आपल्या देशाने स्वातंत्र्याची सत्तरी पार केली आहे. त्याचबरोबर देशाने अवकाश,संगणक,धान्य उत्पादनासह अनेक क्षेत्रात विलक्षण अशी उतुंग कामगिरी केली आहे.
आपल्या देशाची महासत्तेकडे वाटचाल होत असल्याचेही बोलले जात आहे.
यासाठी आपल्या देशाकडे अनेक योजना आहेत,त्या दृष्टीने
दमदार वाटचालही सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दशकात भारत नक्कीच
महासत्ता बनेल,यात काही शंका नाही. मात्र
या मार्गातले काही अडथळे आहेत, ते दूर केले पाहिजेत. त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. आज संपूर्ण जगात
आपल्या भारत देशाची ओळख
ही तरुणांचा देश म्हणून आहे. सगळेच देश आपल्या देशाकडे कुतुहलाने
पाहात आहेत. चीनसारख्या देशात वृद्धांची संख्या आज अधिक आहे.
आणखी काही वर्षे या देशाला तरुणांचा देश बनायला वाट पाहावी लागणार आहे.
जगात तरुणांची संख्या अधिक असणारा आपला भारत देश हा एकमेव देश आहे.आणि हेच आपल्या देशाचे सार्मथ्य आहे.
जगात
मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. तेव्हा आपल्या देशातल्या
मनुष्यबळाकडे सार्यांच नजरा लागणार आहेत. मात्र आपल्याकडे कुशल मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे आपण
जगात वर्चस्वात कमी पडत आहोत. आयटी क्षेत्रात आपला तरुण अधिकारवाणीने
मार्गक्रमण करीत आहे, तसा अन्य क्षेत्रातही तो दिसायला हवा आहे.
त्यामुळे कुशल प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. शासनाने
आपल्या वाढत्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घ्यायचे असेल तर त्यांना प्रशिक्षित
केले पाहिजेत. आज अजूनही काही क्षेत्रात आपण मनुष्यबळाची आयात
करतो आहे.कारण त्यांच्याशिवाय काही कामे होतच नाहीत. तीच निर्मिती आपल्या देशात झाली तर अनेकांना रोजगार मिळणार आहे. रोजगार
नसल्याने आपला तरुण निराशेच्या गर्तेत सापडला आहे. त्याला योग्य
दिशा देण्याची आवश्यकता आहे. आज पदव्यांची भेंडोळी घेऊन बेरोजगार
नोकरीसाठी दारोदारी भटकत आहेत, मात्र कुशलता नसल्याने त्यांना
कोणी थारा देताना दिसत नाही. तरुणांना संशोधन क्षेत्राची आवड
निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.कारण आजचा आपला तरुण
देश कधीतरी न्हातारा होणार आहे. त्यामुळे आपल्याला घाई करावी
लागणार आहे.
देशातील आजच्या तरुणाईला वृद्धापकाळदेखील
पहावा लागणारच आहे. जीवन-मरण जसे ठरले आहे,तसे तरुणपणानंतर म्हातारपण अटळ आहे. त्यामुळे म्हातारपणीची
तरतूद करून त्यांचे जीवन सुखमय कसे होईल,याकडेही पाहणे अगत्याचे
ठरते. सध्या आपल्या तरुण देशाला बेरोजगारी सारख्या अनेक समस्यांनी
ग्रासले आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी सतत धावपळ करणार्या या आपल्या तरुणाईला, त्यांच्या वाट्याला येणारा उद्याचा
वृद्धावस्थेचा काळ तरी त्यांना सुखात जावा, असे वाटत असेलच;
पण वस्तुस्थिती ही आहे की आजच आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिकांना जीवन
जगणे कठीण झाले आहे. जगभरामध्ये भारतात निवृत्तांना जीवन जगणे
अतिशय कठीण असल्याची बाब आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका अहवालातून नुकतीच समोर आली आहे.
विशेष म्हणजे वृद्धांच्या विषयाकडे आतापर्यंतच्या सरकारांनी लक्ष दिलेले
नाही. सध्याचे वृद्ध लोक अनेक अडचणींशी सामना करताना दिसत आहेत.
नुकताच न्यायालयाने वृद्ध माता-पित्यांना त्यांच्या मुलाकडून पोटगी देण्याचा
आदेश दिला आहे. आज वृद्ध लोकांना मुलं-सुना
सांभाळत करत नाहीत, असे विदारक वास्तव समोर येत आहे. त्यामुळे त्यांची काळजी आता शासनालाच घ्यावी लागणार आहे.
भारतातील
नोकरीतून निवृत्त झालेल्या व्यक्तींचे आयुष्य इतर देशांच्या तुलनेत सर्वात बिकट असल्याचे
या संशोधनात आढळून आले आहे. नॅटिक्सिस ग्लोबल अँसेट मॅनेजमेंटच्या चौथ्या
जागतिक नवृत्ती निर्देशांकात (जीआरआय) भारताला
शेवटचा क्रमांक देण्यात आला आहे. जगातील एकूण 43 देशांतील निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 34 देश हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्गीकृत
केलेले प्रगत देश, आर्थिक सहयोग व विकास संघटनेचे (ओईसीडी) सदस्य असलेले पाच देश तर ब्रिक्स संघटनेतील चार
देशांचा समावेश होता. निर्देशांकात देशाचे स्थान ठरविण्यासाठी
त्या देशातील पाच वर्षांचा मुलभूत व्याजदर आणि महागाईच्या सरासरीचा अभ्यास करण्यात
आला. भारतात आरोग्याची परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची आरोग्य क्षेत्रातील प्रगतीही समाधानकारक नाही.
शहरांमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्या तरी ग्रामीण भागात मूलभूत
सुविधाही मिळत नसल्याचे चित्र आहे.
भारत एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या
केवळ 1.3 टक्के आरोग्यावर खर्च करत आहे. अन्य ब्रिक्स देशांमध्ये याचे प्रमाण 3.5 ते चार टक्क्यांपर्यंत
असल्याने भारताची कामगिरी खराब असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे 2014 मध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची
संख्या 10 कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी 50 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली होते.
2050 सालापर्यंत एकूण लोकसंख्येच्या 20 टक्के लोक
ज्येष्ठ नागरिक असतील, असे ’हेल्प एज’च्या एका अहवालातून समोर आले होते. त्यामुळे ज्येष्ठ
नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे.
तसेच नवीन योजना आणून ज्येष्ठांना मानसिकरित्या तरुण ठेवण्यासाठी प्रयत्न
करणे आवश्यक आहे. नाहीतर चीनप्रमाणे जर आपली अवस्था झाली तर कठीण
होईल. आजच्या वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहेच,पण आज जी तरुण पिढी आहे, उद्या तीही म्हातारी होणार आहे.
त्यामुळे त्यांना पुढील आयुष्यात स्थिरता मिळण्याच्यादृष्टीने आजच प्रयत्न
व्हायला हवेत. त्यांचे आरोग्य, संतुलित
आहार, जीवनमान प्रगती याचा विचार करून आजच त्यासाठी सर्व त्यादृष्टीने
तरतूद करून ठेवण्याची आवश्यकता आहे. शिवाय आजच्या तरुणांना कुशल
करताना त्यांचा आयुष्याच्या शेवटापर्यंत कसा आपल्या देशाच्या प्रगतीला उपयोग होईल,याचा विचार करताना त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment