रेशीम उद्योग हा शेतीला एक
चांगला जोडधंदा म्हणून पुढे आला आहे. कमी भांडवलात हमखास फायदा देणारा हा उद्योग
आपल्या महाराष्ट्रात चांगलाच फोफावू लागला आहे. वास्तविक आपल्याकडे पावसाच्या
पाण्यावर शेती करण्याकडे अधिक कल आहे.याला कारण म्हणजे पाऊसमान कमी, त्याचा लहरीपणा. साहजिकच पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता.
भांडवलाचा अभाव.पण त्यातूनही काही जिद्दी शेतकरी नव्या वाटा चोखाळत नवनवे प्रयोग
करताना आणि त्यात यशस्वी होताना दिसतात. रेशीम उद्योगाने अशा कष्टाळू,जिद्दी शेतकर्यांना चांगलाच मदतीचा हात दिला आहे. सांगली जिल्ह्यातल्या
तासगाव तालुक्यातल्या पुणदी गावच्या संगम बनसोडे या अल्पशिक्षित तरुण शेतकर्याच्या
घरात रेशीम उद्योगाने समृद्धी आणली आहे.
तासगाव शहरापासून पूर्वेला
अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पुणदी गाव आहे. दारिद्ˆयात
दिवस काढणार्या संगम बनसोडे याची वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे.या जमिनीत
कुसळंही येत नाहीत, अशी परिस्थिती असताना त्याने आपल्या
हिकमतीच्या जोरावर रेशीम उद्योगातून एका एकरात वर्षाला तीन ते साडेतीन लाखाचे
उत्पन्न मिळवले.एक एकर तुती आणि साधा पत्र्याचा शेड यावर सुरु केलेला व्यवसाय आज
त्याला समृद्धी देऊन गेला आहे. गावात त्याने टुमदार घर तर बांधले आहेच.शिवाय
दोन्ही मुलींना अभियांत्रिकीसारखे महागडे शिक्षणही देऊ केले.नोकरीची आस धरलेल्या
तरुणांना त्याने आपल्या कृतीतून एक चांगला संदेश देत आदर्श निर्माण केला आहे.
रेशीम किड्यापासून केवळ 28 दिवसात रेशीम कोष तयार होण्याच्या कालावधीत दिवसातून फक्त
दोन तास काम करायचे. महिन्याकाठी 35 ते 40 हजार रुपये हा उद्योग मिळवून देतो. अत्यंत कमी भांडवलातला हा उद्योग
सेंद्रीय शेती उद्योगही आहे. कोणतेही शेती औषध किंवा रासायनिक खतांची आवश्यकता
नाही. त्यामुळे पर्यावरणासही काही धोका नाही.कच्चा माल तुती व रेशमी किड्यांचे
अंडे उपलब्ध होण्यास फारशी अडचण नाही. सांगली,कोल्हापूर,बीड, सोलापूर,सातारा या
भागातील शेतकर्यांना कर्नाटकात व्यापार केंद्रे उपलब्ध आहेत. चांगला भाव मिळत
असल्याने आर्थिक फटका बसण्याचा धोका नाही.रेशीम उद्योगामुळे अनेक शेतकर्यांच्या
घरात भरभराट आली आहे.
रेशीम शेती, उद्योग करणारे शेतकरी आणि यातील जाणकार यांच्याशी गप्पा
मारल्यावर हा उद्योग खरोखरच समृद्धी देणारा असल्याचे लक्षात येते. या उद्योगापासून
आपणास मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत असल्याचे त्यांच्या तोंडून ऐकायला
मिळाले. भारतात रेशीम उद्योग हा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात राबविला जात
आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू
या राज्यांचा पारंपरिक रेशीम उद्योग करणारी राज्ये म्हणून उल्लेख केला जातो.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार
आपल्या महाराष्ट्रात देखील रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
रेशीम उद्योग घेणार्या अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर
आहे.राज्यामध्ये एकूण 20-22 जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग
शासनामार्फत राबविला जात आहे.रेशीम उद्योगामध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता असून
ग्रामीण भागाचा कायापालट करणारा आहे. एक हेक्टर बागायत तुती पासून वर्षात 666 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. रेशीम उद्योगाविषयी माहिती
सांगताना कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे म्हणाले की, हा
उद्योग प्रामुख्याने तीन विभागात विभागला गेला आहे. पहिला म्हणजे तुती लागवड करुन
तुती पाला निर्मिती करणे.दुसरा रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती
करणे.आणि तिसरा विभाग म्हणजे कोष काढणे , रेशीम कोषापासून
रेशीम धागा निर्मिती करणे .
