मोबाईलचा प्रचंड उपयोग होत असला
तरी त्याचे धोकेही काही कमी नाहीत.इंटरनेट, मोबाईल
आणि इतर सोयी सुविधांमुळे जग अतिशय जवळ आले असले तरी माणसाचे प्राणही ते घेत आहेत.
सेल्फीमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले असताना त्यातून शिकून घ्यायला कोणी तयार
नाही. आता गेममुळे लोकांचा जीव चालला आहे. विशेषत: लहान मुलांच्या हातात हे साधन
आल्यानंतर ते अधिकच भयावह होत आहे. ब्ल्यू व्हेल चॅलेंज नावाचा ऑनलाईन गेम सध्या
जगभर गाजतोय तो त्याच्या मनोरंजन करणार्या बाजूने नव्हे, तर
बालकांचे जीव घेणारा म्हणून. अशाच एका घटनेत मागील आठवड्यात मुंबईत एका १४ वर्षीय
बालकाचा या गेमने जीव घेतला. नववीत शिकणार्या या मुलाने इमारतीच्या छतावरून उडी
घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल साईटवर मित्राला
याची माहिती दिली.
गेम म्हटले की, त्यात मजा, मस्ती आणि आनंद ठरलेला असतो.
परंतु या गेममध्ये मात्र जीव जातो हे हमखास ठरलेले आहे. व्हेल माशाचा आकार
येईपर्यंत अंगावर जखमा करून घ्यायच्या आणि हा मासा पूर्ण झाल्यानंतर आत्महत्या
करायची, असा हा भयंकर गेम आहे. विशेष म्हणजे जगभरात अनेक
मुले या गेमकडे आकर्षित झाली आहेत. रशियातील एका विकृत गुन्हेगाराने हा गेम तयार
केला आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी त्याच्या या गेमने अनेकांना मृत्यूच्या
पिंजर्यात लोटले आहे. तरीसुध्दा हा गेम इतक्या झपाट्याने जगभरात पसरत आहे की
त्याला कुठल्याही देशातील सरकारला आतापर्यंत तरी रोखण्यात यश मिळालेले नाही. रशिया
तसेच युनायटेड किंगडममध्ये जवळपास १00 जण या गेमचे बळी ठरले
आहेत. मुंबईत मुलाचा बळी गेल्यानंतर त्याची दखल राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही
घेतली गेली. या गेमवर बंदी आणण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी हा गेम बंद करणे तसे अवघड आहे.
मध्यंतरी गो पोकेमॉन नावाच्या खेळाने धुमाकूळ घातला होता. लहान-थोरांसह सर्वच जण
या खेळाच्या मागे वेड्यासारखे धावत होते. त्यातही बर्याच जणांचा मृत्यू ओढावला
होता. हा गेम जीवघेणा आहे हे वारंवार ठसवले गेल्याने त्याचे आकर्षण निदान भारतात
तरी कमी झाले. मात्र, जगभरात कुठे ना कुठे असे पोकेमॉनवेडे
कुठेतरी भरकटत जात जखमी होताना दिसतात. ब्ल्यू व्हेल चॅलेंज हा पोकेमॉनपेक्षा घातक
खेळ असल्याने त्याच्या विरोधात प्रचंड मोठय़ा प्रमाणात जागृतीची गरज आहे.
No comments:
Post a Comment