Saturday, February 18, 2012

(रहस्य कथा) 'पाठलाग कर'

      माझं नाव फ्लावर आणि माझ्या पतीचं नाव आहे डेविस रास. लग्नापूर्वी माझ्या जीवनात एक भयंकर घटना घडली होती, जी मी माझ्या पतीलासुद्धा सांगितलेली नाही. तीच मी आता तुम्हाला  सांगते आहे.
     मी आणि रास लंडनमध्ये भेटलो होतो. आमच्यात मैत्री झाली. रास म्हणाला होता की त्याचा वाडवडिलांचा जुना वाडा देहातमध्ये आहे. तिथे त्याची आई एकटी राहते. वडिलांचा त्याच्या लहानपणीच मृत्यू  झाला होता.
एक दिवस मी रासला म्हणाले," लग्नापूर्वी मला तुझ्या आईला भेटायचं आहे."
     रास म्हणाला होता, " ते कठीण आहे!  खरं तर देहातमध्ये ती एकटीच राहिली असल्याने  तिचा स्वभाव विचित्र बनला आहे. तिचं म्हणणं असं की, कोणी तिसरा तिच्या आणि माझ्यात येता कामा नये "
" पण लग्नानंतर तर मी तुझ्यासोबतच राहणार!" मी म्हटलं
     " हो, म्हणून तर!  मी लग्नच करू नये, अशी आईची इच्छा आहे. तरीही मी तुला तिच्याशी भेट घालून देईन. कदाचित तुला पाहिल्यावर तिच्या स्वभावात थोडा फार फरक पडेल." रास म्हणाला.
मला वाटलं की तो आईला घाबरतो.
     एक दिवस माझ्या नावाने रासच्या आई- साराचे पत्र आले. त्यांनी मला ख्रिसमसला वाड्यात बोलावले होते. म्हणजे रासने त्यांना माझ्याविषयी सांगितले होते. राससोबत मी त्याच्या गावी गेले.
     गावातला वाडा खूप मोठा आणि  जुना होता. सारा वाड्याच्या बाहेरच उभी होती. तिच्या चेहर्‍यावरून  कठोरता वाहत होती. मी तिला  हसून '' हॅलो" म्हणाले. तिने  उत्तर तर दिले नाहीच  पण जरासुद्धा हास्य आणलं नाही. ती मला डोळे वटारून पाहत असल्यासारखी दिसत होती.  जसे काही माझी परीक्षाच घेते आहे. तिने घंटी वाजवली, तेव्हा एक नोकरानी आली. तिला रास म्हणाली," जॅसी, फ्लावरला तिच्या खोलीत घेऊन जा. "
     मी कपडे वैगेरे बदलले. जॅसीने मला डाइनिंग रुममध्ये घेऊन आली. तिथे एक ऑस्ट्रेलियन आदिवाशी नोकर सांबो जेवण लावत होता. जेवणानंतर ती मला एका खोलीत घेऊन गेली व  म्हणाली," रास माझ्याबाबतीत काही म्हणाला का?"
" नाही!" मी आश्चर्याने म्हणाले.
" चल, मी तुला माझ्या पाळीव जीवांशी भेट घालून देते."
" आपले पाळीव जीव! म्हणजे कुत्री, घोडे, मांजरं...!" मी उत्सुकतेने म्हणाले.
" नाही, मला साप पाळायला आवडतात." सारा म्हणाल्या. माझ्या अंगावर सर्र्कन काटा आला.
     " ये, मी तुला दाखवते..." म्हणून सारा मला एका अरुंद चिंचोळ्या बोळकांडात घेऊन  गेली. सांबोसुद्धा सोबत होता. आम्ही पायर्‍या उतरून एका बंद खोलीच्या समोर आलो. त्यांनी कुलूप काढून दरवाजा उघडला. बाहेर बर्फ पडत होता. आम्ही आत गेलो. त्यातून आणखी  एका छोट्याशा रूममध्ये पोहोचलो. आत खूप अंधार होता. त्यांनी कंदील पेट्वला. पिवळ्या उजेडात जे काही दिसलेते पाहून पार ओरडलेच. समोर  काचेची भिंत होती. त्याच्या मागे बरेच साप सावकाशीने वळवळत होते.
