सकाळचे वर्तमानपत्र उघडले की
आपल्या एक तरी आत्महत्या केलेली बातमी वाचायला मिळते.टीव्हीच्या बातम्यांच्या
वाहिन्यांवर तर बातम्यांचा रतीबच घातला जात असल्याने तिथेही आपल्याला अशा बातम्या
ऐकायला आणि पाहायला मिळतात.त्यामुळे आता सगळ्यांनाच या बातम्या कॉमन झाल्या आहेत.
अगदी सहजतेने अशा बातम्या आपण पुस्तकाचे पान उलगडावे,तसे बाजूला करून मोकळा होतो. कुठे शेतकरी कर्जाला-बिर्जाला
कंटाळून आत्महत्या करतो तर कुठली महिला सासरच्या जाचाला कंटाळून किंवा तरुणाच्या
त्रासाला कंटाळून एकादी मुलगी आपला जीव देऊन मोकळी होते.वरिष्ठांच्या त्रासाला
कंटाळून पोलिसांसह अन्य खात्यातले कर्मचारी आत्महत्या करतात. अपेक्षित यश न
मिळालेला विद्यार्थी,उद्योजक जीव देतो. अलिकडे अभ्यासाचे
टेन्शनही मुले घेताना दिसतात.एवढेच नव्हे तर मुलांच्या अपेक्षा पूर्ण करता
आल्या नाहीत म्हणूनही पाल्य आत्महत्या करतात.
मात्र अशा आत्महत्यांमध्ये
पाहिल्या तर ’सुशिक्षित आणि सुसंस्कृत’ वर्गाचा भरणा अधिक प्रमाणात असल्याचे
पाहायला मिळते.त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की, या सुंदर जगाचा ही माणसे पुरता उपभोग न घेता असा लवकर निरोप का घेतात?
हे असले रहस्य कोणालाच उलगडणार नाही.कारण जो जीव देतो,याला तर कुठे ठाऊक असतं,तो काय करतो आहे. ’जगी सर्व
सुखी असा कोण आहे’ हे सर्मथांचे वचन त्यांना समजले तरी नसेल किंवा ’माझ्या मना बन
दगड’ हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या विंदांचा सल्ला त्यांच्या ध्यानात येत नसेल पण
प्रत्येक प्रश्नांना उत्तर सूची परमेश्वराने सोबतच जोडलेली असते.
आत्महत्या करायला पुढे सरसावणारा माणूस त्या प्रश्नाच्या शोधासाठी मनाची तयारी न
करता आत्महत्या करतात. माझा एक मित्र असाच गेला. त्याने घरातल्या प्रत्येक
माणसांसाठी अनेक प्रश्न निर्माण करून गेला. मागे खूप काही ठेवलेय, असे तो जिवंत असताना म्हणत होता.मात्र तो गेल्यावर त्याच्या अंगावर
पंधरा-सोळा लाखाचे कर्ज कुटुंबाच्या खांद्यावर ठेवून गेला.पोरं अजून शाळा शिकतात.
बायकोला व्यवहारज्ञान माहित नाही. तिला जागोजागी ठेच लागतेय.
अशी अर्ध्यावर जग सोडून जाणारी
माणसे आपल्या मागे राहिलेल्या माणसांना, पिढयांना आणि
अनुयायांना विनाकारण बरेच प्रश्न निर्माण करून ठेवतात! माणसांचे मन अथांग आहे.
याचा कसलाच थांगपत्ता लागत नाही. अथांग समुद्रासारखे ए ते! मुलांपासून थोरांपर्यंत
आणि रसिकांपासून प्रज्ञावंतांपर्यंत ’अक्षरवाड्मय’ निर्मिती करून ’जग हे सारे
सुंदर आहे आपण सुंदर होऊ या’ हा जादुई मंत्र देणार्या पूज्य सानेगुरुजींनीच
झोपेच्या गोळ्या घेऊनच आपली जीवनयात्रा का संपविली असेल? हा
प्रश्न तर अनुत्तरितच आहे.