रेशीम अळीचे मुख्य खाद्य हे तुती
झाडाचा पाला आहे. तुती पाला निर्मितीकरिता पाण्याचा निचरा होणारी, सकस काळी कसदार जमीन असायला हवी. तुती झाडांची वाढ चांगल्या प्रकारे
होण्यासाठी जमिनीस शेणखत त्याचबरोबर हिरवळीची खते, गांडूळ खत,
इतर मायक्रोन्यटिंयटस गरज आहे. तुती झाडांची लागवड एकदा केल्यानंतर
जवळ जवळ 15 ते 20 वर्षे नविन तुती
झाडांची लागवड करण्याची आवश्यकता नाही. सुधारीत पट्टापध्दतीने तुती झाडांची लागवड
केल्यास कमीतकमी खर्चात अधिक पाला निर्मिती करता येते. 5 बाय 3 बाय 2 या पट्टा पध्दतीचा
वापर करायला हरकत नाही, असे श्री. लांडगे यांनी सांगितले. तुती झाडांची लागवड ही
प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट व
सप्टेंबर या कालावधीमध्ये केली जाते. कलमापासून तसेच तुती रोपाव्दारे सुध्दा लागवड
करता येते. कलमापासून तुती लागवड केल्यास कमीत कमी 5 ते 6
महिण्यात तुतीचे चांगले झाड तयार होते. म्हणजेच तुतीची बाग रेशीम
अळी संगोपनास येते.
रेशीम उद्योगातील महत्वाचा दुसरा
भाग म्हणजे रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती करणे.रेशीम अळीचे जीवनचक्र
हे अंडी, अळी , कोष व पतंग अशा अवस्था
मधून (टप्प्यात ) एकूण 48 ते 52 दिवसात
पूर्ण होते. अळी अवस्थेमध्येच फक्त तुतीचा पाला अळ्यांना खाऊ घातला जातो. रेशीम
अळीचे संगोपन करण्यासाठी रेशीम किटक संगोपनगृह बांधणे आवश्यक आहे.रेशीम उद्योगातील
तिसर्या भागात रेशीम अळीने कोष तयार केल्यानंतर कोष काढून घेऊन त्याची विक्री
करता येते.
रेशीम उद्योगासाठी शासनाच्याही
काही सवलती आहेत.त्याचा लाभ घेता येईल. शेतकर्याला सी.डी.पी. अंतर्गत किटक
संगोपनगृह उभारणीस 1 लाख रुपये, 1
लाख 50 हजार रुपये व 2 लाख रुपये तसेच
एकूण प्रत्यक्ष खर्च विचारात घेऊन 50 हजार रुपये, 75 हजार रुपये आणि 1 लाख रुपये अनुदान दिले जाते.
शेतकर्यांना राष्ट्रीय कृर्षी विकास योजने अंतर्गत प्रती एकरी 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. बागेतील ठिबक संच उभारणी एकरी खर्च 20 हजार रुपये गृहित धरुन 15 हजार रुपये अनुदान दिले
जाते.शासन 50 हजार रुपये किमतीच्या किटक संगोपन साहित्यासाठी
शेतकर्यास 37 हजार 500 रुपये अनुदान
दिले जाते. शेतकर्यांस शासना मार्फत 75 % अनुदान देवून
त्यांच्या मागणीनुसार अंडीपुजाचा पुरवठा केला जातो. रेशीम धागा निर्मिती युनिट
उभारणी (शेड बांधणी व मशीनरी खरेदी) एकूण खर्च दहा लाख रुपये विचारात घेऊन यासाठी
शासनाकडून 90 % अनुदान दिले जाते
No comments:
Post a Comment