Friday, January 24, 2020

शेट्टीच्या वाट्याला संवाद नव्हतेच


कर्नाटकातील एका शेतकर्याला वाटलं की, आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला- मुड्डूला शिक्षणात अजिबात रस नाही. मग त्याने त्याचे कान पकडून एका सोबत मुंबईला जाणार्या बसमध्ये बसवले. आणि त्याला तिथे जाऊन कामधंदा बघ, असं सांगितलं. मुड्डूने तसं केलंही. मुंबईतल्या लेमिंग्टन रोडवरील एका पंजाबी ढाब्यावर 12 रुपये महिना पगारावर काम करू लागला. नंतर टाटा ऑइल मिलच्या कँटीनमध्ये काम मिळालं. तिथे सायंकाळी बॉक्सिंग खेळले जाई. तो बॉक्सिंग शिकू लागला. तिथे तो चॅम्पिअन बनला. त्याचा पगार महिन्याला 75 रुपये झाला. तो मुंबईचा आठ वर्षे चॅम्पिअन राहिला. एक दिवस चित्रपटांचा हिरो बाबूराव पैलवान यांनी त्याला पाहिलं. एका चित्रपटात त्याला हाणामारीच्या स्टंटसाठी उभं केलं. संध्याकाळी 200 रुपये मिळाल्यावर मुड्डूने ठरवलं की, आता बस! हेच काम करायचं.

काम जोखमीचं होतं. पण यात जगण्याच्या इच्छेपेक्षा मरण्यावर प्रेम करणारा हवा होता. पापणी लवण्याआत मृत्यू कवटाळू शकतो, असे खतरनाक स्ट्ंट करावे लागायचे. चालत्या ट्रेनवर स्टंट करणं, तलवार चालवणं, धावणं, उंच इमारतीवरून उडी मारणं, घोडसवारी करणं, काच फोडून बाहेर येणं... अशा खतरनाक दृश्यांमध्ये हिरोचा डुप्लिकेट म्हणून मुड्डू काम करू लागला. एक दिवस प्राणने सुबोध मुखर्जींकडे मुड्डूची शिफारस केली आणि मुड्डू देव आनंद यांच्या मुनीमजी चित्रपटामधून (1955) स्टंटमॅनचा फाइट मास्टर झाला. शेट्टी हे नाव त्याला मिळाले.
60 आणि 70 चे दशक शेट्टीने गाजवले. आग ओकणारे डोळे आणि पैलवानासारखी ऐट पडद्यावर पाहून प्रेक्षकसुद्धा वरमून जायचे. आता हिरोचे काही खरे नाही, असे प्रेक्षक म्हणायचे. सुरुवातीला शेट्टी हिरोला चांगला धुवायचा, नंतर हिरो त्याला बदडायचा. त्यांनी स्वत:ची  स्टंट दृश्ये स्टंटमॅनकडून कधीच करून घेतली नाहीत.ते  स्वत:ची स्टंट दृश्ये स्वत: करायचे. स्टंटबाजी करताना काही बरं वाईट होऊ नये, असा विचार नेहमीचा यायचा, पण असा प्रसंग त्यांच्या आयुष्यात आलाच. निर्माता ब्रज यांच्या बॉम्बे 405 माइल्स चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा यांचा स्टंटमन ज्युनिअर मन्सुरने टाइमिंग मिस केले आणि त्याचा जीव गेला. शत्रुघ्नचा डबल बनलेल्या मन्सुरने एका क्षणाचा विलंब केला आणि पेट्रोल बॉम्ब फुटला. एम.बी.शेट्टी हा क्षण कधीच विसरू शकले नाहीत.
शेट्टी दोन काम कधीच करू शकले नाहीत. एक निर्माता बनण्याचे आणि दुसरे हिरो बनण्याचे. त्यांना तुम सलामत रहो या चित्रपटात हिरोची भूमिका मिळाली होती. मिस इंडिया बनलेली परसिस खंबाटा त्यांची नायिका होती. पण चित्रपट काही तयार झाला नाही. भाषा शेट्टीची मुख्य अडचण होती. कसं तरी दोन इयत्ता शिकलेल्या शेट्टींना चित्रपटात डॉयलॉग मिळायचेच नाहीत. कसे तरी अडखळत अडखळत दोन ओळींचा संवाद बोलून हिरोला धमकावण्याखेरीज ते पुढे जाऊ शकले नाहीत.
ज्या पेशेनं त्यांना भाकरी दिली, त्याचं व्यवसायानं त्यांच्या जीवनाच्या शेवटी साथ सोडली. चित्रपट मिळायचे बंद झाले. तीस वर्षात चाळीस वेळा शरीराची हाडं मोडली,पण त्यांनी कधी हार मानली नाही. शेवटी अॅक्शन सीन न करताच ते घरात कोसळले, ते शेवटी उठलेच नाहीत. ज्या प्रसिद्ध हिरो, निर्माता आणि ज्यांनी जबरदस्त सीन दिल्याबद्दल त्यांची पाठ थोपटली, त्या सगळ्यांनी त्यांच्या शेवटच्या अंत्य दर्शनलासुद्धा येण्याची तसदी घेतली नाही.1931 मध्ये जन्मलेल्या शेट्टींचे निधन 23 जानेवारी 1983 रोजी झाले.

No comments:

Post a Comment