सध्याच्या जाहिरातीच्या युगात प्रसिद्धीचा ट्रेंड चांगल्यापैकी फोफावला आहे. चांगल्या कामांची प्रसिद्धी-प्रचार करणं सोप्पं झालं आहे.पण माणसांची नियती यामुळे बदलली आहे. आज माणसं समाज सेवेच्या नावाखाली स्वतःची अधिक प्रसिद्धी करताना दिसत आहेत. त्यामुळे मूळ हेतूच मागे पडला आहे. आपण एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू नये म्हणतात,पण तसा प्रामाणिक हेतू आता राहिलेला नाही. आठ -नऊ महिन्यांपूर्वी देशात कोरोना या महामारीच्या हातपाय पसरायला सुरुवात केल्यावर संपूर्ण टाळेबंदी देशभर लावण्यात आली. या काळात लोकांचे अतोनात हाल झाले. अशावेळी काही स्वतःला समाजसेवक समजणारे घरोघरी जाऊन लोकांना अन्नधान्यसह जीवनोपयोगी साहित्य वाटू लागले. त्याची बातमी वर्तमानपत्रात, युट्युब चॅनेल, न्यूज चॅनेलवर शिवाय सोशल मीडियावर देऊ लागले. स्वस्तात प्रसिद्धीचा 'फँडा' वापरला जाऊ लागला आहे. मोठ मोठ्या बजेटच्या सामाजिक सेवांमध्ये काही रक्कम (बजेट) आत्मप्रचारासाठी राखून ठेवलेली असते. बहुतेक लोकांना परोपकारानंतर आत्मप्रचार करण्याची आवड असते. ही उत्कटता आपण आत्म-मोहाकडे जाऊ शकते. अशाप्रकारे,स्वतः बद्दलचा आत्म-वेध पुढे सतत वाढत जातो. आपण परोपकार करून आत्मप्रचाराच्या माध्यमातून आत्ममोही होत जातो आणि आपण असा भ्रम करून घेतो की, आपण काहीतरी वेगळे करत आहोत आणि मोठं काम करत आहोत. अशा प्रकारची समाजसेवा शेवटी आपले अहितच करते.त्याचा त्रास आपल्यालाच होतो. अशा समाज सेवेचा दुःखद पैलू हा की, तो आपल्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण करतो. प्रश्न असा आहे की अहंकाराने ग्रस्त मानव खरी समाज सेवा करू शकतो का?
जेव्हा आपण परोपकाराच्या प्रचारावर लक्ष केंद्रित करू लागतो, तेव्हा समाजसेवेची भावना मागे पडते आणि प्रचाराचा भाव मुख्य होऊन जातो. या उपक्रमाने आपल्याला आनंद मिळतो, परंतु तो खरा आनंद नसतो, कारण यात प्रसिद्धीचा आनंद देखील सामील आहे. पुढे हळूहळू आपण केवळ प्रसिद्धीचाच आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे परोपकाराची भावणाआणी त्याचा आनंद मागे राहून जातो. वास्तविक, परोपकारात फक्त त्याग करण्याची भावना असायला हवी. परोपकाराच्या बहाण्याने इतरांकडून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शेवटी दुःख देऊन जातो, म्हणून आपण परोपकाराच्या बदल्यात दुसर्याकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा करू नये. परोपकार हे निस्वार्थ सेवेचे दुसरे नाव आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment