Sunday, January 12, 2020

बेरोजगारांच्या आत्महत्या वाढल्या


कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असलेल्या शेतकर्यांमुळे देशाची प्रतिमा आधीच मलिन झाली असताना देशापुढे आणखी एक संकट आ वासून उभे राहिले आहे. हाताला काम नाही म्हणून बेरोजगारदेखील मोठ्या प्रमाणात स्वत:ला संपवत आहेत. देशापुढील बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. नोकर्या देतो म्हणून सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी नोकर्या तर दिल्या नाहीतच पण अशा मुलभूत प्रश्नांवरचे लोकांचे लक्ष हटवण्यासाठी दुसरेच मुद्दे देशापुढे आणून सगळा सावळा गोंधळ मांडून ठेवला आहे. बेरोजगारीने बेजार झालेल्या युवकांनी आत्महत्या करण्यात आता शेतकर्यांनाही मागे टाकले आहे. नॅशनल क्राइम रिकॉर्डस ब्युरो (एनसीआरबी) च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात 2018 मध्ये प्रत्येक दोन तासाला तिघा बेरोजगारांनी आत्महत्या केली आहे. म्हणजेच रोज सरासरी 36 टक्के बेरोजगार आत्महत्या करत आहेत. ही संख्या शेतकरी आत्महत्येपेक्षा अधिक आहे. भारत देश हा युवकांचा देश असून इथे युवकच मानसिकदृष्ट्या खचलेला असून या देशाचे पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या धक्कादायक आकडेवारीने अनेक पातळीवर संकटे उभी टाकली आहेत. सरकारने बेरोजगारांचा प्रश्न संवेदनशीलपणे न हाताळल्यास मोठे गंभीर प्रश्न देशाला भोगावे लागणार आहेत. एनसीआरबी ही केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणारी संस्था असून देशभरातील गुन्ह्यांशी संबंधित आकडे आणि ट्रेंडचा रिपोर्ट दरवर्षी जारी करत असते. या संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात 2018 मध्ये आत्महत्येचे प्रमाण 3.6 टक्क्याने वाढले आहे. 2018 मध्ये 1 लाख 34 हजार 516 आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. 2017 मध्ये 1 लाख 29 हजार 887 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. दुर्दैवाची बाब म्हणजे या आत्महत्येत पुरोगामी म्हटला जाणारा महाराष्ट्र आघाडीवर आहे. 2018 मध्ये महाराष्ट्रात 17 हजार 972 आत्महत्या झाल्या आहेत. दुसर्या क्रमांकाला तामिळनाडू (13 हजार 896) असून तिसर्या क्रमांकावर प.बंगाल ( 13 हजार) आहे. मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यात जवळपास 11 हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.
अलिकडच्या तीन वर्षात बेरोजगारांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ होत आली आहे. 2015 मध्ये एकूण 12 हजार 602 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या होत्या तर 10 हजार 912 बेरोजगारांनी या वर्षात आत्महत्या केल्या होत्या. मात्र यानंतर शेतकर्यांच्या आत्महत्येचा  ग्राफ खाली आला आहे तर बेरोजगारांचा ग्राफ वाढत गेला आहे. 2016 मध्ये 11 हजार 379 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 11 हजार 173 बेरोजगार युवकांनी स्वत:ला संपवले आहे. 2017 मध्ये 10 हजार 655 शेतकरी आणि 12 हजार 241 बेरोजगार यांनी आपली इथली यात्रा संपवली आहे. 2018 मध्ये तर बेरोजगारांच्या आत्महत्येत आणखीणच वाढ झाली आहे. 12 हजार 936 बेरोजगारांनी मृत्यूला कवटाळले आहे तर 10 हजार 349 शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करणारे बेरोजगार हे युवकच आहेत. देशाचा आधारस्तंभ असलेली ही पिढी हाताला काम नसल्याने नैराश्यात गेली आहे. नोकरी नसल्याने त्यांच्यापुढे अनेक प्रश्न उभे आहेत. आपला देश हा युवकांचा देश आहे. तब्बल 46 टक्के युवक या देशात आहेत. ज्यांची सर्वाधिक संख्या आहे, त्यांच्याकडेच दुर्लक्ष केले जात असल्याने देशाचे भवितव्य काय असणार आहे, याचा अंदाज घ्यायला हरकत नाही. आजचा युवक नैराश्यात गेला असून आत्महत्येला कवटाळत आहेत. दुसर्या बाजूला पोटासाठी हा युवक गुन्हेगारीकडे वळला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रश्न उपस्थित झाला आहे. खून, मारामार्या, नशेखोरीचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्याबबतीत विनयभंग, बलात्कार या घटनाही वाढल्या आहेत. याला बेरोजगारीच कारणीभूत आहे. पोटाची भूक शमवण्यात हा युवक यशस्वी झाला तर अनेक गुन्ह्यांचे प्रमाण आपोआप कमी होईल.
याच एनसीआरबी संस्थेच्या आकडेवारीनुसार 2018 संपूर्ण भारतात महिलांच्याबाबतीत 3 लाख 78 हजार 277 गुन्हे घडले आहेत. यातल्या 32 हजार 632 घटना या बलात्काराच्या आहेत. युवकांच्या हाताला काम दिल्यास अपराधांचा ग्राफ खाली येण्यास मदत होणार आहे. सत्ताधारी मंडळी या प्रश्नांना सामोरे जायचे सोडून अन्य विषय ऐरणीवर आणून पळ काढत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012     



No comments:

Post a Comment