Sunday, January 19, 2020

यश मानण्यावर आहे


सर्वसामान्यपणे यशाची व्याख्या ही नाव, कीर्ती,पैसा कमावणं अशी केली जाते. आजच्या युवकाची ही यशाची सर्वसाधारण कल्पना आहे. दहा वाय दहाच्या खोलीत राहून एखादा माणूस कोट्यधीश झाला वगैरे स्वरुपाच्या गोष्टी ऐकायला सर्वांनाच आवडतात. पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात असं प्रत्येकाच्या बाबतीत घडणं अशक्य आहे. मात्र कीर्ती आणि नशीब ही फक्त काही थोड्या लोकांची मक्तेदारी असावी आणि तुमच्या-माझ्यासारख्या लोकांनी फक्त त्यांच्या यशोगाथा ऐकाव्यात ,पण स्वत: कधीच यशस्वी बनू नये, असं नाही. आपणही यशस्वी होणार नाही, असं नाही. आपल्या प्रत्येकाकडे यशस्वी होण्याची शक्ती आणि क्षमता आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. यात अजिबात शंका नाही. मात्र आपल्या आवडीनिवडीनुसार आपल्या यशाची व्याख्या बदलते, ते आपण समजून घेतली पाहिजे. मानसन्मान, पैसा हीच यशाची व्याख्या आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधून घेतली असल्यास मात्र तुमच्या पदरी निराशा ही येणारच. आयुष्यात यश मिळवायचे असेल तर आपल्या यशाची व्याख्या शोधता आली पाहिजे.

