Friday, January 17, 2020

रिजेक्ट झालेले डफलीवाले...गाणे सुपहिट ठरले


दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते तेलगु फिल्मकार काशीनाथुनी विश्वनाथ ( के. विश्वनाथ) आणि त्यांच्या सिरी सिरी मुव्वा या तेलगु चित्रपटाची नायिका जयाप्रदा हिने 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरगम चित्रपटाद्वारा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. हा तेलगु चित्रपट निर्माता एन. एन. सिप्पी हिंदीमध्ये बनवत होते. सिप्पी आणि विश्वनाथ यांनी याच्या संगीताची जबाबदारी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि गाणी रचण्याची जबाबदारी आनंद बक्षी यांच्यावर सोपवली होतीलक्ष्मी-प्यारे आणि आनंद बक्षी यांच्यासाठी सरगम हा चित्रपट एक आव्हानच होते. एक तर तेलगू चित्रपटांचा डंका वाजत होता. आणि त्यात मानवी मनाचे तरंग अचूक टिपणार्या विश्वनाथ यांचं समाधान करणं सोपं नव्हतं. मूळ चित्रपट पाहून बक्षी यांनी सात गाणी लिहिली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी एक एक करत त्यांच्या धून बनवत आणि विश्वनाथ यांना ऐकवत.

विश्वनाथ यांनी सगळ्या गाण्यांना हिरवा कंदिल दाखवला खरा पण डफली वाले डफली बजा... या गाण्याला मात्र त्यांनी ऐकताच रिजेक्ट करून सोडलं आणि म्हणाले, या गाण्याच्या जागी दुसरे गाणे बनवा. विश्वनाथ यांच्या सांगण्यावरून लक्ष्मी-प्यारे यांनी दुसरे गाणे बनवले. पण विश्वनाथ यांनी हेही गाणे रिजेक्ट केले. यानंतर बनवण्यात आलेली सगळी गाणी रिजेक्ट झाली. यामुळे लक्ष्मी-प्यारे आणि बक्षी यांच्यापुढे मोठी समस्या उभी राहिली. बक्षींना खात्री होती की, डफलीवाले ...गाणे खूपच चांगले झाले आहे. आणि त्याच्यात हिट होण्याचे गुणही आहेत. तिकडे विश्वनाथ यांनी दुसर्या गाण्यांचे चित्रिकरणही सुरू केले. आनंद बक्षी यांनी लिहिलेले पर्वत के उस पार... हे गाणे उटीमध्ये चित्रीत करण्यात आले. दुसरे गाणे कोयल बोली...राजमुंदरी येथे गोदावरीकाठी चित्रित केले. या दरम्यान लक्ष्मी-प्यारे आणि बक्षी यांनी ठरवलं की, डफलीवाले...हे गाणे पुन्हा एकदा विश्वनाथ यांना ऐकवावे, कदाचित त्यांना पसंद पडेल. दोघांनाही वाटत होतं की, मधे बराच काळ गेला आहे. त्यामुळे विश्वनाथ यांच्या डोक्यातून हे गाणे गेले असेल. त्यांनी डफलीवाले ... हे गाणे विश्वनाथ यांना पुन्हा ऐकवलं. विश्वनाथ यांनी ते गाणं लगेच ओळखलं. ते म्हणाले, तुम्ही मला पुन्हा तेच गाणं का ऐकवता आहात? याच्या जागी दुसरे गाणे बनवायला सांगितलं होतं.
चित्रपटाची सगळी गाणी लिहून झाली होती आणि ती चित्रितही झाली होती. आता फक्त एकच गाणे उरले होते. पण यासाठी उशीर होत होता. डफलीवाले... गाण्याच्या जागी म्हणावे असे दुसरे गाणे येत नव्हते. बक्षी यांचा तर डफलीवाले... वरच जीव बसला होता. या गाण्यामुळे चित्रपटाला उशीर होतोय हे लक्षात आल्यावर विश्वनाथ यांनी नाईलाजाने डफलीवाले... गाणे चित्रित करायला घेतले. काश्मिरमध्ये आउटडोर शेड्युल लावून मुगल गार्डनमध्ये या गाण्याचे चितिकरण करण्यात आले. आठ जानेवारी 1979 मध्ये हा चित्रपट रिलिज झाला आणि या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला. डफलीवाले... हे गाणे बिनाका गीतमालेच्या पहिल्या पायदानला पोहचल्यावर विश्वनाथ यांना लोकांच्या पसंदीचा मोठा धक्काच बसला. लक्ष्मी-प्यारे आणि बक्षी यांना मात्र कमालीचा आनंद झाला होता. ते हसत होते. हे गाणे लागोपाठ 25 आठवडे पहिल्या क्रमांकावर होते. फिल्म फेअरच्या पाच श्रेणींमध्ये सरगमला नामांकन मिळाले. सर्वश्रेष्ठ चित्रपटाबरोबरच अभिनेता-अभिनेत्रीसाठी ऋषि कपूर आणि जयाप्रदा नामांकित झाले. लक्ष्मी-प्यारे सर्वश्रेष्ठ संगीतकार आणि बक्षी सर्वश्रेष्ठ गीतकार  आणि ज्या डफलीवाले गाण्याला विश्वनाथ यांनी नाकारले होते, त्या गाण्यासाठी बक्षी सर्वश्रेष्ठ गीतकारच्या रुपात नामांकित झाले होते.मात्र यापैकी फक्त लक्ष्मी-प्यारे यांना सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.
चित्रपट गीतकारांना फक्त संगीतकारांनाच संतुष्ट करायचं नसतं तर निर्माता-दिग्दर्शक यांच्याही पसंदीस उतरावे लागते. गीतकार आनंद बक्षी यांच्या करिअरमध्ये अशा अनेक संधी आल्या. कुणी ना कुणी त्यांच्या गाण्यावर संतुष्ट व्हायचा नाही. असाच प्रकार निर्माता एन.एन.सिप्पी यांच्या  सरगम चित्रपटाबाबतीत घडला होता. दिग्दर्शक विश्वनाथ यांनी डफलीवाले गाणे रिजेक्ट केले होते. पण ज्यावेळेला हे गाणे बिनाका गीतमालामध्ये पहिल्या क्रमांकावर गेल्यावर विश्वनाथ चकित झाले आणि बक्षी हसत होते. अशा बक्षी यांचा जन्म 21 जुलै 1930 मध्ये झाला होता. निधन 30 मार्च 2002 मध्ये झाले.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 7038121012

No comments:

Post a Comment