भारतात सिनेमा 1931 मध्ये बोलायला लागला. रामलीला,
नाटक, नौटंकीमध्ये काम करणार्या कलाकारांनासुद्धा वाटू लागलं की आपणही एक दिवस सिनेमात काम करू.
उत्तर प्रदेशमधील जायस (जिथे पद्मावतचे रचनाकार
मलिक मोहम्मद जायसी यांचा जन्म झाला होता.) मध्ये रामप्रसाद मिश्रा
नावाचा असाच एक कलाकार होता. जमीनदार कुटुंबातील रामप्रसाद यांचा
विवाह एका बारा वर्षाच्या लीला नावाच्या मुलीशी झाला होता. नवर्याने आपल्या बायकोलाही आपल्या रंगात रंगवून टाकलं होतं. ते तिला सिनेमाचे रीळ दाखवून आपल्याला यात काम करायचे आहे, असे सांगायचे. लीलाला कळायचं नाही की, या छोट्याशा रीळमध्ये तिचे शरीर कसे सामावेल?
1934 मध्ये सिनेमा पाहणं, त्यात काम करणं याला समाजातला एक वर्ग चांगल्या नजरेने पाहायचा नाही.
रामप्रसाद आपल्या पत्नीला घेऊन नाशिकला गेले. सिनेमात
काम करायला महिला मिळत नव्हत्या. त्यामुळे रामप्रसाद यांना
150 आणि लीलाला 500 रुपये पगार महिन्याला फिक्स
झाला. पण कॅमेरासमोर अॅक्टिंग करणं म्हणजे
खायची गोष्ट नव्हती. ज्यावेळेला कॅमेर्यासमोर उभं राहण्याची वेळ आली तेव्हा, पती-पत्नीचे हात कापू लागले. अॅक्टिंग
करायला आलं नाही, त्यामुळे कंपनीतून काढून टाकण्यात आलं.
500 रुपये महिना पगार मिळवण्याचं लीलाचं स्वप्न भंगलं.
सिनेमात काम करण्यासाठी आपलं गाव सोडून
आलेल्या पती-पत्नीच्या पदरी निराश आली.
मग धीर एकवटून ते नशीब आजमवायला कोल्हापूरला पोहचले. काम मिळालं,पण तिथे दुसराच प्रश्न पुढे आला. जेव्हा हिरोच्या कमरेत हात घालून मी तुझ्याशिवाय
जिवंत राहू शकत नाही असा डॉयलॉग बोलण्याची संधी आली, तेव्हा आपल्या
नवर्यावर अतूट प्रेम करणारी लीला म्हणाली,मी विवाहित आहे आणि नवर्याशिवाय मी दुसर्या कुठल्या परपुरुषाला स्पर्शही करणार नाही. तेव्हा तो
सिनेमाही हातचा गेला. लवकरच संधी मिळाली दादासाहेब फाळके यांच्या
दिग्दर्शनामध्ये बनत असलेल्या गंगावतरणमध्ये. या चित्रपटात पार्वती
बनण्याची संधी मिळाली. चित्रपट चालला आणि मग राम आणि लीला यांना
धीर आला.
पण हिरो-हिरॉइन आणि रोमांटिक सीनशिवाय काम चालणार नव्हतं.
होनहार (1936), मध्ये शाहू मोडक ( ज्यांनी 30 चित्रपटांमध्ये श्री कृष्णाची भूमिका केली
आहे.) यांची हिरॉइन बनली लीला. दिग्दर्शक
होते जागीरदार. त्यांच्यासमोरदेखील ती रोमांटिक काम करणार नाही
म्हटल्यावर जागीरदार भडकले. पण अडचण अशी होती की, कंपनीने करार केल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकता येत नव्हतं. शेवटी तोडगा असा निघाला की, लीलाला मोडक यांची आई बनवण्यात
आलं. 18 वर्षांचे मोडक मुलगा आणि 28 वर्षांची
लीला आई बनली. यानंतर मात्र त्यांची गाडी पटरीला लागली.
जवळपास सहा दशकं लीलाने विविध चित्रपटांमध्ये आई आणि मावशीची भूमिका
साकारली. 1975 मध्ये शोलेमधल्या टांगेवाली बसंतीची आई त्यांनी
साकारली. या चित्रपटात मौसी हे संबोधन त्यांना मिळाले ते कायमचेच
चिटकले. ते आजही कायम राहिले. चित्रपट आणि
या सिनेसृष्टीबाबत काहीच माहित नसतानाही लीला मिश्रा यांनी सत्यजीत राय, राजकपूर, गुरुदत्त, गुलजार,
रमेश सिप्पीसारख्या प्रसिद्ध फिल्मकारांसोबत काम केलं. त्यांच्याकडून त्यांना खूप काही शिकायला मिळालं. त्यांना
पुढे आणायला त्यांचे पती रामप्रसाद यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र
रामप्रसाद यांना फारसं कुणी ओळखत नाही.पण रामप्रसाद यांच्याशिवाय
लीला जगासाठी लीला मावशी बनू शकली असती का? लीला मिश्रा यांचा
जन्म 1 जानेवारी 1908 चा तर मृत्यू
17 जानेवारी 1988 मध्ये झाला. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत
No comments:
Post a Comment