’जगावं की मरावं’ असा विचार
प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येत असतो, पण त्याला
सामोरे जाण्याचा बहुश्रुतपणा आपणास चांगल्या मित्रांकडून, वडीलधार्यांकडून
आणि चांगल्या पुस्तकातून मिळत असतो. त्याची अनेक उदाहरणे आहेत. एवढेच काय, मराठीतही असे अनेक ग्रंथ आपणास जगण्याची नवी उमेद देतील. मराठी उद्योजक,
पर्यावरणाचा तोल राखणारे सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून ’ऑर्किड’साठी
जगात नावाजलेले उद्योगपती डॉ. विठ्ठल व्यंकटेश कामत यांचे ’इडली ऑर्किड आणि मी’ या
पुस्तकातील त्यांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. त्यांनाही एकदा
जगावं की मरावं? असा प्रश्न पडतो. ते आपली अखेरची इच्छा
मित्राकडे व्यक्त करतात. त्यांचा मित्र त्यांना डोके शांत ठेवण्याचा सल्ला देतो
आणि शहाळ्याचे पाणी देऊन विचार करायला सांगतो. त्या प्रसंगाचे डॉ. विठ्ठल कामत
यांनी सुंदर वर्णन केले आहे. हा परिच्छेद इथे यायला हरकत नाही.
’शहाळ्याच्या पाण्याचे घुटके घेत मी
खिडकीशी उभा राहिलो. एका बाजूला मरीन ड्राईव्ह. पलीकडच्या समुद्रात सूर्य बुडी
मारण्याच्या तयारीत होता. मी दुसरीकडे नजर फिरविली आणि मला ’तो’ दिसला. माझ्या
आयुष्याला कलाटणी देणारा एक सामान्य कामगार होता तो! एका गगनचुंबी इमारतीबाहेर
तेविसाव्या मजल्याच्या भिंतीला तो बाहेरून रंग काढत होता. इमारतीबाहेर बांधलेल्या
बांबूच्या परातीवर तो बेफिकीरपणे उभा होता. आपलं काम करण्यात तो विलक्षण मग्न
होता. परात खाली-वर होत होती आणि तो त्याच्या हातातील कुंचल्याने भिंतींना नवा
जन्म देत होता. त्या रंगार्याच्या चेहर्यावर नवनिर्मितीचा आनंद होता. परात हलली,
खाली पडली तर काय? या भीतीने माझ्या हृदयाचा
ठोका चुकत होता. धोका पत्करून, जीवनावर उदार होऊन, नवनिर्मितीचे कार्य टेन्शनविरहित करण्याचे केवळ रिस्क! केवढे ते समाधान!
त्या सामान्य माणसाने माझा प्रॉब्लेम सोडविला. डॉ. विठ्ठल कामत म्हणतात, ’त्यांची ती रिस्क सहजपणे घेण्याच्या वृत्तीने अचानक मला स्वत:ची लाज
वाटली. विलक्षण लाज! जीव देण्याने माझे प्रॉब्लेम सुटले असते? की माझ्या कुटुंबांसाठी मी गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण केले असते?’
पुस्तके आपले मित्र आहेत.
त्यांच्यामुळे आपल्याला जगण्याची ऊर्मी येते. आपल्या आयुष्यात यशस्वी झालेल्या
लोकांची आत्मचरित्रे नक्की वाचावीत,त्यामुळे
आत्महत्याचा विचार मनात अजिबात डोकावणार नाहीत. अशी पुस्तके आपल्याला अनेक गोष्टी
शिकवून जातात. त्यामुळे दर्जेदार ग्रंथाच्या सहवासात राहिले पाहिजे. जीवनात
माणसाने चांगला मार्ग स्वीकारला पाहिजे. चांगल्या मित्रांची संगत ठेवली पाहिजे.
त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. आणि महत्वाचे म्हणजे ज्यांनी चार
उन्हाळे-पावसाळे जास्त खाल्ले आहेत, अशांचा सल्ला घेतला
पाहिजे.
No comments:
Post a Comment