Sunday, January 26, 2020

काळजी कशाची करता...?

आपण एकाद्या नदीवर बांधलेल्या पुलाखालून वाहणारे पाणी कधी पाहिले आहे का? या वाहत्या पाण्याकडून चिंतेपासून दूर राहण्याचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं की, पुलाखालून जे पाणी एकदा वाहून जातं, ते पाणी पुन्हा कधी परतून येत नाही. पुलाखालून वाहणार पाणी नवीन होऊन जातं. तसंच आपणही आयुष्यातल्या दुःखद आठवणी पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यासारखं कायमच विसरून गेलं पाहिजे.

यशाची सीमा निश्चित करा
'अलेक्झांडर' बाबत सांगितलं जातं की, ज्यावेळेला तो जग जिंकायला निघाला होता,त्यावेळेला त्याच्या गुरूंनी त्याला विचारलं,' समज तू हे जग जिंकलास तर पुढे काय करशील? कारण जग तर एकच आहे,तेव्हा तू पुन्हा जिंकण्यासाठी दुसरं जग कोठून आणणार आहेस? गुरूचा प्रश्न ऐकून सिकंदरचे डोळे उघडले. सांगायचा मुद्दा असा की, काळाची मागणीसुद्धा हीच आहे-आपल्याजवळ जे काही आहे,त्यातच आपल्याला जीवनाचा असिमीत आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दुसऱ्याच्या दुःखा तून शिका
या जगात असा कुठलाच माणूस नाही की,ज्याला काळजी किंवा दुःख नसते. प्रत्येकाला काही ना काही काळजी,चिंता असतेच. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या, अडचणी असतात. फरक फक्त त्याच्या प्रकृतीचा आहे. कुणाच्या पायात चप्पल नाहीत तर कुणाला पायच नाहीत. अशा परिस्थितीत आपल्याला दुसऱ्याच्या दुःखातून काहीतरी शिकले पाहिजे. स्वतः चे मनोधैर्य मजबूत केले पाहिजे. दुसऱ्याचे दुःख पाहून ज्यावेळेला आपले दुःख लहान वाटायला लागते तेव्हा आपल्या मनाला समाधान लाभते. हेच आपल्याला तणावापासून सुरक्षित ठेवतं.
खूप काही शिकायला मिळतं
अमेरिकी कवी हेन्री वडसवर्थ लॉंगफेलीने एकदा म्हटलं होतं,'प्रत्येक माणसाचं वैयक्तीक दुःख असतं. ते जगाला माहीत नसतं. वाईट तेव्हा वाटतं, ज्यावेळेला दुःखाने घेरलेल्या एकाद्या माणसाचे दुःख आपण समजून न घेता,त्याकडे दुर्लक्ष करतो. ज्यावेळेला आपण अडचणीत सापडतो, त्यावेळेला त्यातच अडकून न पडता, त्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निकटच्या माणसांशी बोललं पाहिजे. दुःख स्वतःजवळ साठवून ठेवलं तर ते त्याचा स्फोट आपल्यासाठी प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे जसं आपण आनंद वाटतो,तसं दुःखही वाटलं पाहिजे. आपल्या आयुष्यात उद्भवलेल्या अडचणींबाबत आपल्या माणसांजवळ मोकळ्या मनानं व्यक्त झालं पाहिजे.
परिस्थितीनुसार स्वतःला बदला
इंग्रजी साहित्यिक, तत्त्वज्ञ, नाटककार जॉर्ज बर्नार्ड यांनी आपल्या ' मॅन ऍण्ड सुपरमॅन' पुस्तकात लिहिलं आहे की,चिंतारहित जीवनासाठी माणसाला जीवनात परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेतलं पाहिजे. त्या साच्यात सामावून घेतलं पाहिजे. ज्यावेळेला एकादा माणूस या जगामध्ये आपल्या मनाच्या अनुकूलतेनुसार स्वतःला समावण्याचा प्रयत्न करतो,त्यावेळेला हे विफल प्रयत्न काही गंभीर समस्यांना जन्म देतात. त्यामुळे आपण स्वतःला परिस्थितीनुसार बदलण्याची सवय लावून घेतली पाहिजे. परिस्थिती कधीही माणसाच्या इशाऱ्यानुसार नाचत नाही.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment