Monday, November 16, 2020

शाळेतून काढून टाकलेला मुलगा बनला परिवहन उद्योजक


त्या मुलाचं डोकं भारी चालायचं, पण अभ्यासातलं काही त्याच्या डोक्यात शिरायचं नाही. डोक्यात असंख्य गोष्टी सातत्याने चाललेल्या असायच्या. पुस्तकांशी चिकटून राहावं, असं त्याचं स्थिर डोकं नव्हतंच. अभ्यासासाठी पुस्तकंही काही सहज उपलब्ध होत नव्हती आणि घरातही त्याच्या अभ्यासावर कुणीतरी लक्ष केंद्रित करावं, अशी परिस्थितीही नव्हती. घरातला महोलच वेगळा होता. खायचं-प्यायचं, भांडायचं-फटकारायचं असं नेहमी चाललेलं असायचं. शाळेतल्या शिक्षकांनीही बरंच सांगून पाहिलं, पण पालथ्या घड्यावर पाणी...  शाळेत जाणं सक्तीचं असल्यानं कसा तरी अभ्यास नावाला चाललेला. मधेच अभ्यासात थोडी फार सुधारणा झाल्यासारखे दिसायचे, पण नंतर पाहिले पाढे पंचावन्न... अभ्यास आणि शाळा म्हणजे एक शिक्षाच आहे आणि ती प्रत्येकाला वयाच्या या टप्प्यावर भोगावी लागते, असं त्याचं ठाम मत झालं होतं.

यथावकाश तो सोळा वर्षांचा झाला. मायेनं पुन्हा पुन्हा समजावून सांगून संधी द्यावी, इतका काही तो लहान  राहिला नव्हता. आणि शेवटी तो दिवस उजाडला. शाळेतल्या शिक्षकांनी त्याला सांगून टाकलं, ते त्याला कोपऱ्यापासून हात जोडून म्हणाले,"आता शिकायचं राहू दे,तुझ्याच्यानं काही व्हायचं नाही."

त्या मुलाला मोठा झटका बसला. अभ्यासात मन लागत नाही, हे खरं पण शाळा एक आश्रयाचं,वेळ घालवायचं ठिकाण होतं. मग ही शाळाच नसेल तर काय करायचं? जसं अगोदर शाळेची सोबत मिळत होती, तशीच यापुढंही मिळावी, म्हणजे शाळेचे हे दिवस एकदाचे उलटून जातील. पण शाळेतले शिक्षक ऐकायला तयार नव्हते. शेवटी शाळा सुटली.17 वं लागलं होतं. घरच्यांनाही त्याचं काही वाटलं नाही. ट्रक ड्रायव्हर असलेले वडील सरळं बोलायचे नाहीत. आईदेखील नाशापान करायची.लढण्या- झगडण्यातही  ती  काही मागे नव्हती.  म्हणजे घरात शांत बसून विचार करावा, अशी शांतताच नव्हती. आयुष्य परत रुळावर आणणं मोठं कठीण होतं.  कुणी समजवायला नव्हतं. फुटबॉलची आवड होती, पण त्याने पोट भरणार नव्हते. शाळेने तर काढून टाकले होतेच, त्यात  दुसऱ्या शाळा प्रवेश द्यायला तयार नव्हत्या. त्यामुळे पुढे शिकायला वावच नव्हता.  मग काय करायचं? खूप विचार करून त्यानं आपल्यासाठी एक काम निवडलं.ते काम म्हणजे वडिलांसारखं ट्रक चालवायचं.आता वडिलांचंही वय होत चाललं होतं. आपलंही असंच आयुष्य जाणार का,याची चिंता त्याला सतावू लागली. त्याला असं फक्त ड्रायव्हर म्हणून आपलं आयुष्य जगायचं नव्हतं. त्यानं  ट्रक मालक होण्याचा दृढनिश्चय केला. 

ती शेवटी ती वेळ  लवकरच आली, लिंडसे फॉक्स याने कर्ज काढलं आणि वयाच्या 19 व्या वर्षी ट्रक मालक बनला. त्याने एक गोष्ट मात्र सिद्ध केली की वाईटातल्या वाईट परिस्थितीतही, नशीब उजळण्याचे स्रोत अस्तित्वात असतात. फक्त ते ओळखता आले पाहिजेत आणि  त्याला घट्ट धरून ठेवता आले पाहिजे.  आता त्याच्या प्रगतीचा प्रवास झपाट्याने वाढत चालला, आयुष्य पुढे सरकत राहिले.  लवकरच लोक त्याला ओळखायला लागले.  ट्रकची संख्या एक-एक करत  वाढत राहिली. 1960 मध्ये  ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे लिंडसेने त्याचा पहिला डेपो उघडला, तिथे त्याचे लाल, पिवळे आणि काळ्या रंगांचे  ट्रक उभे राहू लागले.  सन 1961 मध्ये लिंडसेला जाणीव झाली  की त्याला आणखी पुढं जायचं आहे. आता त्याने स्वत: ट्रक चालवणं थांबवलं पाहिजे आणि  व्यवसायावर आणखी लक्ष केंद्रित करायला पाहिजे. त्याने ट्रक चालवायला सहा  ड्रायव्हर ठेवले आणि धंदा  विस्तारण्याकडे लक्ष दिले.

 तो मोठमोठ्या कंपन्यांची काही काळ छोटी छोटी काम घेत राहिला आणि त्यांना चांगल्या सेवा देऊन त्यांच्यावर छापही पाडली.  जेव्हा तो 30 वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या ताफ्यात 60 ट्रक होते.  आज त्याच्याकडे पाच हजाराहून अधिक ट्रक आहेत आणि तो दहापेक्षा जास्त देशांमध्ये सेवा बजावत आहे.  ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या परिवहन कंपनीचा हा मालक जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जातो.

त्यांची चांगली वागणूक कंपनीच्या कामातही दिसून येत होती.  त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही ड्रायव्हरच्या शरीरात कोणत्याही प्रकारची नशा आढळून आल्यास त्याला कंपनीचे दरवाजे कायमचे बंद होत. लिंडसे नेहमी म्हणतात, वैयक्तिक संबंध नेहमीच चांगल्या व्यवसायाची गुरुकिल्ली असते.तुम्ही नेटवर्किंग खरेदी करू शकता, मैत्री नाही.  आपण काहीतरी वेगळे करू शकता असा तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्की काहीतरी वेगळे करता.  स्वतःवर, तुमच्या कुटूंबावर आणि तुमच्या समुदायावर विश्वास ठेवा, विजय तुमचाच असेल.'

मेलबर्न हायस्कूलने शिकण्यालायक नाही म्हणून शाळेतून काढून टाकलेला तो मुलगा इतका मोठा झाला की, शाळेलाही त्याचा अभिमान वाटू लागला.  त्याला विशेष अतिथी म्हणून शाळेत बोलावले जाऊ लागले.  परिवहन व्यवसाय जगतात त्यांना आता कोण ओळखत नाही? परंतु ते आपल्या शाळेतील दिवस आठवून सांगतात की, माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते.  आणि इथूनच माझी सुरुवात झाली.  मी शाळेत अभ्यासात खूपच कच्चा होतो.  एकदा माझ्या चुलत भावाचे नाव फळ्यावर आदराने लिहिलेले होते, तेव्हा मी चिडून वर्गातल्या माझ्या डेस्कवर माझे नाव कर्कटकने कोरले होते.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment