एकदा एक मुलगा सुट्टी घालवण्यासाठी आपल्या आजोबांकडे गावी गेला. तिथे त्याने एकदा आपल्या आजोबांना विचारले की, यशाचे रहस्य काय? यावर आजोबा त्याला शेजारच्या एका नर्सरीत घेऊन गेले. तिथून त्यांनी दोन रोपटी खरेदी करून आणली. एक रोपटे त्यांनी घरातल्या कुंडीत लावले. दुसरे घराबाहेर अंगणात लावले. आजोबांनी आपल्या नातवाला विचारले,तुला काय वाटतं, या रोपट्यांपैकी कोणते रोपटे अधिक यशस्वी होईल? मुलाने उत्तर दिले- घरातले रोपटे अधिक यशस्वी होईल,कारण ते सर्वदृष्टीने सुरक्षित आहे. बाहेरच्या रोपट्याला मात्र अनेक गोष्टींपासून धोका आहे.त्याला अनेक गोष्टींशी सामना करावा लागणार आहे.
आजोबा त्याच्या या उत्तरावर हसले. काही दिवसांनी तो मुलगा परत आपल्या शहराकडे निघून गेला. काही वर्षांनी तो पुन्हा आपल्या आजोबांना भेटायला गावाकडे आला. आल्यावर त्याने रोपट्यांविषयी विचारले. आजोबांनी त्याला घरातले रोपटे दाखवले. ते रोपटे घरातल्या कुंडीत बरेच मोठे झाले होते. मुलगा म्हणाला की, मी सांगितलं होत ना की, घरातले रोपटे अधिक यशस्वी होईल. पुढे तो म्हणाला,बाहेरच्या रोपट्याचं काय झालं? आजोबा त्याला घेऊन बाहेर आले, तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला. बाहेरच्या रोपट्याने एका विशाल वृक्षाचे रूप घेतले होते. त्याने विचारले की, असं कसं शक्य आहे? आजोबांनी त्याला सांगितले की,संकटांशी सामना केल्यानेच यश मिळते.
तात्पर्य: संकटांना घाबरू नका. उलट त्यांच्याशी दोन हात करा, तेव्हाच यश मिळेल.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012
No comments:
Post a Comment