दोन दिवे खास मित्र होते. एकत्र राहायचे. त्यातील एक दिवा थोडा मोठ्या आकाराचा होता. दुसरा त्यापेक्षा लहान. दिवाळीची रात्र होती. घराचा मालक आला आणि त्याने मोठा दिवा पेटवला.
दिव्याने परिसर उजळून निघाला. मोठ्या दिव्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने विचार केला
की, आता आपण रात्रभर तेवत राहू आणि दिवाळी उजळून टाकू. मालक खूश होईल. त्याच्यासोबत दुसरं कुणी नव्हतं, याचा त्याला आनंद झाला. 'मी माझ्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून टाकेन.' असा त्याने विचार केला.
तेवढ्यात त्याचा लहानगा मित्र त्याच्या जवळ येऊन थांबला.
छोटा दिवा म्हणाला, 'मित्रा, मला पण थोडा प्रकाश दे, जेणेकरून मलादेखील अंधार कमी करण्यास हातभार लावता येईल. मीही यासाठी माझे योगदान देऊ इच्छितो.'
मोठा दिवा बढाई मारत म्हणाला, ' तू काय प्रकाश देशील? यासाठी मी एकटा पुरेसा आहे.' यावर लहान दिवा गप्प राहिला. मोठा दिवा एकट्याने घर उजळून टाकण्याचा प्रयत्न करू लागला. पण संपूर्ण घर उजळून टाकण्यास तो असमर्थ ठरला.
एक वयोवृद्ध दिवा मोठ्या दिव्याजवळ आला आणि म्हणाला, 'मुला, तू एकटाच संपूर्ण घर प्रकाशाने उजळून टाकण्याचा प्रयत्न करत आहेस,पण ते शक्य आहे का? तुझं काम उदात्त आहे, परंतु तू हे काम करण्यासाठी कुणालाच आपल्याबरोबर घेतलं नाहीस, हे योग्य नाही. कोणतेही दिवे लहान मोठे नसतात. सगळे दिवे प्रकाश देण्यासाठीच जन्माला आले आहेत. त्यामुळे प्रथम सर्व सहकाऱ्यांची ज्योत पेटव आणि मग एकत्र येऊन घर उजळून टाका. प्रकाशाचा सण आणखी प्रकाशमान होईल.' वृद्ध दिव्याने त्याला समाजावून सांगितले. मोठ्या दिव्याला वृद्ध दिव्याचे म्हणणे पटले. त्याने सहमती दर्शविली आणि सर्व सहकारी मित्रांच्या ज्योती पेटवल्या. आणि दिव्यांच्या लख्ख प्रकाशात सगळं घर प्रकाशमान झालं.
तात्पर्य- समाजाचा अंधार दूर करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment