Monday, September 3, 2012

तत्त्वचिंतक शिक्षकः डॉ. राधाकृष्णन

     डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ या दिवशी तिरुपतीजवळ असणार्‍या तिरुत्तानी या आंध्र प्रदेशातील एका खेडेगावात झाला. त्यांचे शिक्षण तिरुत्तानीची प्राथमिक शाळा, ल्यूथरन मिशन स्कूल, वेलोरचे व्हूरिस कॉलेज आणि मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेज येथे झाले. त्यांची घरची आर्थिकपरिस्थिती बेताचीच होती, पण ती त्यांच्या शिक्षणाआड आली नाही.
     विसाव्या शतक्या प्रारंभी ज्यावेळेला वैज्ञानिक प्रगती परमोच्च स्थानावर होतीत्यावेळेला जगाला आपल्या तत्त्वज्ञानाने मुग्ध करून टाकणार्‍या अध्यात्मिक नेत्यांमध्ये डॉ. राधाकृष्णन यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते म्हणत,' पक्ष्यांप्रमाणे हवेत उड्डाण आणि माशांप्रमाणे पाण्यात पोहायला शिकल्यानंतर आता आम्हाला मनुष्याप्रमाणे जमिनीवर चालायला शिकता आलं पाहिजे.' मानवतेच्या आवश्यकतेवर भर देताना ते म्हणतात,' मानवाचा दानव बनणं, हा त्याचा पराभव आहे, मानवाचा महामानव होणं हा त्याचा चमत्कार आहे आणि मानवाचा मानव होणं हा त्याचा विजय आहे.' ते आपल्या संस्कृती आणि कलेविषयी आत्मियता बाळगणारे महान अध्यात्मिक राजकीय नेते होते. ते सर्व धर्मावलंबियांविषयी अत्यंत आदर भाव राखून होते.
     त्यांनी कित्येक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना, शिष्टमंडळांचे नेतृत्व केले. १९०९ मध्ये ते चेन्नईमध्ये एका कॉलेजात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. यानंतर काही काळापर्यंत ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. १९४८-४९ मध्ये युनेस्कोच्या एग्जीक्यूटीव बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर १९५२-६२ या कालावधीत ते भारताचे उपराष्ट्रपतीही होते.  देशाला एका तत्त्वज्ञ मार्गदर्शकाची गरज लक्षात घेऊन स्वातंत्र्याच्या प्रारंभ काळात काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी संविधान सभेचे सदस्य होण्यास पाचारण करण्यास त्यांच्याकडे गेले. त्यांना राजकारणात रस नव्हता. पण पंडीत नेहरू यांच्या आग्रहाखातर त्यांच्या सानिध्यात आले. सरळ अंगकाठी, पाणीदार डोळे, कोट्-धोतर- फेटा असा पेहराव, रुबाबदार व्यक्तिमत्व, प्रभावी वक्तृत्व, असामान्य भाषा प्रभुत्व अशा थाटात ते पहिल्यांदा रशियाला गेले. त्यांना रशियातील भारतीय वकील म्हणून पाठविण्यात आले. आचारविचार आणि रीतीभाती या बाबतीत आपले भारतीयत्व सांभाळून रशियन समाजात वावर‍णारा हा विलक्षण माणूस पाहून अनेक पत्रकारांनी त्यांच्याविषयी चित्रविचित्र आणि प्रसंगी सचित्र बातम्या दिल्या. परखड आणि सत्य बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या विद्वत्तेवर स्टेलिनसुद्धा भाळला होता. दहा वर्षाच्या उपराष्ट्रपती पदानंतर ते १९६२ मध्ये भारताचे राष्ट्रपती या सर्वोच्च पदाचे मानकरी ठरले.ते १९६७ पर्यंत या पदावर होते.   
     डॉ. राधाकृष्णन यांनी तत्त्वज्ञान आणि संस्कृतीवर अनेक ग्रंथांची रचना केली. यात 'द फिलॉसफी ऑफ द उपनिषद्स', 'भगवद्गीता', 'ईस्ट एंड वेस्टः सम रिफ्लेक्शन्स', 'इंडियन फिलॉसफी', 'एन आयडियलिस्ट व्यू ऑफ लाइफ', हिंद व्यू ऑफ लाइफ' आदी प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. 'भारतीय संस्कृती', 'सत्य की खोज', आणि 'संस्कृती तथा समाज' ही हिंदी अनुवादीत त्यांची लोकप्रिय व महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत.
     त्यांच्यातील तत्त्वचिंतकाची, कर्तृत्वाची दखल जगभरातल्या अनेक संघटना, विद्यापीठांनी आणि संस्थांनी घेतली. त्यांचा शंभरहून अधिक जगभरातल्या विद्यापीठांनी डॉक्टरेटची उपाधी देऊन उचित गौरव केला आहे. यात हॉर्वर्ड विद्यापीठ आणि ओवर्लिन कॉलेजचाही समावेश आहे. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांचा 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन सन्मान केला. त्यांना विविध देशांमध्ये भारतीय व पाश्चात्य देशांच्या तत्त्वज्ञानावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जात असे. सर्वपल्लींचा लौकिक देशात आणि विदेशात पसरला होता. ऑक्सफर्ड विद्यापीठाने 'हिंदूंचा जीवनविशयक दृष्टीकोन' या विषयावर त्यांची व्याख्याने आयोजित केली. पुढे ती ग्रंथरुपाने प्रशिद्ध झाली. आपल्या विचारांनी, कल्पनांनी आणि ओजस्वी मधुर वाणीने लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात दिव्याशक्ती होती. त्यांच्या राष्ट्रपती कालखंडात १९६२ मध्ये भारत -चीन आणि १९६५ मध्ये भारत- पाक युद्धे झाली. या दरम्यान त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने, विचारांनी त्यांनी भारतीय सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्याची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
     त्यांचे प्रसिद्ध विचार होते,' तत्त्वज्ञान एक सकारात्मक विद्या आहे. प्रत्येक व्यक्ती ईश्वराची प्रतिमा आहे. आंतरात्म्याचे ज्ञान कधीही नष्ट होत नाही. तत्वज्ञानचा उद्देश जीवनाची व्याख्या करण्याचा नाही तर जीवन बदलण्याचा आहे. तत्त्वज्ञानाचे अल्पज्ञान मनुष्याला नास्तिकतेकडे झुकवते तर खोल  तत्त्वज्ञानात प्रवेश केल्यावर मनुश्याचे मन धर्माच्या दिशेने उन्मुख हो ऊन जाते.'
     डॉ. राधाकृष्णन यांचा मृत्यू १६ एप्रिल १९७५ रोजी झाला. परंतु, आपल्या जीवनकाळात त्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रकाश सार्‍याला विश्वाला दिला. तो आजसुद्धा जगासाठी अलौकिक ठरत आहे. ते एक महान शिक्षणतज्ज्ञ होते. आणि त्यांना आपल्या शिक्षक होण्याचा फार अभिमान होता. म्हणून तर त्यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिवस' च्या रुपाने साजरा केला जातो.

2 comments: