Wednesday, August 2, 2017

राखी बांधण्यासाठी फक्त दोन तास चाळीस मिनिटांचा मुहूर्त

     श्रावण महिन्याची पौर्णिमा सात ऑगस्टला आहे. हा दिवस श्रावणी पर्व किंवा रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी चंद्रग्रहण आहे.त्यामुळे दुपारी 11 वाजून 10 मिनिटे यापासून 1 वाजून 52 मिनिटांपर्यंतच बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकणार आहेत.त्यामुळे तमाम महिला भगिनी कोड्यात पडल्या आहेत.

     यंदा रक्षाबंधन काळात रात्री चंद्रग्रहण लागणार आहे. त्यामुळे बहिणींना आपल्या भावांना राखी बांधायला कमी कालावधी मिळणार आहे. चंद्रग्रहण लागण्याच्या अगोदरच्यादिवशी ग्रहणाचे सूतक लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी रक्षाबंधन, चंद्रग्रहण आणि श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार योगायोगाने एकत्र येत आहेत. रक्षाबंधनाच्या रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण रात्री 12 वाजून 48 मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहणाचे सूतक दुपारी 1 वाजून 52 मिनिटापासून लागणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत भद्रा असल्या कारणाने यापूर्वी राखी बांधता येणार नाही. त्यामुळे भगिनींना 11 वाजून 10 मिनिटापासून 1 वाजून 52 मिनिटापर्यंतच आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे.
     रक्षाबंधन हा बहीण-भावांचा प्रेमाचा सण आहे. धार्मिक सण साजरा करण्यामध्ये अनेक गोष्टी लपल्या आहेत. रक्षाबंधनला भाऊ बहीणीकडे तिच्या सासरी जाऊन राखी बांधून घेतो आणि तिला भेटवस्तू देतो. सासरी आपली बहीण कशा अवस्थेत आहे. सासरचे लोक,बहिणीचा नवरा तिच्याशी कशाप्रकारे वागतात, कशी वागणूक देतात हे पाहणे खरे तर भावाचे कर्तव्य असते.हे पाहता यावे,हा सदहेतू या सणामागे आहे. याशिवाय आपल्या नवर्‍याचे रक्षण आणि विजयप्राप्तीसाठीदेखील रक्षाबंधनाचा सदुपयोग होत राहिला आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये याचे सविस्तर वर्णन मिळून येते. जाणकारांच्या म्हणाण्यानुसार रक्षाबंधनाबरोबरच पितृतर्पण आणि ऋषिपूजनही करायला हवे. या सणात पुरोहित मंडळी आपापल्या यजमानांना रक्षासूत्र बांधतात. वृक्षारोपण,तुलसीचे रोप लावणेदेखील चांगले आहे.
     श्रीकृष्णाने युधिष्ठिरला महाभारत युद्धाच्या प्रारंभी रक्षासुत्राच्या अपार ताकदीबाबत सांगितले आहे. श्रीकृष्ण म्हणाला होता की, युधिष्ठिरने आपल्या सैन्यासोबत हा उत्सव साजरा करावा,यामुले सैन्य आणि पांडवांचे रक्षण होईल. भविष्यपुराणात सांगितले आहे की, इंद्राच्या पत्नीने-इंद्राणीने असुरांशी युद्ध करण्यासाठी जाताना ऊंदुं दुर्गे-दुर्गे रक्ष रक्ष स्वाहा या मंत्राने अभिमंत्रित रक्षासूत्र बांधले होते. आणखी एका कथेनुसार राजा बळीला वामनाने प्रसन्न होऊन वरदान दिले होते. बळीने विष्णूला नेहमी आपल्यासमोर राहण्याचे वरदान मागितले होते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी भगवान विष्णू पृथ्वीवर राजा बळीचा द्वारपाल बनला होता. तेव्हा लक्ष्मीने विष्णूला परत बोलवण्यासाठी बळीला राखी बांधली आणि उपहार स्वरुपात विष्णूला मागितले. अशाप्रकारे लक्ष्मीने विष्णूला प्राप्त केले. या दिवशी रक्षासूत्र (धागा) बांधणार्‍या भावांना जीवनात कसल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत.
     येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥ या मंत्राचे उच्चारण  उजव्या हाताला राखी बांधताना करावे, असे म्हटले आहे. या मंत्राबरोबरच देवगुरू बृहस्पती यांनी श्रावणी पौर्णिमेच्यादिवशी देवराज इंद्राला इंद्राणीद्वारा रक्षासूत्र बांधायला सांगितले होते.ज्यांना भाऊ नाही, त्यांनी सगळ्यात अगोदर श्री गणेशाला दुर्वाची राखी बांधावी. यामुळे सगळे विघ्न दूर होतात, असे शास्त्रात म्हटले आहे.


No comments:

Post a Comment