     " घाबरू नकोस! हे तर काचेच्या पेटीत बंद आहेत. "  असे म्हणून ती हसली. या हसण्याला सांबोनेसुद्धा  सोबत केली. मी भयभयीत झालेली पाहून त्यांना जणू काही गंमत  वाटत होती. ड्रॉइंग रूमकडे येताना सारा म्हणाली," रासला यातले काही सांगू नकोस. नाही तर तो तुला भित्री समजेल."
     दुसर्‍यादिवशी रासने आईला सांगून टाकलेतो माझ्याशी लग्न करणार आहे. ती काहीच म्हणाली नाही, बराच वेळ माझ्याकडे डोळे मोठे करून  पाहत राहिली. नंतर मी रासला म्हणाले," मी इथे तुझ्या आईच्या पाळीव सापांमध्ये राहणार नाही."
     यावर रास म्हणाला," आपले लग्न झाले की आई दुसर्‍या वाड्यात राह्यला जाईल. तिचे पाळीव साप तिच्यासोबत जातील. काही  काळजी करू नकोस. निश्चिंत राहा"
     त्यादिवशी शहरातून वकिलाचे पत्र आले. त्याने कुठल्यातरी जरुरी कामासाठी रासला शहरात बोलावलं होतं. रास निघून गेला. जेवणानंतर माझ्या लक्षात आलं की सांबो माझ्याकडे कसल्या तरी विचित्र नजरेने पाहतो आहे. नंतर मी सारा आणि सांबो एकमेकांत काही तरी पुटपुटताना पाहिलं.
    रात्री जॅसी म्हणाली," मिस, कधी कधी मलासुद्धा खूप भीती वाटते. बरं झालं, काही दिवसांत  तुम्ही इथे राहायला येणार ते. मग सारा मॅडम आणि सांबो इथून निघून जातील."
" तुला का भीती वाटते?" मी विचारलं.
" मॅडमची सवय आणि साप...!" इतके म्हणून ती गप राहिली. मला वाटलं, खोलीच्या बाहेर कोणी आहे.
    सकाळी सारा  मला आपल्या खोलीत बोलावून घेऊन म्हणाली," माझ्या मुलानं तुला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आहे.  तू आम्हां दोघांमधे येते आहेस."
     दोन दिवस उलटले. रास अद्याप  परतला नव्हता. मला भीती वाटू लागली  होती. संध्याकाळी सांबो येऊन म्हणाला," मिस, रास आता येणार नाहीत. तुम्ही माझी एक गोष्ट ऐका, तुम्ही इथं राहणं योग्य नाही. "
" का?" मी विचारलं.
" मला जे  सांगायचं होतं ते मी सांगितलं. तुम्ही आजच रात्री इथून लंडनला गेलेलं चांगलं. इथे तुम्हाला धोका आहे."
" कसला धोका?"
" बस्स! मी सांगतोय तसं करा. रात्री मी लहान दरवाजा उघडा ठेवतो. तुम्ही स्टेशनच्या दिशेने जा. ... तरच संकटातून तुम्ही वाचाल."
     जॅसी कोठे दिसत नव्हती. सांबोने मला घाबरवलं होतं. दिवसा सारानेसुद्धा मला इशारा दिला होता.  जाणं उचित आहे, असं मी समजलो.
     चोहोबाजूनी गडद  अंधार होता. बाहेर मला सांबो भेटला. तो मला पाठीमागील लहान दरवाजाकडे घेऊन गेला. तो दरवाजा उघडून हळूच म्हणाला," मिस, समोरचे मैदान ओलांडले की स्टेशनवरच जाता. तुम्ही इथून निघून जाणे भल्याचं  आहे."
     मग मी दुसरा कोणता विचारच केला नाही. इमारतीच्या बाहेरच्या मैदानात आले. मैदान ओलांडले की स्टेशन होतं. तेथून लंडनला जाणारी ट्रेन मिळू शकत होती.
     मी खाडवण मैदानातून चालले होते. अचानक माझ्या मागे कशाची तर  तरी सळसळ ऐकू आली. मी वळून पाहिलं, तर माझ्या अंगातलं सारं त्राणच निघून गेलं. माझ्यामागे एक लांब काळाकुट्ट  साप हात धुवून मागे लागला होता.  " अरे देवा! आता कसं होणार?" माझ्या पायांनी उत्तर दिलं. मी जोराने धावायचा प्रयत्न करीत होते.  पण पायांनी साथ दिली नाही. तेवढ्यात माझा पाय खड्ड्यात पडला आणि मी  धाडकन जमीनीवर खाली कोसळले. मग थोड्या वेळाने माझी शुद्धच हरपून गेली. हां, पण बेशुद्ध पडता पडता मला कसला तरी जोराचा आवाज आला होता. जणू काही गोळी सुटल्यासारखी.

