Monday, August 7, 2017

गणेशोत्सवात महिलांच्या सुरक्षेचा जागर व्हावा

     अलिकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे महिला,मुलींमध्ये एक प्रकारची भिती, धसका बसला आहे. त्यांना काम किंवा शाळा-कॉलेजपासून घरापर्यंत जाताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. चौका-चौकात टारगट मुले त्यांची छेडछाड काढायला टपलेलीच असतात. या महिला,मुलींना सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती, विविध उपक्रम, मुलींना प्रशिक्षण अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून असे उपक्रम राबवल्यास चांगला फायदा होणार आहे. गणपती ही विद्येची, कलेची देवता आहे.गणेशोत्सवाचा सोहळा साजरा होत असताना सर्व स्तरांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढावा, महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जावे,त्यासाठी जन जागृती करण्यात यावी. महिलांच्या सुरक्षेचा जागर घातला जायला हवा. त्याचबरोबर पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहांचा आग्रह धरला जावा, व्यसनमुक्ती, विधायक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जायला हवे.या उत्सवातून प्रबोधन व्हायला हवे. पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत,यासाठी प्रयत्न केले जावेत.या सगळ्यांची अंमलबजावणी झाल्यास गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण अधिकाधिक वृद्धिंगत व्हायला मदत होईल.

     अलिकडच्या काही वर्षात समाजात वावरत असताना महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.एकटे-दुकटे, रात्री-अपरात्री बाहेर पडणे महिलांसाठी धोक्याचे बनले आहे. महिलांवर अत्याचाराच्या अलिकडच्या घडलेल्या घटनांमुळे घराघरात एक प्रकारचे भितीचे वातावरण पसरले आहे. शाळा-कॉलेजला जाणार्या मुलींना एकटे सोडताना पालकांना काळजावर दगड ठेवायला लागत आहे. नाही तर कामधंदा सोडून मुलींना ने- आण करावे लागत आहे. मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांमध्येही महिलांना त्रास देण्याचे, छेडछाड करण्याचे अथवा त्यांना टोमणे मारण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी खास महिला पोलिसांचे निर्भया पथक नियुक्त करण्यात आले आहे,मात्र काही ठिकाणी अशी पथके फक्त नावालाच असल्याचे दिसून आले आहे.
     मुली बिनधास्त समाजात वावराव्यात अशा प्रकारचे धाडस त्यांच्यात निर्माण करण्याची गरज आहे.मंगलमय गणेशोत्सवात महिला सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.त्यांना अशा उपक्रमांमधून समन्वयाची ताकद मिळावी. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे रुजवताना इतरांच्या संस्कृतीचा आदर करायला शिकले पाहिजे.गणेशोत्सवातून सामाजिक प्रबोधन घडायला हवे. महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्याचा प्रश्न मार्गी लागायला हवा. महिलांचा समाजातून सन्मान व्हायला हवा.समाजात स्त्रीला सुरक्षित स्थान मिळावे, यासाठी मुलांवर लहानपणापासून चांगले संस्कार होणे गरजेचे आहे.त्यासाठी आईने मुलींप्रमाणेच मुलांवर चांगले संस्कार करायला हवेत. अशा उत्सवांमधून अशा प्रकारचे संस्कारशील वातावरण निर्माण करण्यास मदत होते.
     गणेश मंडळे उत्सव काळात लाखो रुपयांचा चुराडा करतात. हाच पैसा सामाजिक कामांसाठी वापरल्यास विधायक उपक्रमातून अनेकांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. त्यांच्या कलेत सुधारणा होणार आहे. यातून काहींना पैसेही मिळवता येणार असून रोजगार उपलब्ध होणार आहे. खरे तर आपल्याकडे गणेशोत्सव म्हणजे दारू पिऊन धागडधिंगा घालणे, हा एकच एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. या माध्यमातून उत्सवाच्या मंगलमय स्वरुपाला गालबोट लागते. त्यामुळे या उत्सवामधून चुकीच्या गोष्टी हद्दपार व्हायला हव्यात. समाजापर्यंत चांगला संदेश पोहोचेल अणि शहरात येणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.
     समाज हा स्त्री आणि पुरुष अशा दोघांचा आहे. उत्सव हे व्रत आहे, तो भक्तीभावाने साजरा करायला हवा. उत्सवातून सामाजिक प्रबोधनाला चालना मिळू शकते. स्त्रीकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली पाहिजे. स्त्रियांमधील धडाडी आणि हिंमत वाढावी, यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रशिक्षण, विविध उपक्रम हाती घ्यावी लागतील. प्रत्येक उत्सवात पुरुषांना पूजेसाठी पुढे केले जाते. जी महिला वंश वाढवते, घराची काळजी घेते तिला समाजात दुय्यम स्थान दिले जाते. अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. गणेशोत्सवात संगीताला महत्त्वाचे स्थान आहे. गणपती मंडळांसमोर वाजणारे डिजे, चिकनी चमेली, शांताबाईसारखी गाणी वाजवणे तसे आश्चर्याचेच म्हटले पाहिजे. पवित्र वातावरणाला दुषित करण्याचे काम अशी वाह्यात गाणी करतात. उत्सवात मंगलमयी गाणी कानावर पडल्यास पवित्र वातावरण होऊ शकते. समाजाला एक प्रकारची योग्य दिशा देण्याचे काम अशा उत्सवांमधून होते. त्यामुळे उत्सवांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे.



No comments:

Post a Comment