामुश्की ओढवणार्या गोरखपूरमधील बालमृत्यूच्या दुर्दैवी घटनेचा देशावर ओढवणार्या नैसर्गिक आपत्तींच्या ओघात उल्लेख केला. निरागस मुलांच्या
मृत्यूच्या या संकटाच्या घडीमध्ये सव्वाशे कोटी भारतीयांच्या संवेदना सोबत आहेत.
या संकटाच्यावेळी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही कृतीची उणीव जाणवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली असली तरी पंतप्रधान मोदी यांनी देशाला भेडसवणार सर्वात
मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी, याकडे मात्र
दुर्लक्ष केले. रोजगाराच्या मुद्द्यांचा ओझरताच उल्लेख त्यांनी
केला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
झपाटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी आमची सामूहिक
संकल्प शक्ती, सामूहिक पुरुषार्थ आणि सामूहिक प्रतिबध्दता प्रयत्नांची
पराकाष्ठा करण्यासाठी कामी यावी, अशी प्रेरणा देताना न्यू इंडियाचा
संकल्प घेऊन आम्हाला देशाला पुढे न्यायचे आहे, असे ते म्हणाले.
तिहेरी तलाकमुळे पीडित महिलांसोबत देश उभा असून या प्रथेविरुध्द संघर्ष
करणार्या महिलांच्या लढ्यात देश पूर्ण मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या या चौथ्या भाषणात पुन्हा एकदा देशवासियांना
आश्वस्त करताना सांगितले की, 2022 साली
आपल्याला ‘न्यू इंडिया’ घडविण्याचा संकल्प
आम्ही केला आहे. शेवटचे एक वर्ष मोदी सरकारचे राहिले आहे.
त्यांनी पुढची पाच वर्षे पुन्हा आम्हाला द्यावीत, अशा प्रकारचा संदेशच त्यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. मागची चार वर्षे अशीच संकल्प सोडण्यात गेली, आणखी पाच
वर्षे संकल्प सोडण्यासाठी द्यावीत, त्याची पूर्ती कधी होईल ती
होईल,त्याची कशाला घाई करायची, असाही संदेश
त्यांच्या भाषणातून मिळतो.
No comments:
Post a Comment