Sunday, January 5, 2020

अजय देवगणच्या चित्रपटांची सेन्च्युरी


अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवून आज तीस वर्षे उलटून गेली आहेत. तानाजी: द अनसंग वॉरियर हा अजयच्या कारकिर्दीतला शंभरावा चित्रपट आहे. आपल्या फूल और कांटे या चित्रपटाद्वारा  दोन मोटारसायकलवरून रोमान्स आणि फुल्ल अॅक्शन दाखवणार्या अजयने सिनेसृष्टीत एक दीर्घ टप्पा पूर्ण केला आहे.फूल और कांटे हा त्याचा पहिला चित्रपट नोव्हेंबर 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. वास्तविक या चित्रपटासाठी अक्षय कुमारला साइन करण्यात आले होते.पण काही कारणाने अक्षयने हा चित्रपट करण्यास नकार दिला. अजयचे वडील वीरू देवगण बॉलीवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर होते. त्यांनी आपल्या मुलाला विचारले की, तू हा चित्रपट करतोस का? अजयने होकार दिला. या चित्रपटात दोन मोटारसायकलवर पाय ठेवून अजयने एंट्री केली होती. नंतर हे दृश्य एक आयकॉनिक सीन सिद्ध झाले. या चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर खुद्द अजयचे वडीलच होते.

अजय अभिनेता झाला असला तरी त्याला अॅक्टर नाही तर डायरेक्टर व्हायचे होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो शेखर कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहात होता. याच दरम्यान त्याला कुक्कू कोहली यांनी फूल और कांटेसाठी घेतलं. बॉलिवूड इंडस्ट्रीचा सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्या अजयचा तानाजी हा शंभरावा चित्रपट 10 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
अजय देवगणचा जन्म 2 एप्रिल 1969 रोजी दिल्लीमध्ये झाला. अजय हा पंजाबी आहे. अजयच्या आईने म्हणजे वीणा देवगन यांनी काही चित्रपटात काम केले आहे. अजयने पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतल्या मिठ्ठी भाई कॉलेजमधून पूर्ण केले आहे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट दिग्दर्शित जख्म आणि 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार संतोषी दिग्दर्शित द लिजंड ऑफ भगतसिंह या चित्रपटांसाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला आहे. 24 फेब्रुवारी 1999 मध्ये अजयने प्रसिद्ध अभिनेत्री काजोलशी विवाह केला. त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. अजय आणि काजोल ही जोडी 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या हलचल चित्रपटामधून पडद्यावर आली. अजय हा पहिल्यांदा अॅक्शन हिरो म्हणूनच पडद्यावर आला, मात्र त्याने नंतर कॉमेडी चित्रपटदेखील दमदारपणे साकारल्या. गोलमाल चे तीन भाग झाले आहेत आणि पहिल्या चित्रपटापेक्षा नंतरचे चित्रपट आणखी हिट होत गेले आहेत.
2019 मध्ये त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. या वर्षात त्याचा स्टार स्पोर्ट्स ड्रामा असलेला मैदान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. फुटबॉलवर आधारित असलेल्या या चित्रपटात भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दूल रहिम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 1952 ते 1962 दरम्यानचा भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ  यात दाखवण्यात आला आहे. प्रशिक्षक रहिमच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहचला होता. तानाजी: द अनसंग वॉरियर आणि मैदानबरोबरच अजय देवगन आणखी काही चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे. रोहित शेट्टीचा सूर्यवंशी, दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या निर्देशनाखाली बनत असलेला तुर्रम खान यांत तो प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012




No comments:

Post a Comment