
देशातील विविध विरोधी
पक्षासह सामाजिक संघटनांनी डोकलाम प्रश्नावर आतापर्यंत कोणतीही भूमिका घेतलेली
नाही. याचे आश्चर्य वाटते. आपणही सत्तेचे वाटेकरी असल्याच्या अविर्भावात ते
वागताना दिसताहेत. नाहीतर नेस्ले सारख्या कंपन्यांविरोधात रान माजवून मॅगीचे
तीनतेरा वाजवणारे आता कुठे गायब झाले आहेत, याचा शोध
घेण्याची वेळ आली आहे. देशातच नव्हे तर जगभरात सर्वात मोठी डिजिटल ई-पेमेन्ट सेवा
देणारी पेटीएम सारख्या कंपनी विरोधात राष्ट्रवादी संघटना, स्वदेशीचा
पुरस्कार करणार्या संघटना व नागरिकांनी एकही शब्द काढलेला नाही. आता राजकीय पक्ष
व सामाजिक संघटना कमालीच्या शांत झाल्याचे दिसते. याचा शोध घेण्याची गरज आहे. एरवी
सिलेंडर आणि पेट्रोलच्या भाववाढीवरून रस्त्यावर उतरणारी जनता गप्प दिसते.पीक कर्ज
माफीसाठी बंद पुकारणारे शेतकरी यांना देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे ,हे दिसत नाही.सध्याचा काळ मोठा कठीण आहे. अशा वेळेला सर्व मतभेद विसरून
सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. पण आमच्या देशात असे घडत नाही,हे देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या लोकांसाठी क्लेशकारक आहे.
सत्ताधारी पक्ष विरोधकांवर वरचढ
होण्याची एकही संधी सोडत नाही तर काँग्रेस आणि तत्सम विरोधी पक्षही हल्ले परतवून
लावण्यात गर्क आहे.त्यामुळे या प्रकरणात कुठलाच पक्ष आपली भूमिका मांडायला तयार
नाही. देशातील राजकीय व समाजसेवी संघटना आहेत त्या सरकारला अडचणीचे ठरू नये
म्हणून चिनी मालावर बहिष्काराची भूमिका घेत नसाव्यात. शिवाय अनेक कथित उचापतखोर हे
गोमांसावरून दहशत पसरवण्याच्या नादी लागले आहेत. त्यामुळे त्यांना डोकलाममध्ये
देशावर उठलेले संभाव्य संकट दिसत नसावे. किंवा त्यांना गोभक्ती जास्त प्रिय वाटत
असावी. तर सामान्य नागरिक आपल्या देशासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी
पुढे येताना दिसत नाहीत.
कॉंग्रेससह सर्व विरोधी
पक्षही संभ्रमात दिसतात. हे कथित आणि धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा धारण करणारे आज चिनी
वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन करून या मुद्दाचे राजकीय भांडवल करू शकतात. पण
त्यासाठी राजकीय दुरदृष्टी हवी. गेल्या काही वर्षात देशभक्तीचा मुद्दा केवळ सत्ता
मिळवण्याचे प्रचारकी साधनच बनला आहे. चीनविरोधात अद्याप एकतरी तिर राजकीय
पक्षांच्या भात्यातून अद्याप सुटलेला नाही, याचेच जास्त आश्चर्य
वाटतेय. सामान्य नागरिकांचेही वर्तन तसेच आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कारासाठी
देशप्रेमी नागरिकांनी तरी आता पुढाकार घेण्याची गरज आहे. सुजाण नागरिक चीन विरोधात
केव्हा आवाज काढणार, की त्यासाठी अजून मुहूर्त शोधला जात आहे
काय, असे प्रश्न अस्वस्थ करीत आहे. विशेष म्हणजे देशातील
कोणत्याही पक्षाच्या धाजिर्ण्या नसलेल्या संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी आतातरी
चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यास सुरुवात करून चीनला आव्हान देण्याची हिम्मत
दाखवायलाच हवी. नाहीतर भारतीय जनतेच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
जाईल. चिनी वस्तूंवर घराघरातून बहिष्कारचे सूर उमटू लागले तर डोकलाममधील चिन्यांची
दादागिरी आपोआप मोडित निघेल. चिन्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आणि संधी
आहे.यासाठी सगळ्यांनीच पुढे येण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment