Friday, August 11, 2017

पुस्तके आयुष्याची मार्गदर्शके

      जगात जी काही क्रांती झाली ती केवळ बंदुकीच्या बळावर किंवा हिंसाचारानेच झालेली नाही. पुस्तकांचाही त्यात फार मोठा वाटा आहे,असे म्हटले जाते. आणि ते खरेही आहे. पुस्तके म्हटले की, साहित्य आलेच. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात हे सांगण्यासाठी कुणाची गरज नाही. पण, संगणकाच्या शोधापासून आधुनिक तंत्रज्ञानात जे बदल झाले,त्यामुळे पुस्तके वाचण्याकडे लोकांचा कल कमी झाला, असे म्हटले जातेय. वाचन संस्कृतीवर खरंच फरक पडलाय का? पडला असेल तर संगणक क्रांती कारणीभूत आहे. असे अनेक प्रश्न आपल्याला पडतील.पण, पुस्तके वाचनामुळे मानवी मन सुसंस्कृत आणि विचारांनी प्रगल्भ होत असते, हे नाकारता येत नाही.इतिहासासारख्या विषयातून जुन्या घटनाक्रमांना उजाळा मिळतो आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळत असते. विज्ञानासारखा विषय परिवर्तनशील असून, मानवाला नवनवीन माहिती देण्याचा प्रयोग सातत्याने सुरू असतो. हे सर्वांनाच माहिती आहे. पण, पुस्तक वाचनाचा आणखी एक फायदा समोर आला आहे. तो समजल्यानंतर एरवी पुस्तक समोर येताच डुलकी लागणारे नित्यनेमाने त्यांचे वाचन करण्याची शक्यता आहे. चांगल्या पुस्तकाचे तल्लीनतेने वाचन करण्याने आयुष्य वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. अध्यात्मासारखा विषय तर धार्मिक लोक सहज आणि तल्लीनतेने वाचून काढतात.

      अमेरिकेतील येल विद्यापीठाने यासंदर्भात केलेला अभ्यास वाचन चळवळ वाढविण्यास मोलाचा हातभार लावू शकते. अभ्यासकांनी ३५00 हून अधिक महिला तसेच पुरुषांचे आरोग्य आणि त्यांच्या सवयींचा जवळपास १२ वर्षे अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. चांगली कथा वाचल्याने मेंदू सक्रीय राहून तणावापासूनही मुक्ती मिळते, असे संशोधकांना आढळून आले आहे. दररोज ३0 मिनिटे वाचन करण्याची सवयही उपयुक्त ठरू शकते. दैनिके व नियतकालिकांपेक्षा पुस्तक वाचनाने बुद्धी अधिक सक्रीय रहाते आणि त्यामुळे आयुष्य वाढते. अभ्यासाच्या प्रारंभी किमान ५0 वर्षे वयाच्या लोकांना तुम्ही पुस्तके, वृत्तपत्रे व नियतकालिकांचे नियमित वाचन करता का, करत असल्यास वाचनाला किती वेळ देता, तुमचे आरोग्य कसे आहे आणि तुम्ही विद्यापीठात शिक्षण घेतले आहे काय, यासारखे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते. या अभ्यासात वाचन करणार्‍या लोकांच्या तुलनेत वाचनाची आवड असणारे लोक अधिक काळ जगल्याचे आढळले आहे.
     अभ्यासादरम्यान पुस्तकांचे वाचन करणार्‍यांच्या मृत्यूचे प्रमाण इतरांच्या तुलनेत सुमारे २0 टक्क्य़ांनी कमी राहिले. वेगवेगळ्या शैलीचे पुस्तक वाचण्याचा वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. यापूर्वीच्या एका संशोधनात पुस्तक स्क्रीनवर वाचण्याऐवजी कागदावर आणि शाईने लिहिलेला मजकूर वाचणे अधिक फायद्याचे असते. वेगवेगळ्या विषयांमुळे पुस्तकांची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे जेवढे वाचन केले तेवढे कमीच आहे. वाचनामुळे मिळणारे मानसिक समाधान, आनंद वेगळाच असतो. माणसाचे ज्ञान कुणी विकत घेऊ शकत नाही, हे खरे असले तरी पुस्तकांच्या वाचनामुळे मिळणारा आनंद आयुष्याचा ठेवा असतो. वाचनाने व्यक्ती समृद्ध बनते. विचारांची श्रीमंती वाढते. नवनवीन विचार स्फुरतात. कल्पनाशक्ती तरल बनते. विचार प्रवाही बनतात. लिहिण्याचा तसेच बोलण्याचा वेग वाढतो. स्मरण प्रक्रियेत प्रवाहीपणा येतो. आठवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. वारंवारच्या उजळणीमुळे त्यात एक ताजेपणा येतो. वाचनाने व्यक्ती समृद्ध बनते. विचारांची श्रीमंती वाढते. नवनवीन विचार स्फुरतात. कल्पनाशक्ती तरल बनते. विचार प्रवाही बनतात. लिहिण्याचा तसेच बोलण्याचा वेग वाढतो. स्मरण प्रक्रियेत प्रवाहीपणा येतो. आठवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. वारंवारच्या उजळणीमुळे त्यात एक ताजेपणा येतो.


No comments:

Post a Comment