तुम्ही सगळेजण तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. मात्र तुम्ही यश कशाला मानता ,कोणता व्यवसाय निवडता आणि यशापयशाला कसे सामोरे जाता यावर ते अवलंबून आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, प्रत्येकाला हवं ते मिळत नाही. तुम्हाला हवा तो अभ्यासक्रम घेता आला किंवा हवी ती नोकरी तर तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात. पण नेहमीच तुम्हाला तुमच्या पसंतीच्या गोष्टी मिळतील, असं नाही. आयुष्य हा एक पत्त्यांचा डाव आहे. तुमच्या हातात कोणते पत्ते येतील ते नशिबावर ठरते. ते तुम्ही ठरवू शकत नाही. येतील ते पत्ते घेऊन डाव खेळणं एवढच तुमच्या हातात आहे. असं असलं तरी जे तुमच्या वाट्याला आलं आहे, त्यात सर्वोत्तम देणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळाली नाही,पण तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलात आणि तुमच्याकडून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला पुढे सरकण्याची संधी आहे. तुम्हाला आवडीचे नसलेले क्षेत्र तुम्ही आवडीत रुपांतर केल्यास तुम्हाला यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. यश मानण्यावर आहे, याचीही प्रचिती येईल.
दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा एक किस्सा आहे. त्यांना कुणीतरी विचारलं, तुमचं सर्वात मोठं यश कोणतं? विचारणार्याला वाटलं की, ते क्षेपणास्त्र वगैरे काहीतरी सांगतील. पण त्यांचा अंदाज साफ चुकला. ते म्हणाले, हृदयावरील शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे स्टेन्ट्स आपण परदेशातून मागवत असल्याने फारच महाग पडतात. हे काही वर्षांपूर्वी माझ्या लक्षात आले होते. ते माझ्या मनाला फारच लागले. शेवटी मी दीर्घ रजा घेतली. बराच अभ्यास केला आणि देशात तयार होऊ शकतील असे स्वस्त किमतीचे स्टेन्ट्स बनवले. ते परीक्षणासाठी आणि वितरणासाठी पाठवून दिले आणि पुन्हा कामावर रुजू झालो.नंतर एकदा एका विमानतळावर वाट पाहात असताना एक महिला मला भेटली. साध्या वेशातील ती महिला मला म्हणाली, कलामजी, आप मेरे दिल में हमेशा रहेंगे. मी उडालोच! पण तुम्ही बनवलेले कमी किंमतीचे स्टेन्ट्स माझ्या हृदयात बसवले आहेत. असं जेव्हा ती महिला पुढं म्हणाली तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. कलाम पुढे म्हणाले, मी आयुष्यात केलेल्या सगळ्या कामांमधलं हेच काम सर्वात मोठं वाटतं. कारण ते लोकांच प्राण वाचवणारं काम आहे. लोकांना मारणार नव्हे. याचा अर्थ असा की, तुम्ही पैसा, कीर्तीपेक्षाही आपण समाजाच्या उपयोगाला पडू शकतो, असे काम करणं म्हणजे यश आहे.
आता एकदम देशासाठी काम करणं म्हणजे खूप मोठा पल्ला आहे, असे तुम्हाला वाटेल. पण त्यासाठी तुम्ही किती मोठं स्वप्न बघता हे महत्त्वाचं नाही. यशस्वी ठरण्यासाठी आपल्याला देशाचा आदर्श वगैरे बनलं पाहिजे असंही काही नाही. आपण आपल्या कुटुंबाचे, सहकार्यांचे किंवा आपल्या गल्लीचे किंवा आपण राहतो त्या वस्तीचे आदर्श बनलो तरी त्या यशाचं समाधान , एखादा दरिद्री माणूस लक्षाधीश बनण्याच्या तोडीचं असतं. स्वप्नं मोठी असलीच पाहिजेत असं नाही. ती तुमची असणं महत्त्वाचं आहे. जर ते तुमचं स्वप्न असेल एखादा दगड पाण्यात टाकल्याबरोबर तो जसा तळाशी जातो, तसं तुम्ही सहजपणे तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहचाल,पण जर ते तुमचं स्वप्न नसेल आणि अन्य कुणाचं तरी स्वप्न असेल तर मात्र तुम्ही लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे आयुष्यभर वर वर तरंगत राहाल. महत्त्वाचा मुद्दा असा की, आपल्याला काय पाहिजे हेच आपल्यापैकी अनेकांना हेच कळत नाही. अनेकवेळा वेगवेगळ्या अनेक गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात. तुम्हाला बर्यापैकी यश हवं असतं. सामाजिक प्रतिष्ठा हवी असते. एक चांगलं घर हवं असतं. देखणा नवरा किंवा पत्नी हवी असते. बहुतांश लोकांच्या अपेक्षा याच असतात. अनेकांच्या त्या अपेक्षा पूर्ण होतात आणि ते सर्वसाधारणपणे सुखाचं जीवन जगतात. कारण तीच त्यांची सुखाची व्याख्या असते. पण तुम्हाला मोठम यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कुठलं तरी एकच मोठं ध्येय ठरवावं लागेल. अन्य गोष्टी गौण मानाव्या लागतील. प्रयत्न आणि नशिब यांच्यात एक नातं आहे. तुम्ही जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढी यशाची संधी तुम्हाला अधिक मिळते.
एक बाग काम करणारा मुलगा होता. तो अनेक लोकांकडे बागेचं काम करायचा. पण त्याच्या कामाची एक विशिष्ट पद्धत होती. आपली प्रत्येक बाग सर्वात सुंदर दिसली पाहिजे असा त्याचा कटाक्ष असे. इतरांच्या दृष्टीने त्याचं काम शुल्लक असलं तरी त्याच्यादृष्टीनं ते अमूल्य होतं. सांगायचे तात्पर्य असे की, जर एकाद्या छोट्या गोष्टीतही तुम्ही सर्वस्व पणाला लावत असाल तर ते यश तुमच्यासाठी फार मोठं असतं. मग ती गोष्ट कितीही सामान्य असो. चांगली आई बनणं, चांगला पती, चांगला कर्मचारी, चांगला अधिकारी, चांगला शिक्षक, चांगला मदतनीस. असं काहीही बनण्यासाथी केलेले प्रयत्न तितकेच समाधान देतात.   




No comments:

Post a Comment