शेततळय़ात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार घडत आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी शेततळय़ाला कुंपण सक्ती करण्याची गरज आहे. शिवाय प्रशासन, शेतकरी, शाळा आणि पालक यांनीही जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मागे सांगली जिल्हय़ात शेततळय़ात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. अशा घटना पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्हय़ांत घडल्या आहेत. यात लहान मुलांसह पोहता न येणाऱया मोठय़ा माणसांचाही मृत्यू झाला आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासन अथवा राज्य शासनाने शेततळय़ांना कुंपणाच्या सक्तीसोबतच संरक्षणात्मक सूचना करणे अत्यावश्यक बनले आहे. यासाठी कुंपणाची लोखंडी किंवा प्लॅस्टिकच्या जाळी लावणे गरजेचे आहे. शासनाच्या काही योजनांमध्ये शेततळय़ांच्या कुंपणासाठी अर्थसहाय्य मिळते. मात्र शेतकरी कुंपणाचा विचार करत नाही. कमी पैशांत शेततळी उभारण्याच्या मानसिकतेमुळे अशा काही दुर्दैवी घटना घडताना दिसत आहेत. खरे तर सुरक्षित शेततळी आहेत की नाहीत याची खात्री करण्यासाठीची यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. शासकीय अनुदानात शेततळी उभारल्यास अधिकाऱयांकडून ती सुरक्षित आहेत की नाही हे पाहता येते. मात्र काही शेतकऱयांनी स्वतः शेततळी खोदली आहेत. यासाठी शेतकरी, पालक, मुले यांना शाळा, ग्रामपंचायत यांच्यामार्फत जागृती करण्याची आवश्यकता आहे.
दुष्काळी भागात पाणीटंचाईवर रामबाण उपाय म्हणून शेततळय़ांकडे
पाहिले जात आहे. सुमारे चौदा वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे शेततळय़ाचे
महत्त्व शेतकऱयांसह राज्य शासनाच्याही लक्षात आले. त्यासाठी सरकारी अनुदानही
देण्यात येऊ लागले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात शेततळी खोदली गेली, खोदली जात आहेत. शेतीला वरदान ठरलेली हीच शेततळी मुलांसाठी धोक्याची ठरत
आहेत. सध्या उन्हाळय़ाची सुट्टी पडल्याने मुलांना उन्हाच्या तडाख्यातून थंडावा
मिळवण्यासाठी पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र शेततळय़ांना कोणतेही संरक्षण नसल्यामुळे
किंवा बांधीव कडे नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने मुले तळय़ात पडून मरण
पावल्याच्या घटना घडत आहेत. शेततळय़ात पट्टीचा पोहणारा जरी असला तरी त्याला
सहजासहजी बाहेर पडता येत नाही. प्लॅस्टिक कागदाचे अस्तर वापरलेले असल्यामुळे एका
जागी पाय ठरत नाहीत. ही तळी अधिक धोकादायक आहेत. शिवाय तलावात गाळ असल्याने मुले
बऱयाचदा गाळात रुतून अडकतात. पोहायला शिकणाऱया नवशिक्यांना तर आपला जीव वाचवणं
अशक्य होऊन जातं. त्यामुळे शेताची आणि शेतकऱयांची उन्नती होण्यासाठी तळी आवश्यक
असताना दुसऱयाचा जीवही लाख मोलाचा आहे हे लक्षात घेऊन शेतकऱयांनी काळजी घेण्याची
आवश्यकता आहे. मुले शेततळय़ाकडे जाणार नाहीत याची काळजी पालकांनीही घ्यायला हवी.
शाळांनीही शेततळय़ांपासून मुलांनी दूर राहावे यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे.
शेततळय़ात पडलेल्या किवा उतरलेल्या मुलांना किंवा मोठय़ा व्यक्तींना आधार धरायला काही
नसते. तळय़ातून सहजासहजी वर येता येत नाही. प्लॅस्टिक कागद ओला झाल्यानंतर त्याला
पकडता येत नाही. यासाठी तळय़ाच्या पाण्यात टय़ूब टाकाव्यात किंवा चारी बाजूने दोर
गाठी मारून टाकल्यास किमान आधार म्हणून त्याचा वापर करता येईल. प्रशासनाने कुंपण
किंवा अशा गोष्टींसाठी शेतकऱयांवर सक्ती करायला हवी. शेततळय़ात अशा दुर्घटना
घडल्यास त्यास संबंधित शेतकरी जबाबदार धरला जातो, त्यामुळे
त्याने आपली जबाबदारी लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय योजायला हवेत.
No comments:
Post a Comment