     काही वेळाने मी शुद्धीवर आले, तेव्हा माझ्यावर कोणी तरी ओणवे झुकले होते. मग आवाज आला," हे पी, फ्लावर. आता तुला कुठली भीती नाही. तो सुरक्षित आहेस." हा साराचा आवाज होता. आणि साराने ग्लास माझ्या ओठांना लावला. मी पाहिलं, सांबोसुद्धा बाजूला उभा होता.
     सांबोने मला उठून बसायला  आधार दिला. एका बाजूला टांगा उभा होता. सांबोने टॉर्चचा प्रकाश एका बाजूला केला. तर माझ्या अंगावर एकदम काटा उभा आला. जमीनीवर  काळाकुट्ट साप निपचिप पडला होता.
     सारा माझा खांदा थोपवत म्हणाली," चल, घरी चल." आणि मला टांग्यामध्ये बसवलं. टांगा निघाली. काही वेळांनी आम्ही वाड्यात पोहचलो. मला तर हे सर्व काय चाललं आहे, याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता.  माझा पाठलाग करून कुणी सापाला मारलं होतं?.
"रास!" मी म्हटलं.
     " तो सकाळपर्यंत येईल." सारा म्हणाली. " ... मुली, मी हारले, तू जिंकलंस. माझ्या सांगण्यावरूनच सांबोने सापाला तुझ्यामागे लावलं होतं. ऑस्ट्रेलियात एक अशा प्रकारची मुळी आढळून येते,  जी सापाला तिच्याकडे आकृष्ट करते. सांबोजवळ ती मुळी आहे. त्या मुळीचा रस तुझ्या  चपलांना लावला होता, म्हणूनच  साप तुझ्यामागे लागला  होता.  यात सांबोचा कसलाच दोष नाही." मी गपचिप ऐकत होते.
     सारा पुढे म्हणाली," रासने तुझ्याशी लग्न करावं, हे मला मुळीच आवडलं नव्हतं. म्हणूनच तुला संपवण्याची मी योजना आखली. मी सापाला तुझ्या पाठोपाठ जाताना पाहिलं, तेव्हा विचार आला- आता माझ्या मुलाला माझ्यापासून कुणीही हिरावून घेणार नाही. तो सतत माझ्याजवळ राहील. पण तेव्हाच मला  पश्चातापही  वाटू लागला. शेवटी तुझा दोष काय होता? तू तर रासवर प्रेम करत होतीस."
"... मी सांबोला बोलावलं. आम्ही टांग्याने तुझ्याकडे आलो. साप अगदी तुझ्याजवळ पोहचला होता. त्यामुळे त्याला मारणं उचित होतं."
     खोलीत शांतता पसरली. रासला माझ्यापासून वेगळं करण्यासाठी सारा इतक्या हीन पातळीला जाईल, असं अजिबात वाटलं नव्हतं. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला होता, जो त्याच्या हृदय परिवर्तनाची  साक्ष देत होता. पुढे मी काय बोलणार? तेवढ्यात ती म्हणाली," फ्लावर, तू मला वचन दे. ही गोष्ट रासला कधीच सांगणार नाही. नाही तर तो माझा तिरस्कार करेल आणि आमच्यातले नाते  तोडून टाकील."
     जे काही घडलं, ते विसरून जाण्यातच भलं होतं. दुसर्‍या दिवशी रास परतला. मग आमचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न झाले. त्यानंतर सारा दुसर्‍या वाड्यात राहयला गेली. आपल्या पाळीव सापांना तिने प्राणी संग्रहालयात  पाठवून आली. मी वचन पाळलं. आणि रासला त्या रात्रीच्या घटनेबाबत काहीही सांगितलं नाही. आता वाचकांना  सांगितली असली तरी ती एका गोष्टीच्यारुपाने सांगितली आहे,  पात्रांची नावं बदलून!  
      ( मूळ कथा   - एल.टी. मीड आणि रॉबर्ट    यूस्टेस)                                                  
         - स्वैर भाषांतर- मच्छिंद्र ऐनापुरे

1 comment: