Sunday, January 12, 2020

कोणताच चित्रपट लहान-मोठा नसतो


एकाद्या नव्यख्या कलाकाराला एकाद्या निर्मात्यानं आपल्या चित्रपटात काम द्यावं. काही दिवसांनी तोच कलाकार चित्रपट निर्मात्याला म्हणतो, मला एका मोठ्या फिल्म निर्मात्याचा मोठा चित्रपट मिळणार आहे. त्यामुळे मला तुमच्या चित्रपटातून मुक्त करा. नवा कलाकार चित्रपट सोडून देतो, पण आठवड्याभरातच पुन्हा येतो आणि म्हणतो, त्या मोठ्या चित्रपट निर्मात्याने दुसर्यालाच हिरो म्हणून घेतलं आहे. आता मला पुन्हा तुमच्या चित्रपटात घ्या. अशा परिस्थितीत तो निर्माता काय करेल? त्या नवख्या कलाकाराला हकलूनच देईल ना! पण उदार मनाचा निर्माता नवख्या कलाकाराला माफ करतो आणि आपल्या चित्रपटात घेतो. नंतर त्यांचे संबंध इतके घनिष्ठ बनले की, त्यांनी एकत्र तब्बल अर्धा डझन चित्रपटांमध्ये काम केले. हा नवखा कलाकार होता जितेंद्र आणि त्यांना संधी दिली होती निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता आणि छायाचित्रकार एल.व्ही.प्रसाद यांनी.

हा किस्सा जीने की राह (जितेंद्र-तनुजा) या 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा आहे. हा चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन एल.व्ही. प्रसाद करत होते. प्रसाद यांनी हिंदी आणि तेलगुमध्ये यशस्वी चित्रपट बनवले होते. त्यांनी या क्षेत्रात चांगलाच जम बसवला होता. जीने की राह हा चित्रपट त्यांच्या 1953 मध्ये आलेल्या एका तेलगू चित्रपटाचा रिमेक होता. तेलगू चित्रपटात ते स्वत: हिरो होते. जितेंद्रला व्ही शांताराम यांनी गीत गाया पत्थरों ने (1964)मध्ये संधी दिली होती. शांताराम यांनी पाच वर्षांपर्यंत जितेंद्रशी करार केला होता. त्याने अन्य चित्रपटांमध्ये काम केल्यास कमाईचा अर्धा वाटा देण्याचे ठरले होते. आता ही गोष्ट वेगळी की, जितेंद्रने बाहेरचे चित्रपटही केले आणि आपल्या कमाईचा अर्धा हिस्साही शांताराम यांना दिला.
प्रसाद यांच्या जीने की राह आणि सुबोध मुखर्जी यांच्या अभिनेत्री या दोन्ही चित्रपटांच्या शुटींगच्या तारखांचा मेळ बसत नव्हता. जितेंद्रला वाटत होतं की, प्रसाद यांनी त्यांना मोकळं करावं. म्हणजे अभिनेत्री चित्रपटात काम करता येईल. सुबोध मुखर्जी मोठे निर्माता-दिग्दर्शक होते. शिवाय अभिनेते अशोक कुमार यांचे जावई शशधर मुखर्जी यांचे बंधू होते. मुखर्जी यांनी देव आनंद यांना घेऊन मुनीमजी, पेइंग गेस्ट आणि लव मॅरेज चित्रपट बनवले होते. मुखर्जी यांच्या जंगली चित्रपटाने शम्मी कपूर यांना स्टार बनवले होते. त्यामुळे जितेंद्र यांना वाटत होतं की, अभिनेत्री त्यांना स्टार बनवू शकते.
जितेंद्रने त्याला मोकळं करण्याविषयी सांगितल्यानं प्रसाद यांना मोठा धक्का बसला होता. पण ते संघर्ष करणार्या कलाकारांची मानसिकता जाणून होते. त्यांनी जितेंद्रला आपल्या चित्रपटातून मोकळं केलं. पण धक्का बसण्याची वेळ जितेंद्रवर आली. कारण त्याने एका फिल्मी नियतकालिकेत सुबोध मुखर्जी यांच्या अभिनेत्रीसाठीची जाहिरात वाचली. त्यात शशी कपूर आणि हेमामालिनी यांची नावे होती. जितेंद्र यांनी जीने की राह सोडला होता, तो शशी कपूरला मिळाला होता. जितेंद्र पुन्हा प्रसादकडे आले. परिस्थिती सांगितली. प्रसाद यांनी जितेंद्रला समजावून सांगितलं की, कुठलाच चित्रपट लहान-मोठा नसतो. निर्मात्याची ती पुंजी असते. जितेंद्रना पुन्हा चित्रपटात घेण्यात आलं. मुखर्जी यांचा अभिनेत्री बॉक्स ऑफिसवर कोसळला तर प्रसाद यांचा जीने की राह हिट झाला. या चित्रपटातील बडी मस्तानी है मेरी मेहबुबा..., आप मुझे अच्छे लगने लगे..., इक बंजारा गाए जीवन के गीत सुनाए... ही गाणी लोकप्रिय झाली.नंतर एल.व्ही. प्रसाद आणि जितेंद्र यांनी खिलौना, ससुराल, बिदाई सारखे चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
कर्जात बुडालेल्या तेलगुभाषी शेतकर्याच्या एका युवकाने आपल्या वडिलांची दयनीय अवस्था पाहिली. त्यांना मदत करण्यासाठी आणि आपली परिस्थिती बदलवण्यासाठी पत्नीकडून पैसे घेऊन त्याने घर सोडले. काही वर्षे लोटली. त्यांची काहीच खबर मिळाली नाही. शेवटी घरच्यांनी त्याची आशा सोडली. पण शेतकर्याचा मुलगा परतला. त्याने परिस्थिती बदलली, वडिलांना कर्जमुक्त केलं. समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्धी आणि पैसा मिळवला. हिंदी आणि तेलगुमधील पहिल्या बोलक्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. नंतर चित्रपटही बनवले. हा युवक म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता अक्किनेनी लक्ष्मी वारा प्रसाद राव. म्हणजेच एल.व्ही. प्रसाद. यांनीच एक दुजे के लिए चित्रपटाच्या माध्यमातून प्रदेशवाद आणि भाषावादच्या लढाईदरम्यान प्रेमाची ताकद विशद केली होती. प्रसाद यांचा जन्म 17 जानेवारी 1908 चा. त्यांचे निधन 22 जून 1994 मध्ये झालं.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment